facebook

Wednesday, December 27, 2017

पोचा



Marriage counselor समोर दोघंही, शाळेतल्या काचा फोडताना सापडलेल्या दोन मुलांसारखे बसले होते. मुलांचे पालक आले , भुर्दंड भरला,तरी फुटलेली  काच पुन्हा न तडकलेली,  न भंगलेली, पूर्वीची  अखंड काच कधीच होणार नव्हती. तिच्या जागी नवीनच काच बसवावी लागणार होती. फक्त, Counselor समोर बसलेल्या  त्या दोघांनी फोडलेली काच ; ती मात्र पुढे काहीही झालं, तरी मनावर तडकलेली चिन्ह राहणारच होती.
" अंजली  - Its your turn. Where did the dissent begin?"
" मला कळत नाहीये आपण ह्याच्यावर का वेळ घालवतोय? We just want a few pointers to improve our communication.." मंदार जरा चिडचिड्या स्वरातच उत्तरला.
" असं तुला वाटतंय मंदार. मला गरज वाटते आहे मुळापाशी पोचण्याची.."
मंदारच्या चेहऱ्यावर उमटलेली तुच्छता, अंजलीला डिवचून गेली. एकदम उसळत ती Dr.Namdeo ना म्हणाली, " बघितलत तुम्ही? त्याचा चेहरा कसा होतो ते.."
"तुझा चेहरा काय कोरा करकरीत असतो असं वाटतं का तुला ?"  मंदार ने प्रश्नाचं उत्तर आणखीन प्रश्न विचारून दिलं ."दहावीत आहोत का आपण अंजली? तू माझ्याकडे असं का पाहिलंस?तेव्हा का नाही पाहिलंस, म्हणून भांडत बसायला? हा सगळा पोरखेळ आहे.. छोट्या छोट्या कारणांवरून तू अशी उसळतेस, मुलं घाबरतात हल्ली.."
मंदारचे बोलणं ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी तरळलं. " म्हणजे सगळी चूक माझीच आहे. तू वागतोस ,बोलतोस त्यामुळे मी दुखावली जाते आणि अशी वागते, ही शक्यतासुद्धा तुझ्या मनात येत नाही."
मंदारने  काहीतरी पुटपुटत मान फिरवली.
ह्या अस्वस्थ शांततेत Dr. Namdeo घुम्यासारखे त्या दोघांकडे बघत बसले. त्यांच्या निर्विकार चेहऱ्याचा, मंदार ला अजून राग आला.
" तुम्ही सांगणार नाहीआत  का तिला ? How long are you just going to sit and observe? झाले आता तीन session.."
" मी कुणा एकाची बाजू घेणार नाहीये, कारण मला अजून पुरेसं काही कळलेलंच नाहीये. Anjali why don't you start?" Dr.Namdeo शांतपणे म्हणाले.
" चार वर्षांपूर्वी मी पुण्यातून माझ्या घरून चार स्टील ची भांडी आणली .."
" I cant believe we are paying him money to listen to this lame story.." मंदार लगेच उद्गारला.
" मला बोलायचंय आणि मी मला वाटतं ते त्यांना सांगणार आहे. ते Lame आहे का नाही हे मी, माझ्यासाठी, किंवा ते ऐकून ते ठरवतील; तू आला आहेस तर तुला ऐकावं लागेल. you will get your chance." आवाजात उसनी धार आणून अंजली मंदारला म्हणाली.
मंदार किंवा Dr. Namdeo ची प्रतिक्रियेची वाट न पाहता, अंजली बांध फुटल्यासारखी बोलायला लागली. "
मी पुण्याहून चार स्टीलची भांडी आणली. ती विशेष आकर्षक, जुन्या पद्धतीची, जाड स्टील, भावनिक गुंतवणूक असणारी, पिढीजात परंपरेने चालत आलेली वगैरे काहीही कारण नव्हतं. मला ,स्वैपाकाला स्टीलच्या भांड्यांची गरज होती, मला ती सहज उपलब्ध झाली आणि मी ती इथे आणली. ती Bag मधून काढून स्वैपाक घरात ठेवल्यापासून, मंदारला ती खुपत होती. का आणलीस? इथे ह्यापेक्षा सुरेख, चांगली कुठेही मिळू शकतात, आपण हे काढून टाकू असं एकदा बोलणं झालं. त्याच वेळेला त्याच्या मनात काही पूर्वगृह आहेत का? काही वाईट आठवणी आहेत का? मी सगळं विचारलं. मला भारताची आठवण येते असं मंदार म्हणाला. एरवी, अनेक आठवणी जिवंत रहाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करतो म्हणून मी ह्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. पण मग हे पाच सहा वेळेला झालं. मग एकदा तो म्हणाला मला ही स्वैपाकघरात पाहून त्रासच होतो, ती काढून टाकू आपण."

" They were extremely ugly, an eyesore. I hated them. But that was not important for you, was it?"

" ती भांडी काढून टाकू म्हणून भांडण झाल्यावर, मी त्याला म्हटलं , की तुला आवडत नाहीत हे तू नमूद केलं आहेस. एकदा नाही अनेक वेळेला. मला ती स्वैपाक घरात वापरायची आहेत, स्वैपाक मी करते. तू हे जे वारंवार Insist करतोस ते मला आवडत नाही. हे तू नेहमी करतोस. माझा एखादा कपडा आवडला नाही तर तू एकदा सांगून थांबत नाहीस, जोपर्यंत, तो मी वापरणं पूर्णतः बंद करत नाही तोपर्यंत, तू ,तो कपडा तुला आवडलेला नाही हे सांगतच राहतोस.

"  I have the right to express my opinion. I don't like it, I am going to say it a hundred times it is not going to change."

" म्हणजे मी बदलायचं असतं न मग ? ह्या प्रक्रियेला, म्हणजे तू तुझं मत नमूद करून , वारंवार ते सांगत राहणं ह्याला  scientific भाषेत किंवा rational भाषेत काय म्हणतात मला माहित नाही .पण मला ते claustrophobic वाटतं , असं सांगूनही मंदार त्याचं मत बदलत नाही."

" बरोबर आहे - पण मग तू भांडी , त्यात उकळणाऱ्या soup आणि इतर स्वैपाकासकट खोलीच्या दुसर्या कोपर्यात भिरकावून दिलीस ते? ते कुणामुळे? का त्यालाही माझाच insistence जबाबदार आहे?"

" Insist, insist करून डोकं फिरवून टाकलस , उद्वेग होता तो माझा.त्या भांड्यांना पोचा पडला म्हणून नाही दिली मी ती टाकून...तुझ्या insistence मुळेच दिली .."

" And we bought brand new ones ! Enamel coated, cobalt Blue to match the .."

" And I hated them...का माहिती आहे ? मला माझ्या स्वैपाकघरात काहीतरी सामान्य, ordinary हवं होतं. माझ्यासारखं ...सततचं ते रेखीव , देखणं aesthetically pleasing- म्हणजे परत स्वैपाकघर सगळं चकाचक, देखणं ठेवण्याचं pressure माझ्यावरच..cooking show मधली किचन आहे का आपलं ?"

" म्हणून तू enamel वर Scotchbrite वापरलस?..."

" मी नाही - पोरांनी खेळताना वापरलं .."

मंदार आणि अंजली नंतरही बरच बोलत राहिली..
Dr. Namdeo ऐकत राहिले. भांड्यांना पोचा पडला होता चार वर्षापूर्वी ,नात्याला तर तो आधीच पडला होता.पण हे त्या दोघांना स्वतःहून कधी उमगेल ?  उमगल्यावर, त्यांचं हे विध्वंसक वर्तुळ बंद पडेल, का
एकमेकांची इतकी वर्ष सवय झाली म्हणून, ते एकमेकांच्या passive-aggressive स्वभावाची गोडी चाखत अजून पोचे सोसत राहतील? त्यांच्या मुलांसाठी पोटात तुटलं पण Dr. Namdeo ऐकत राहिले... मंदार आणि अंजली त्या परतीची वाट नसलेल्या गुहेत हरवून गेले...







No comments:

Post a Comment