facebook

Monday, January 15, 2018

साडी



मी लहान असतांना , मला आई तयार कशी होते हे बघायला खूप आवडायचं.  तिच्या कॉटनच्या साड्यांना नेहमीच स्टार्च आणि इस्त्री असायची. आणि पाच दहा मिनिटात तिची साडी, वेणी घालून, तिचं 'तयार होणं ', आरशा समोर असणं संपलेलं असायचं. कानात कुड्या - मोत्याच्या किंवा सोन्याच्या, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर मरून रंगाची टिकली, एका मनगटावर लेदर च्या पट्याचं टायटनचं घड्याळ, दुसऱ्या मनगटावर, तिच्या लग्नातल्या पण साध्या, दोन सोन्याच्या बांगड्या. तिने कधीच ' खोटे ' कानातले घातले नाहीत; त्याने कान चिडतात म्हणून. :) वर्षानुवर्षे तिच्या अंगावरची ही आभूषणं बदलली नाहीत. निदान माझ्या आठवणीत तरी.  तिने कधीच पावडर, लिपस्टिक, आयलायनर लावला नाही. तिला अत्तरं, सेंट, छोट्या काचेच्या बाटल्यांमधली 'उडी कलोन' वगैरे खूप आवडत. त्याची एखाद- दुसरी बाटली आमच्या घरी नक्की असत . कधीतरी  'मी काय करू? तुला काही मदत हवी आहे का ?' असं सारखं टुमणं लावल्यावर, निऱ्यांना साडी पिन लावण्याची जवाबदारी मिळे. 
आईच्या त्या मऊ कॉटनच्या पण स्टार्चची धार असणाऱ्या साड्या मला फार आवडत ..
सिल्क किंवा भरजरी साड्या ठराविक सणाला किंवा शाळा / कॉलेज मधल्या समारंभानाच नेसल्या जात. दसरा दिवाळी, पाडवा, संक्रांत सगळ्या सणांना, सकाळी उठून अंघोळ करून तिच्या ' स्पेशल ' साडीत आईने स्वैपाक केल्यामुळे,  साडीला हळद किंवा तेलाचे, देवघरातल्या तूप-शेंदूराचे डाग पडले कि तिला हळहळ वाटे. झटकन ' ड्रायकलीन' ला वगैरे देण्याची भानगड नव्हती.
मग नंतर ह्या सिल्क साड्यांचं प्रकरण आणि आईच्या कपाटातलं प्रमाण  फार वाढलं. कॉटनच्या साड्या उन्हाळी महिन्यासाठी राखीव आणि एरवी अधून मधून वापरल्या जात.
मी सेकण्ड यर ला असतांना आईच्या कॉलेजमधून फोनवर बातमी मिळाली कि 'तिचा पाय मोडलाय, प्लास्टर घातलंय आणि ती थोड्याच वेळात घरी पोचते आहे..' त्यावेळेच्या माझ्या गृहकृत्यदक्ष मनाला वाटलं, आईच्या ह्या परिस्थितीत गाऊन आणि सलवार कमीजचा खूप उपयोग होईल. आणि म्हणून आईने पहिल्यांदा सलवार सूट घातला. ..ह्या गोष्टीला आता १५ एक वर्ष होऊन गेली.
दहा वर्षांपूर्वी मी सासरी - म्हणजे ते घर सासर व्हायच्या आधीपासून - तिकडे वावरायला लागले आणि त्या 'आईचे' पण कॉटन साड्यांवरचे प्रेम लक्षात आले. जरीपेक्षा बारीक आणि रेशीम काठ, तिच्या आवडीचे होते. ती आई पण कॉलेजला अशी १०-१५ मिनटात भर्रकन तयार होऊन जायची. ही आई सलवार कमीज घालत होती. 'तू अमेरिकेला येते आहेस, तर चल तुला जीन्स घेऊ' असं म्हणून मी तिला भरीस पाडून, मॉल मधून जीन्स आणि ट्यूनिकस घेऊन दिल्या...दोन्ही आया 'मॉडर्न ' झाल्या.
माझ्या आईला मी घेऊन नाही गेले, पण तिच्या परदेशवारीसाठी ती पण जीन्स, ट्यूनिक, कोटस इतयादी खरेदी करून, सुटसुटीत कपड्यात जगवारी करण्याची मजा अनुभवून परत मायदेशी गेली.  "इतकी वर्ष का नाही केला?"असं म्हणत ह्या दोन्ही आयांनी छान स्मार्ट ' बॉब' कट केले आहेत.
साठी नंतर 'कुणाकडूनही आता नवीन वस्त्र नको', असं म्हणत असतांना, ह्या दोघींना कुणी कुणी प्रेमाने , आग्रहाने भरजरी काठांच्या, उत्सवी साड्या भेट देतात. त्या- त्या व्यक्तीचं मन मोडायचं नाही म्हणून त्या साड्या नेसतात सुध्दा; पण आता रोजच्या दैनंदिनीत ब्यवहारात त्या दोघीजणी साड्याच नेसत नाहीत ! आता त्यांच्यासाठी पण साडी ही 'स्पेशल वेअर' झाली आहे. दर रोज घालायचे कुर्ते, सलवार, लेगगिंग्स, ओढण्या, स्टोल... कपाटाचे रूप बदलय तसं आई पण बदलली आहे ..
यंदा माझ्या आठवणीतली 'स्पेशल' साडीत सणासुदीचा  स्वैपाक करणारी आई,  मला स्वताःमध्ये साकारायची होती. २००७ मध्ये खास लखनऊहुन माझ्या फिल्म इन्स्टिटयूट मधल्या मैत्रिणीने आणलेली साडी नेसायची मी ठरवली होती .. पण सकाळी उठून धावत पळत ८-१० जणांचा साग्रसंगीत स्वैपाक करायचा म्हटल्यावर साडी बाजूलाच पडली. टी शर्ट , पॅन्ट - सुटसुटीत कपड्यात स्वैपाक आवारला आणि पाहुणे पोचायच्या आधी १० मिनिटं,अंगावर 'फेस्टिव्ह' कुर्ता चढवला !
स्वैपाकाचं कौतुक करत तृप्त जेवलेले पाहूणे पहिले पण तरीही अस्वस्थ वाटलं ...  वाटलं आमच्याकडची  ठेवणीतली साडी नेसून, अगत्य करायला उभी राहणारी,  'स्पेशल 'आई नाही घडली... तिला पाहतच मोठे झालॊ, तिला नव्या तऱ्हा शिकवतांना काही जुन्या ,तिच्या ठेवणीतल्या तऱ्हा घ्यायला हव्या होत्या.
 कारण आता ती पण ती, जुनी, आठवणीतली आई राहिलेली नाही. ती पण सणाला, पाय दुखतात ,सिल्क साड्यांमध्ये उकडतं, म्हणून सुटसुटीत ड्रेस घालते.
इरा जेव्हा मला निरखून ,मी तयार होते, तेव्हा नक्की काय काय करते? हे न्याहाळायला लागेल ,तेव्हाही माझ्या मनामध्ये आईच्या मऊ कॉटन साडीला असलेली स्टार्च ची धार आठवेल.. हे सगळं त्या साडी साठीच...

2 comments:

  1. Hi Amruta, Maaybolivar lekh vachala tuza, khup mast watala. Keep it up! Adhi kalala nahi pan blogspot cha address baghun lakshat ala, sangate ata Renu la pan wachayla jar tine vachala nasel tar :)

    ReplyDelete
    Replies
    1. Harshada- किती छान आपली इथे तरी भेट झाली! रेणू वाचते असं म्हणली आहे -तिच्या काही लेखांबद्दल प्रतिक्रिया पण मिळाल्या..तू पण वाचलंस, मला भारी वाटलं!:) Keep reading..

      Delete