डाळ मेथी, शिजवलेल्या बीटाची कोशिंबीर ( मीठ लिंबू साखर जिरेपूड दाण्याचे कुट आणि अख्खे दाणे), केलची परतलेली भाजी (तीळ, लसूण, लाल मिरची, ओलं खोबरं ) ,फ्लॉवर आणि कांद्याच्या पातीची भाजी ( १ हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि आलं घालून) जवस घातलेली mix पीठाची पोळी ( नाचणी, oats, गहू पीठ), भात( जिरं, हिंग, २लवंग, ३-४ मिरं घालून शिजवलेला)
बाई मुलाला जन्म देते तेव्हा तिचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात. मला ह्या जन्म देण्याच्या process बद्दल अगदी प्रकर्षाने आठवतं ते पोटात खड्डा पडून सणसणीत भूक लागणं! अंगात असेल नसेल ते बळ एकवटून आयुष्यात त्या आधी कधीच न अनुभवलेल्या वेदनांना सामोरं जाताना - एरवी जे अन्न हे पूर्णब्रह्म आपल्याला पोषण देत असतं ते आपल्यापासून लांब ठेवलेलं असतं. ( वैद्यकीय गरजच असते ती पण तो मानसिक आधार आपल्याला मिळत नाही.) त्या दोन दिवसात मला veg Broth आणि clear Jelly चा जो राग आला आहे तो मी कधी आयुष्यात विसरणार नाही ! पोषण ह्या नावाखाली माझी केलेली फसवणूक होती ती! बरं माझी परिस्थिती इतकी वाईट होती,की ह्या गोष्टी सुद्धा पोटात राहत नव्हत्या. साधा वरण तूप भात - लोणचं नाही, बटाट्याची भाजी नाही, खोबरं-कोथिंबीर मिरचीची चटणी नाही; गेला बाजार, मुगाची खिचडी पण तेव्हा चालली असती! पण चोवीस तास मला काहीही खाता आलं नाही. ते चोवीस तास हे तीन चार दिवसांसारखे वाटले कारण एखाद्या गाडीला धडकून पडल्यावर, कुणीतरी सगळं शरीर पिळून काढल्यासारखं वाटत होतं- इतका थकवा,शीणवटा मी कधीच अनुभवला नव्हता...आणि तरीही आपलं पोर आपल्याजवळ आल्यावर तिच्यासाठीचं जीवनावश्यक पोषण त्याच शीण शरीरातून पाझरत होतं. तेव्हा कळलं दुसरा जन्म का ते...
ह्या पुनरजन्मात पाहिलं अन्न पोटात गेलं ते म्हणजे -आईने करून आणलेला डाळ मेथी आणि भात. भात बाधू नये म्हणून त्यामध्ये हिंग, जिरं आणि अखं मिरं शिजवताना घातलेलं. डाळ मेथी बाधू नये म्हणून ती खोबऱ्याच्या दुधात केलेली! गोडघास म्हणून आळीवाचा छोटासा लाडू..माझ्या दुसऱ्या जन्मातल्या, ह्या पाहिल्या जेवणाची चव आणि ते जेवल्यानंतरची तृप्तता मी कधीच विसरू शकणार नाही..
गेल्या तीन वर्षात मी ही डाळ मेथी माझ्या तीन चार मैत्रीणींसाठी केली आहे. त्यातल्या दोघी अभारतीय, कधीही मेथी दाणा बघितलेला नाही पण डॉक्टर्सनी Fenugreek tablets/ मेथीचा सत्व असलेल्या गोळ्या घ्यायला सांगितल्यामुळे, मी त्यांना आवर्जून डाळ मेथी करून खाऊ घातली. काल पुन्हा असाच योग आला. माझ्या अभारतीय शेजारणीला तीन आठवड्यांपूर्वी मुलगा झाला. तिची आई - delivery च्या आधी २-३ दिवस आणि नंतर चार दिवस थांबून घरी परत गेली. तिचे सासू -सासरे अजून दोन महिन्यांनी मदतीला येणार आहेत. आपल्याकडे बाळंतीणीची काळजी घ्यायला, तिच्या आहार -प्रकृतीची काळजी घ्यायला एक पारंपारिक तंत्र मांडून ठेवलेलं आहे. आहारातली पथ्य, अंगाला तेल -मसाज, चुलीपासून लांब राहणं-किती साध्या साध्या गोष्टी आहेत! माझ्यासारख्या दूरदेशात राहणाऱ्या मुलींनासुद्धा त्यांच्या आई, सासूकडून मिळालेल्या ह्या पारंपारिक ज्ञानाचा ठेवा तारून नेतो. हे ज्ञान मिळवायला आम्हाला काही साधना नाही करावी लागली , ते आम्ही कुरकुर करूनसुद्धा , शंभर प्रतिप्रश्न विचारूनसुद्धा, आमच्या आधीच्या पिढीने आमच्या पदरात त्याची गाठ बांधून दिली आहे. काही काही वेळेला माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या मैत्रीणींच्या मदतीला असे आधारस्तंभ नाहीत ह्याची मलाच खंत वाटते. पण जिथे कुटुंबातली माणसं मदतीला उभी राहू शकत नाहीत तिथे मित्र, शेजारी, आपुलकीने,जमेल त्या पद्धतीने मदतीला उभे राहतात, हे पण मी अनुभवलं आहे ! mealtrain ह्या website च्या मदतीने आम्ही सगळे शेजारी सध्या जेवणाची जवाबदारी उचलतो आहे..
काल डबा तयार करायची संधी मला मिळाली. एका छोट्या जीवाला पोसणाऱ्या आईला, मला छान तृप्त जेवायला घातल्याचं समाधान हवं होतं. तिच्या समाधानात तिच्या पिल्लाचं समाधान पण आलं! माझ्या तीन वर्षाच्या मुलीच्या 'मदतीने' मी खूप आत्मीयतेने सगळा स्वैपाक केला, डबा भरला आणि पोचवून आले. रात्री आम्ही तिघं जेवायला बसल्यावर नवरोबा पान पाहून खुश झाला. म्हणाला, "अरे वाह ! दोन भाज्या , कोशिंबीर, वरण, पोळी आणि भात ! इतकं साग्रसंगीत आपण पाहुणे आल्यावरच जेवतो!" मी," खरंय" म्हणून गप्प बसले, पण डोक्यात विचार सुरु झाला...
आज दुपारी लंचच्या सुमारास मेसज आला, " Your food satisfied my soul! I didn't know I needed this until I ate it. As soon as I can I want to learn to make the Dal and the greens! Thanks a ton !"
बाळंतीणीची तृप्त झाल्याची पावती मनाला खूप समाधान देऊन गेली, तशीच माझ्या विचारांना एक सकारात्मक दिशा पण देऊन गेली. Pregnant असतांना मी जितका आहाराचा विचार करून काळजीपूर्वक जेवायचे तितकी व्यवस्थित मी कधीच जेवलेले नाही. मुलीला दूध पाजायचं म्हणून काही काळ आहारावर लक्ष होतं -पण ते पण वाढत्या व्यापांमध्ये दुसरीकडेच भरकटलं आहे. मुलगी तीन वर्षाचीच आहे पण मला हल्ली जाणवतं की तिच्या आहाराविषयी मी जितकी जागरूक असते तेवढीच मी स्वतःला casually घेते. शरीराने जर साथ देत राहावं असं वाटत असेल तर शरीराला आपण काहीतरी सात्विक भेट देत राहिलं पाहिजे. दुसऱ्या मिळालेल्या जन्मात, सतत वयानुसार, माझ्या गरजेनुसार माझ्या पिंडाला पोषक असा आहार शोधण्याची जबाबदारी ही माझीच आहे . ती टाळून मला चालणारच नाहीये !
संक्रांतीच्या निमितांने - नवीन संक्रमण करत असतांना - स्वतःसाठी पोषक आहार शोधून, त्याचा आस्वाद घेण्याची जवाबदारी मी घेते आहे.... तुम्ही काय निश्चय करताय?
faar chan lekh ahe , vachtana trupt zale :)
ReplyDeleteThank you Anagha! तुम्ही लेख वाचून प्रतिक्रिया नोंदवलीत त्यामुळे मी पण तृप्त झाले !
ReplyDelete