कधीतरी ,सकाळी उठल्या उठल्या वाटतं न, की आज काही, काही करू नये, कुणीही बोलू नये, शांत चहा प्या ..तेवढ्यात आईच्या कानात ," fruit loops , fruit loops" असं म्हणून एक छोटं माणूस ओरड्तं. मग लक्षात येतं की त्या छोट्या माणसाच्या चूळबुळ करण्यामुळेच आपल्याला जाग आली आहे. ते छान, काहीही न करण्याचं स्वप्न विसरायलाच लागतं मग. वाटीत fruit loops देऊन चहा ठेवेपर्यंत, शेवयांचा उपमा खायची फ़र्माईश झालेली असते. तो पानात वाढल्यावर, नाक मुरडून , "दाणे ?" असं विचारण्यात येतं, अर्थातच घरातले दाणे संपलेले असतात.Play dough ची झाकणं उघडी राहिल्यामुळे तो वाळून गेलेला असतो, त्यामुळे रडू यायला लागतं..डोळे पुसायला तेव्हा बाबाच हवा असतो.त्याची झोप झालेली नसली तरी तो डोळे पुसायला उठतो. मग त्याने ," वा ! क्या बात है " म्हणत उपमा खालला कि," मला शेवया खूप आवडतात " असं लडिवाळपणे त्याला सांगत, स्वतः खायला सुरुवात होते..मग बाबा आवरून office ला जातो . पुढे सगळा दिवस कंटाळवाणा, किरकिर करत रेंगाळत राहतो. संध्याकाळी ६ वाजता बाबा दार उघडून घरी आला, की दोघीही त्याच्याकडे धावतात. छोटं माणूस जणू नुकतच तुरुंगातून सुटून आल्यासारखं , बाबाच्या अंगावर माकडासारखं चढून बसतं. बाबाकडे पाहून चेहऱ्यावर खास ठेवणीतलं हास्य असतं - फक्त बाबासाठी ओठांवर आणलेलं. आईला थोडा रागच येतो, ती पर्स, किल्ली घेऊन एकटीच घरातून बाहेर पडते. कुठे जायचं हे न ठरवता लांब लांब ढांगा टाकत चालायला लागते.
दिवसभरातले , हे काय ? ते असं का ? हेच पाहिजे, ५० वेळेला trash truck कुठे कुठे जातो? चेहरा आणि ओठावर stamp चे ठसे, सगळ्या बाथरूम भर सांडलेल्या पाण्यासाठी- घरभर केलेला toilet रोल, दिवसातून ह्या न त्या कारणाने बदललेले चार कपड्यांचे जोड; घरातून बाहेर पडूनही ,सगळे तेच विचार तिच्या मनात घुमत असतात. जगात काय काय घडामोडी होऊन गेलेल्या असतात त्या आठ तासात - सध्याच्या काळात एखाद्या tweet मुळे कुठेतरी युद्ध पण चालू झालेलं असू शकतं ! पण ती, ह्या शुल्लक गोष्टी निस्तरत बसलेली असते. ' शुल्लक ' म्हणताच तिला छोट्या माणसाने तिच्यासाठी बागेतलं काढलेलं फुल आठवतं, दुपारी झोपताना कुशीत येऊन ,'माझी आहे ' म्हटलेलं आठवतं.. शुल्लक म्हणणं बरोबर नाही..पण तिचा दिवस म्हणजे ,तेच- तेच कंटाळवाणं...
परत जाण्याची घाई नसताना,तिची पावलं आपसूक घराकडे वळतात. किल्लीने दार उघडून ती घरात येते तर, सकाळी तिला हवी होती तशी शांतता असते. ती दाराशीच उभी राहून घरातली शांतता दोन मिनिटं, आत भरून घेते.
डोळे उघडून living रूममध्ये येते तर घरातले सगळे खेळ जमिनीवर पसरलेले दिसतात. परत डोळे मिटून, दीर्घ श्वास घेत ती kitchen मध्ये पाणी प्यायला म्हणून जाते..तर "surprise!" म्हणत तिच्या अंगावर झडप पडते. तिला surprise होण्यासारखं काहीच नसतं, उलट kitchenच्या फरशीवर तीन वेगवेगळे भातुकलीचे set मांडलेले दिसतात. आईचा चेहरा छोट्या माणसाला कळतो, म्हणून " आई I am making tea , I am making tea .." " for you .." असं म्हणून प्लास्टिकचा चहाचा कप अति उत्साहात ओठांना लावला जातो. आईला हसू येतं, ती मिटक्या मारत चहा प्यायलाचा अभिनय करते. खरा चहा मिळाला तर किती बरं होइल असा विचार मनात यायच्या आधी, खऱ्या चहाचा कप पण ओट्यावर दिसतो. चहा घेत आई भातुकलीतल्या सुरीने सफरचंद चिरायला लागते तर ते ओढून घेत, " नाही हे बाबाचं आहे .." असं म्हणून छोटं माणूस ती खेळणी काढून घेतं. बाबा, आंब्याच्या छान चौकोनी फोडी करून छोट्या माणसाला भरवत असतो, तो आईकडे बघून हसतो.
आई उठून स्वैपाकाला लागते. बाबा आणि छोटं माणूस, त्यांचा भातुकलीतला स्वैपाक करत, खेळत राहतात.
मात्र खरा स्वैपाक झाल्यावर , छोट्या माणसाला आईनेच भरवायला हवं असतं. तिच्या मांडीवर बसूनच खायचं असतं. booster chair वर बसवलं तरी आईने अगदी जवळ बसायचं असतं. मग बाबा नसला तरी चालतं. बाप लेकीचं चांगलं तंत्र आहे, आईने छोट्या माणसाला भरवायच म्हणजे बाबाला जेवता येईल - पण मग आईचं आस्वाद घेऊन जेवणं कधी होणार?
रात्री, छोटं माणूस आई बाबांच्या मध्ये झोपल्यावर , आई त्याचा मुका घेते आणि उचलून त्याच्या गादीवर ठेवते. लहानपणी,तिचा बाबा तिच्याशी कधीच भातुकली वगैरे खेळला नव्हता. तो तर कधी स्वैपाक चालू असताना स्वैपाकघरात पण आला नव्हता. पण रात्री झोपताना तिचा बाबा तिला एका राक्षसाची गोष्ट सांगे, कडेवर घेऊन लांब मद्रासी मंडईपर्यंत चालत जाई , तेव्हा कुठे तिला झोप लागत असे. तिचा बाबा नेहमी तिच्यासाठी वेगवेगळ्या भाषेतल्या परीकथा घेऊन येई, तिच्या वक्तृत्व स्पर्धांची तयारी करून घेई. तिची आई आणि बाबा एकत्र स्वैपाकघरात स्वैपाक करत नसले, तरी तिला बाबाचं प्रेम आहे हे कळायचं. छोट्या माणसाच्या आईला वाटून गेलं, की आईचं प्रेम पोटात असल्यापासून कळतं, आणि तिच्या छातीवर ठेवल्यापासून आयुष्यात एक गृहीतच असतं - पण बाबाला मात्र ते वेळोवेळी दाखवायला लागतं, परीक्षा द्याव्या लागतात! छोट्या माणसाचा बाबा इतक्यातच परीक्षा देत, बदलला सुद्धा ! भातुकली, चित्रकला , दुकानात मुद्दाम जाऊन खरेदी, एरवी कधीही न केलेल्या गोष्टी, छोट्या माणसाने तिच्या बाबाला करायला लावल्या. उगाच नाहीये, फक्त त्याच्यासाठी ते ठेवणीतलं हास्य- त्याने ते जिंकून मिळवलंय. दिवसभरातल्या कंटाळवाण्या, किरकिरण्यानंतर आईला छान हलकं वाटतं. झोप लागल्यावर सुद्धा तिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य कायम राहतं..
दुसऱ्या दिवशी,उठून दिवसाचा काही विचार करायच्या आधीच, तिच्या कानावर कुसरपुसर पडते . डोळे उघडून बघते तर, छोटं माणूस -छोटा कप आणि मोठं माणूस- खरा कप घेऊन, तिला चहा द्यायला सज्ज झालेले असतात.
PrachanD goaD! Very close to heart!
ReplyDeletekhup khup avdya
ReplyDelete