facebook

Saturday, December 22, 2018

Opportunity


आफरोज, आस्क मी फॉर अ पोयम, आणि मी
माझीसाठी लिहिलेली  कविता  : Opportunity 
2012 सालापासून बर्क्लीमध्ये वर्षातला एक रविवार Sunday streets of Berkeley म्हणून साजरा केला जातो. Downtown  मधले रस्ते सकाळपासून संध्याकाळी ६ पर्यंत रहदारीसाठी बंद केले जातात. सगळे स्थानिक व्यवसाय, रेस्ताराँट्स, बेकरीज, संगीत शाळा, लोकल बँडस, ब्रुअरीज, विनयार्डस, चित्रकार, शिल्पकार, रस्त्यावर छोटे टेबल्स, स्टाॅल लावतात;लोकं सायकलस आणि पायी फिरत शहर वेगळ्या पद्धतीने अनुभवतात. लहान मुलांना कुणीही न दटावता रस्त्यांवर बागडायला जणू मोठंच्या मोठं आंगण मिळतं. बेर्कली ह्या शहरात अनुभवण्यासारखं बरच काही आहे, पण Sunday Streets ला शहरात एक वेगळच फेस्टीव वातावरण असतं,धम्माल येते.  ह्या बद्दल अजून बरच लिहिण्यासारखं पण ते नंतर कधीतरी.
ह्या वर्षी ३ जूनला Sunday Streets मध्ये सहभागी व्हायला आम्ही सायकल घेऊन गेलो होतो. आईस्क्रीम,पिझा, हुला हूप, लाईव्ह बँड च्या गाण्यांवर नाचणं, इराच्या मर्जीनुसार आमची सायकल पुढे पुढे सरकत होती. जून महिना असल्यामुळे रणरणतं उन होतं. मला सोहळा आटपून घरी जाऊन गुडूप झोपण्याची घाई झाली होती, पण इराला वाजणाऱ्या प्रत्येक गाण्यावर नाचायचं होतं, आणि प्रत्येक गिटारवाल्याची गाणी ऐकायची होती. मला जागं ठेवण्यासाठी आम्ही कॉफीच्या शोधात निघालो. दुपारचे दीड दोन वाजले असल्यामुळे मुलांच्या खिदळण्याबरोबरच, थोडे कुर्कुरीचे आणि भोकाड पसरल्याचे आवाज कानावर पडायला लागले होते. ब्रझीलीअन ड्रम बीट्सवरछाती धडधडत होती, पाय आपोआप ठेक्यावर हलत होते. ह्या सगळ्या कोलाहलात मला ती दिसली.
फोल्डिंगचं साधं टेबल आणि पत्र्याची खुर्ची रस्त्याच्या कडेला लाऊन, ती शांत बसली होती. तिच्या डोक्यावर टोपी नव्हती, छत्री नव्हती, टेबलवर एक टाईप रायटर, टिप्ससाठी एक प्लास्टिकचा ग्लास आणि   टेबलसमोर काळ्या पाटीवर खडूने लिहिलं होतं ‘आस्क मी फॉर अ पोयम’/ Ask me for a poem’. ती एकटीच बसली होती, तिच्या समोर कुणीही कविता लिहून घ्यायला आलेलं नव्हतं, पण येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशाळभूतपणे बघत नव्हती. तिच्या नजरेसमोर जणू प्रत्येक माणसातून एक गोष्ट उलगडत होती. मी सायकल स्टॅंड शोधण्याच्या भानगडीत न पडता, सायकल रस्त्याच्या कडेला ढकलली,आणि तिच्याकडे वळले. तोपर्यंत २ लोकं तिच्याकडे कविता लिहून घ्यायला आली होती. मी त्यांच्यामागे जाऊन रांगेत उभी राहिले.
एखाद्या दुकानात जाऊन रांगेत उभं राहून , एखादी निर्जीव वस्तू विकत घेण्यासारखी,अशी स्वतः साठी जिवंत कविता लिहून मिळणं ही गोष्ट मला प्रचंडच भारावून गेली. मला वाटतं मूळतः लेखनाची प्रक्रिया प्रचंड एकाकी आहे, लेखक त्याच्या निर्मिती प्रक्रियेत असतांना कुठल्याच अंगाने glamorous वगैरे दिसत नाही, म्हणजे कागदावर पेन धरून लिहित बसलेला माणूस, किंवा कॉम्पुटर समोर कीबोर्ड बडवत बसलेला माणूस, ह्याच्यात बघण्यासारखं काहीही नाही. लेखकाचा निर्मिती प्रक्रीयाचे आनंद, खंत, दुख खूप वैयक्तिक असतं, ते पूर्णतः इतर कुणाबरोबर शेर करता येत नाही. सुस्वरूप, पूर्ण घडलेल्या निर्मितीवर त्याला दाद/ ताशेरे मिळतात. ही अशी सगळी निर्मितीची प्रक्रिया, दोन मिनिट मॅगीसारखी, रस्त्यावरून कुणीही समोर येऊन उभ्या राहिलेल्यासाठी, त्याच्यासमोर घडवायची, हे मला खूप Daring वाटलं.
माझा नंबर आला, हाॅलीवूडच्या सिनेमात लेखकांच्या टेबलवर असतो तसच तिचा antique करोना टाईपरायटर, त्यावर माझी नजर रेंगाळली. Writing softwares च्या जमान्यात ती ज्या अभिमानाने त्याच्यावर लिहित होती त्यामुळेही असेल कदाचित. खरंतर मला अफरोजकडे, तिच्या डोळ्यात बघायचं होतं. तिने विचारलं, “What do you want me to write on?” मला पटकन काही सुचलंच नाही, mind blank. मग मी म्हटलं, “Opportunity.”
अफरोज किंचित हसली, माझ्याकडे एकदा बघितलं आणि टाईपरायटर वर तिची बोटं भराभरा फिरायला लागली. टाईपरायटर शब्द लिहिला की तो backspace करून पुसता, खोडता येत नाही. माझ्याकडे बघून हसण्याच्या आणि एका कटाकशाच्या वेळात तिच्या मनात Insta-poem साकारली होती, ती तिने एकटाकी लिहिली आणि माझ्या हातात दिली. जुन्या कागदासारखा पिवळसर कागद.

Opportunity

This day
is an opening
like the glory
that unfolds
in the morning
every exhale
a new page
waiting
to be inscribed
सुसंधीच्या मागावर स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचा विचार करू नाहीये असं तिच्या मनात होतं का? का टाईपरायटरवर ती चिन्ह उमटवताना insta poem च्या प्रक्रियेचा वेळ वाढतो, म्हणून तिने वापर केला नाही? माहित नाही.
त्या दिवसानंतर मी अफरोज फातिमा अहमद बद्दल भरपूर वाचलं. भारतातून स्थलांतरित झालेल्या आईबाबांची ती लेक. ती पूर्ण वेळ हेच करते, म्हणजे on the spot कविता करते, Hand crafted poems for all – pay what you will.” कविता लिहून देण्याचे पैसे स्वीकारते आणि बिलं भरते. लिहिण्याचे workshops घेते, पुस्तकं लिहिते. फार्मर्स मार्केट, शाळा, कम्युनिटी ईव्हेन्ट्स ना वेगवेगळ्या गावी, शहरात, महानगरात फिरते. हे इतक्या शेकडो लोकांसाठी वर्षानुवर्ष काव्य तयार करत राहणं, ह्यासाठी प्रचंड तल्लख बुद्धी आणि प्रगल्भता, प्रतिभा हवी; जी तिच्या लिखाणातून जाणवते. तिच्या वेबसाईटवर तिने लिहिलं आहे, “Numinous experiences for sale, please inquire within.” अलौकिक अनुभव विक्रीला आहेत/ कृपया आत चौकशी करा...” (https://afrosefatimaahmed.com/impromptu-poetry/)https://afrosefatimaahmed.com/impromptu-poetry/)
ते अनुभव स्वतःला पडताळून सापडणार आहेत का तिच्या वेबसाईटवर,तिला विचारून?  हे प्रत्येकाने स्वतःच ठरवायचं आहे.
कुठल्याही प्रभावी लेखकाला, चित्रकाराला, शिल्पकाराला स्वतःच्या कलेसाठी मार्ग स्वतःच खणायला लागतो. जी पाऊलवाट एका कलाकाराला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते त्याच वाटेवर दुसरा एखादा कलाकार पहिलच वळण चुकू शकतो. अफरोजने ज्या वाटेवर जायचं ठरवलंय त्यात ती प्रत्येक लिहिलेल्या कवितेतून एका अनोळखी व्यक्तीशी नातं जोडते; स्वतःचं काहीतरी त्यात ओतते, त्या देण्यातून तिची कला समृध्द करणारं मिळवते.
लोकांनी, आवाजांनी गजबजलेल्या त्या Sunday Streets मध्ये अफरोजला पाहिलं होतं, तेव्हाच मला हे  जाणवलेलं असावं. वाट शोधायचीच विसरून गेलेल्याला, वाट खणून तयार केलेल्या व्यक्तीभवतीचं तेजोमंडळ लगेच साद घालतं. म्हणूनच कविता कशावर लिहू असं तिने विचारल्यावर मी तिला सांगते “Opportunity.”



Friday, December 21, 2018

दाण्याची चटणी आणि नवीन शिखरं


जेवणाच्या ताटात भाजी, आमटी, कोशिंबीर असली; ताट कितीही सजलेलं असलं तरी लोणचं किंवा दाण्याची/ तिळाची/ कारळाची/ जवसाची चटणी असल्याशिवाय ताट परिपूर्ण वाटत नाही. जसा हापूस आंब्यांचा राजा आहे तशीच दाण्याची चटणी, चटण्यांची राणी आहे. निदान आमच्याकडे आम्ही हे पद  तिला निरविवाद बहाल केलेलं आहे.जेवणाच्या पानातलं दाण्याच्या चटणीचं स्थान जसं ठरलेलं आहे तसच गिऱ्यारोहण करणाऱ्या किंवा सह्याद्री रांगा सर करणाऱ्या सगळ्यांच्या backpack मध्ये ही चटणी असतेच असते. पहिल्यांदा परदेशात घर बसवायला येणाऱ्या मुला-मुलींच्या बॅगेतही गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि दाण्यच्या चटणीची पाकीटं हमखास अस्तात.

आम्ही अमेरिकेत येताना इतरांसारखीच ही मसाल्याची आणि चटणीची पाकिटं घेऊन आलो. पण ती संपायच्या आधीच आम्हाला इथल्या नवीन पदार्थांचे वेध लागले. वेगवेगळ्या डिप्स, ह्म्मस, साल्सा, ग्वाकामोले, आणि सॅासचे वेगवेगळे प्रकार- मुह्मारा, हरिसा, श्रीराचा, थाई पिनट इत्यादी. गरीब बापडी पाच जीन्नसातून बनणारी दाण्याची चटणी बाजूला पडली. कॅलिफोर्निया exploreकरायला फिरायलो लागलो आणि मग दाण्याच्या चटणीचं पुनरागमन झालं. अनोळखी प्रदेश फिरायचा असेल तर पोटोबा तरी ओळखीचा नको का? दाण्याची चटणी,बटर आणि ब्रेड अशी आमची ठरलेली प्रवासाची शिधा आम्ही बांधायला लागलो.

आठ दहा वर्ष जुनी होंडा सिविक, टेंट, कॅम्प स्टोव, तुटपुंजकं बजेट, आणि दाण्याची चटणी बरोबर घेऊन आम्ही दर वीकेंडला नवीन स्टेट पार्क, नवीन टेकाडं सर करायला बाहेर पडायला लागलो. चटणी सॅडविच करणं सोयीस्कर होतं, स्वस्त होतं, एवढाच त्यामागचा विचार होता. पोटोबाची विवंचना नसली की  पायवाटा तुडवत wild flowers च्या शेकडो छटा बघणं, वाट ओलांडून जाणारी बनाना स्ल्ग्झ मोजणं, दऱ्यांमधले उन सावलीचे खेळ पाहणं, कुरणांचे विस्तार, पॅसिफिक समुद्राच्या निळ्याशार लाटांशेजारी वाढलेली अजस्त्र रेडवूड झाडं, जॉन मुईरच्या प्रदेशात हरवून जाणं, त्याला हरपून टाकणाऱ्या नैसर्गिक समृद्धीची अनुभूती घेणं, आम्हाला सहज अनुभवता येत होतं. आमच्या बरोबर येणारे आमचे मित्र मैत्रिणी काही वेळा आमच्या दाण्याच्या चटणी सॅडविच बाबत आमची टिंगल सुद्धा करत, काही जणं चटणीचं sample मागत.

२०१२ साली आम्ही Grand Canyonला गेलो होतो. दहा दिवसांची, मोठी Roadtrip. अर्थातच बरोबर दाण्याची किलोभर चटणी, मॅगी, भेळ, खाकरे, पोहे, चहा. शटल बस घेऊन आम्ही रिम ट्रेलला जेमतेम सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास पोचलो होतो. कार २ मैल लांब व्हीझीटर सेंटरला पार्क केली होती. सूर्यास्तानंतर, अंधारात कॅन्यनचा “ फील” घेत , पायवाटेवर टॅारच दाखवत आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. पाच दहा मिनिटात शेवटची शटल भरून लोकं गेली, गर्दी गेली. ट्रेल वर चालणारी मोजकी लोकं राहिली. ५- १० मिनिटात पूर्ण काळोख झाला. आकाशात एक नाजूक चंद्रकोर आणि शेकडो तारे. मी तिथे येऊन पोचल्याच्या आनंदात सुर्यास्ताचा आनंद नीट उपभोगला नव्हता पण अंधार होताच माझ्या पापण्यांमागे, सूर्यास्तामुळे खिंडीचा बदललेला भडक बदामी रंग प्रतिबिंबित होत होता. म्हणून मी अडखळत चालत होते, का excitementमुळे आता आठवत नाही. कुठेतरी मी ठेचकाळले, म्हणून आम्ही एका बेंच वर बसलो. अंधारात फक्त खिंडीच्या भासरेषा दिसत होत्या. एकच अंधुक torch दाखवत आमच्यापाशी एक जोडपं आलं. “ Are you all right?” त्यांनी विचारलं.

“ Yes, just taking a break.” निकीत म्हणाला. काही न बोलता ते पण बेंचपाशी थांबले, पाणी प्यायले. मग आम्ही चौघंही एकत्र चालायला लागलो. बोलण्यात कळलं की ते सीअॅटल शहरातून सगळं घर दार विकून, ओरेगन मध्ये राहिला चालले होते. एका पाच एकरच्या शेतावर त्यांना स्वतः शेती करायची होती, शेतावर वाहणाऱ्या ओढ्यातून, लागेल तेवढीच उर्जा निर्मिती करायची होती. आम्हाला त्यांचं बोलणं ऐकून ते दोघंही हिप्पी वाटले.निकीत green energy मध्ये काम करतो म्हटल्यावर त्यांनी windmill आणि water turbine बद्दल भरपूर प्रश्न विचारले. प्रश्न थांबेचना, त्यांना भरपूर बोलायचं होतं.  आम्हाला दोघांनाच जे हातात हात घालून चालत जायचं होतं ते राहीलच.. आम्ही भारतातले म्हटल्यावर आमचं arranged marriage होतं का , लग्नात किती लोकं बोलावतात आणि मुख्य म्हणजे बॉलीवूड सिनेमाबद्दल बोलायचं होतं. Slumdog Millionaire मध्ये दाखवली आहे तशीच आहे का मुंबई वगैरे प्रश्न झाले. त्यांना शाहरुख खान खूप आवडत होता. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता पार्किंग लॉट पर्यंत आम्ही पोचलो सुद्धा. एवढ्या मोठ्या लॉट मध्ये फक्त चारच गाड्या होत्या.गिफ्ट आणि कॉफ्फी शॉप बंद होतं. त्यांनी RV van आणली होती, आम्हाला dinnerच निमंत्रण दिलं. खरं Thank you म्हणून निघायला काहीही हरकत नव्हती, पण आम्ही थांबलो.

बाहेर चांदण्यांखाली एक फोल्डिंग टेबल आणि तीन खुर्च्या टाकल्या. त्यांनी wine आणि beer ची बाटली उघडली आणि ती त्याच्या मांडीवर चढून बसली. निकीतने त्याच्या playlist मधली शाहरुख खानची गाणी लावली. मी त्या तिघांचं बोलण फारसं ऐकलं नाही. Grand Canyonची भव्यता एकीकडे आणि तिथे पोचून आम्ही अनुभवत असलेलं हे वायफळ संभाषण ह्या दोन्हीचा ताळ जमत नव्हता. मी backpack मधून चटणी, ब्रेड आणि खाकरे काढले. ते पाहून तिचे डोळे चमकले. चटणी खाऊन त्या दोघांचे डोळे पाणावले. “ Woah! thats hot...!oww..” म्हणत ती मांडीवरून उठली आणि RV मध्ये गेली. काकडी, टोमॅटो, ऑलिव्ह आॅईल घेऊन आली. तिने चटणी आणि तेलाची डीप तयार केली. काकडी डीप मध्ये बुडवून खालली.मग कशाची चटणी, कशी करतात, खाकरा कसा करतात ह्या बद्दल चर्चा झाली. ह्या गप्पांमध्ये मागे रेहमान ची शेहनाई वाजली...” ये जो देस है तेरा ...” सुरु झालं.

स्वदेस मधलं गाणं ऐकून माझा चेहरा खुलला. “If you don't mind, will you share this spice mix with us?” तिने विचारलं.
“ Chutney, not spice mix.” मी म्हणाले.
“Of course ! Peanut Chutney, love...” तो म्हणाला.
मी हसून त्यांच्यासाठी पाकिट भरलं, देशातून बांधून आणलेली शिदोरी थोडी परदेशात वाटली ह्याचं समाधान वाटलं.  

स्वतःसाठी आणि निकीतसाठी सॅडविच केलं. पहिला घास पोटात गेल्यावर पोटोबा सुखावला. आलो होतो Grand Canyon बघायला आणि बसलो चटणीची कृती सांगत! चटणी सारखी साधी, मी गृहीत धरलेली गोष्ट अशी उलगडून सांगावी लागली ह्याची मला गम्मत वाटली. वाटलं, स्वतःबद्दल गृहीत धरलेलं सगळच ह्या नवीन देशात उलगडून सांगावं लागणार. त्या उलगडून सांगण्यात स्वतःची परत पारख होणार. परत परत ते उलगडून सांगणं बोचलं तरी ते करावं लागणार.  इथल्या वास्तव्यात नवीन गोष्टी, स्वाद, जाणीवा, अनुभव सतत येऊन दार ठोठावणार, हात धरून स्वतःबरोबर यायला प्रवृत्त करणार. पण तेच नवीन प्रवास साधायला तर आलो इथे, नवीन शिखरं गाठायला. शिखराकडे प्रवास करताना ‘स्व’देशातली शिदोरी घट्ट धरून ठेवावी लागणार.
दाण्याची चटणी हे फक्त रूपक आहे, हे समजण्याइतकी मला तेव्हाही wine चढली नव्हती. पण आंतरिक मोनोलाॅग नंतर मी शांत झाले.
Hike, sandwich etc चा संबंध मी त्या नंतर देशांतर, स्थलांतर किंवा मानसिक संक्रमणाशी जोडला नाही. चटणी ही चटणीच राहू दे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे विचारचक्र सुरु करणाऱ्या चटणीची रेसिपी देते आहे. दाण्याची चटणी लाल जर्द दिसत नसली, थोडी काळपट दिसत असली तरी त्याच्या रंगावर जाऊ नका. :)
साहित्य: कुरकुरीत भाजलेले दाणे- २ मोठ्या वाट्या
आमसुलं – ४-५
जिरे- १ छोटा चमचा
साखर- २ छोटे चमचे
मीठ आणि लाल तिखट चवीनुसार.
कृती: आमसूलं, मीठ, जिरं आणि साखर आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि बाजूला ठेवा. दाण्याचं कुट करून त्यात तिखट आणि आधीकेलेली पूड नीट मिक्स करा. घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.आमसूल आणि साखरेमुळे ह्या चटणीला आंबट, गोड, तिखट चव येते. ही चटणी कितीही खालली तरी आमसुलामुळे पित्ताचा त्रास होत नाही.  


Thursday, December 20, 2018

Happily Ever After


हॉस्पिटल कॅफेटेरियामध्ये पाय ठेवताच कॉफीच्या वासाने, मेघनला चापटी बसल्यासारखी जाग आली; आणि तिला पोटात पडलेल्या खड्ड्याची जाणीव झाली. खड्डा जितका येऊ घातलेल्या testsच्या काळजीमुळे होता तितकाच भेकेमुळेही होता. ती रांगेत उभी राहिली. इतर लोकांच्या रेग्युलर कॉफ्फी, मोका, लाटे,शॉटस,बेगल,एग sandwich, मफ्फीनच्या ऑर्डर्स ऐकून तिला अनेक युगानपूर्वीचा तिचा एस्प्रेसो शॉटने दिवस सुरु होण्याचा काळ आठवला, जिभेला मात्र आता त्याची चव आठवत नव्हती.

“Mam would you like to place your order now?” काऊंटर पलीकडून प्रश्न आल्यावर मेघन परत भानावर आली.
“I would like a grilled pesto sandwich, but can you replace the Swiss cheese with Monterrey Jack?”
“Sure. Would you like anything to drink?”
“No, but I would like a pack of the extra crunchy salt and pepper potato chips. And can you grill the sandwich to a crunchy brown texture?”
ऑडर घेणाऱ्या बाईने मेघनकडे भुवया उंचावून सांगीतलं, “ We cant do that Mam, its a standard grill. Is that all for you?”
मेघनने परत एकदा डिसप्ले केस कडे बघितलं. “I would like a strawberry Tart too..”
“ Is that for here or to go?”
“ To go, please. Thank you.” मेघन ने पटकन कार्ड स्वाईप केलं आणि ती बाजूला सरकली.
इमेजींग डीपार्टमेंटला रेजीसट॒रेशन करून मेघनने वेटिंगरूमवर नजर फिरवली. सकाळचे साडेआठ वाजले असले तरी गर्दीच होती. सगळ्यात कोपऱ्यातला आणि त्यातल्या त्यात privacyचा फील देणारा कोपरा मेघनने निवडला. पर्स तिने शेजारच्या खुर्चीवर ठेवली. घाईने सँडविच
आणि चिप्सचे पाकीट उघडले; त्याचा भरपूर आवाज होतोय ह्याचं भान न ठेवता तिने मुठभर चिप्स तोंडात कोंबल्या. दाताखाली त्यांचा होणारा चुरचुर आवाज तिला सुखावून गेला. मेघनने डोळे मिटून घेतले. चवीपेक्षा तो चुरचुर होणारा आवाज तिच्या चेहऱ्यावर समाधानाची एक छोटी छटा उमटवून गेला. मांडीवरून सँडविच खाली घसरून पडलं तरी मेघनने डोळे उघडले नाहीत. क्रिस, माया आणि सिडपासून लपून, कुठल्यातरी गुहेत बसून ती एकटीच Ambrosia उपभोगते आहे असं मेघानला वाटलं. मुलांना क्रिस कडे ठेऊन स्वतः हा आनंद उपभोगल्याबद्दल अपराधी वाटलं. तिने आणखीन मोठा चिप्सचा बकाणा भरला.

“ Mommy , look a sammy..I want a sammy too mommy...”
मर्जी विरुद्ध मेघानने डोळे उघडले. एका फुटावर एक चार पाच वर्षाची, निळ्याडोळ्याची, सोनेरी केसांची मुलगी लोळण घालता घालता सँडविच, मेघन आणि आईकडे बघत होती. आई तिच्यामागे वाकून तिला उचलण्याचा प्रयत्न करत होती.
“ Rosie baby remember we can’t eat until the doctor sees us..I promise we will have a surprise treat later...”
एक कर्कश्श किंकाळी आणि ....“But I want it now.. I am hungry mama....” रोझीच्या डोळ्यात तरळलेले पाणी खरं होतं.
एरवीच्या एटीकेट्सचा विचार न करता मेघनने पिशवीतून strawberry tart काढून रोझीच्या पुढे केला.
त्या tart वरच्या strawberries पाहून जणू तिच्या अंगात काहीतरी संचारलं असल्यासारखं रोझी परत एकदा किंचाळली आणि रडायला लागली. “ No stawberries mama..no Stawberries...”
मेघन, “I am sorry” म्हणेपर्यंत रोझीची आई तिला कडेवर घेऊन तिथून झपाट्याने चालती झाली. मेघनने खाली पडलेले सँडविच उचललं, tart बॅगेत कोंबला. रोझी आणि तिची आई गेली त्या दिशेने पाहून एक निश्वास टाकला आणि मग sticky wrapper काढून पहिला घास घेतला. पण तिच्या चेहऱ्यावरची तृप्तता नाहीशी झाली होती.

मेघनचा मणक्याचा आणि पायाचा xray काढून ती वेटिंगरूममध्ये आली आणि रोझी आणि तिच्या आईला शोधायला तिने खोलीभर नजर फिरवली. त्या कुठेच दिसत नाहीयेत असं वाटून ती इलेव्हेटर जवळ जाणार तोच तिला ‘तिच्या’ कोपऱ्यात रोझीची आई मान खाली घालून एकटीच बसलेली दिसली. मेघन तिच्याजवळ गेली; रोझीच्या आईचे खांदे हुंदक्यांनी हलत होते.
मेघनला वाटलं तिच्याशी आत्ता काहीही न बोलता निघून जावं. पण वेटिंगरूमच्या कोपऱ्यात, भावनांच्या आवेगाला असं एकटीच सामोरी जाणारी रोझीच्या आईला, सोबतीची गरज आहे असं मेघानला वाटलं. चाचपडत ती रोझीच्या आईला “Hi!” म्हणाली.
डोळे पुसत तिने वर मेघनकडे पाहिलं. पण परत जमिनीकडे बघत ती घाईघाईत म्हणाली, “ I am sorry about Rosie, she is usually an angel. But she really was hungry....”
तिच्या माफीचा ओघ थांबवत मेघन म्हणाली, “ Hey, Hey you don't need to apologize. I came by to say I am sorry for offering her food without knowing any... context..I am sorry I wasn't thinking right..”
“ She is getting an MRI. She isn't supposed to eat anything, no clear jelly, nothing ...And the strawberries ....” डोळ्यातले पाणी न लपवता... “ the gas they use to put her to sleep ...it is strawberry flavored ...”
मेघन आणि तिची नजरानजर झाली. त्या दोघीही शांत झाल्या. मेघन तिच्याकडे बघत दीड पायावर उभी होती, रोझीची आई जमिनीकडे बघत सतत वाहणारे डोळे पुसत होती..
रोझीच्या आईचे काय सांत्वन करणार? ह्या वयात घडलेलं सगळं मुलं विसरतात, असं सांगणार? पण मुलं विसरली तरी आईच्या डोक्यात त्या कोरल्या जातात; त्याच्यावर काय तोडगा असतो हे स्वतः मेघानलाही माहित नव्हतं. आई होताना समोर काय मांडून ठेवलय कुणाला माहित असतं? प्रेम अयशस्वी ठरलं, लग्न मोडलं तरी सगळं विसरून नवीन दिशा शोधता येतच असते, पण आईला मुलांकडे पाठ फिरवता येत नसते....

रोझीच्या आईच्या खांद्यावर हात ठेवत मेघन ने विचारलं, “ You still have time before they bring her to the recovery room. Do you want to get a cup of coffee?”
रोझीच्या आईने मान हलवली. त्या दोघीही हळू हळू कॅफेटेरियाच्या दिशेने चालायला लागल्या.
“ I never imagined it would be so isolating ...I don't know ..I wake up everyday hoping it is done, you know, and then I can start living the fantasy mother daughter life...”
“ I know what you mean ... I am Meghan ..”
“ Cynthia. Thank you for ..just making the effort you know..”
“ No worries.”
“ So you have kids Meghan?”
“ Twins. Boy and Girl. Got it right in one go..”
“ Lucky you. What were you testing for?”
“what?”
“ What were you being tested for today?”
“ oh. Bulging discs. Metatarsal inflammation.”
“ Oh poor you ! Must be hard with twins..”
“ Yes it is. But then you make the best of what you get right..?”
“ That's what we grow up being told. I hate it..having to pretend that everything is going to be alright.. You know when a 4 year old is traumatized by the sight of a berry, has to be sedated every 3 months.. I don't think I can pretend that this is what I wanted to deal with when I decided to be a mother..”
मेघनला वाटलं तिला घट्ट मिठी मारावी आणि विचारावं की अगं कुठून येतं बळ, हे असे शब्द उच्चारण्याचं? पण मेघनमध्ये हे म्हणण्याची सुद्धा ताकद नव्हती. एका अनोळखी व्यक्ती पुढे मनातलं सगळं मोकळेपणाने बोलण्यात काहीतरी liberating असणार , हे कळूनही, आपल्याला ते जमणार नाही हे मेघनला माहिती होतं. कॅफेटेरियात पोचेपर्यंत त्या दोघी पुढे काहीच बोलल्या नाहीत. रांगेत उभं राहताना सिंथीयाने मेघनला विचारलं, “ What will you have?”
“ Nothing.” मेघन एकदम वळून कॅफेटेरिया मध्ये त्या दोघींसाठी टेबल शोधायला लागली. सिंथियाकडे पाठ करूनच ती बसली. 

मनातली घुसमट बाहेर पडायला धडपडत होती, मेघनच्या माकडहाडातून अचानक कळा यायला लागल्या. Test ला पाठवण्याआधी तिच्या GP चे शब्द आठवले, “We should definitely do the Xrays to rule out the possibilities. But you have been under extreme stress for the last few years. I think it psychosomatic. I strongly recommend counselling too.”

सकाळी गादीतून उठून माया आणि सिडला ती नॉर्मल आहे, हस्ते आहे , आनंदी आहे एवढंच पटवून देण्यात तिचा जीव मोडकळीला येत होता. आई होतांना तिला कुठे माहिती होतं C section होणार आहे, दोन्ही मुलांना cleft lip असणार आहे, दूध पिता येत नाही म्हणून पम्प करायला लागणार आहे, एका मागोमाग एक surgeries आणि complications होत राहणार आहेत? speech therapist आणि plastic surgeons च्या appointments हेच आयुष्यचे केंद्रस्थान होणार आहे? कुठे माहिती होतं की खंत करायला, हरवलेल्या सगळ्याला farewell म्हणायला पण निवांत क्षण मिळणार नाहीये? गोंडस, हसणारी बाळं, talcum powderचा सुवास घेणारी हसरी समाधानी आई होणं माझ्या नशिबात का नव्हतं हे कुणालाच सांगता येणार नव्हतं, कधीही. पण whats done cannot be undone.. घर चालवायला, पैसा जोडत राहिला, क्रिस बाहेर पडला आणि मी...मीच राहिले नाही.. मी मोडते आहे हे सांगता आलं नाही.. आणि अशी मनाने मोडलेली आई तिच्या दोन्ही मुलांना जगण्याचे धडे देणार होती...आईला नॉर्मल आईपण मिळालं नव्हतं तसं मुलांना तरी कुठे नॉर्मल बालपण मिळत होतं? There was no happily ever after..”

मणक्यातल्या कळा, छातीतली धडधड, दरदरून फुटलेला घाम... टेबलवर समोर strawberry tart आल्यावर, मेघनला गलबलून आलं... “ I wanted to thank you for letting me vent. If she is scared I will have to overcome the fear . She will watch and learn, isn't it ?..”
मेघनला पुढचं आयकवलं नाही. तिने सिंथियाच्या खांद्यावर थापटी मारली, “ Sorry! I need to go, take care.” असं म्हणून पळ काढला. बये दोन मिनिटांत अशी बाजू का बदललीस? खरा प्रश्न हा पडायला हवा होता तुला, “Where will I learn to overcome ? Whom do I watch?”

मेघनने सिड आणि मायाच्या जेवणाची तयारी केली. पालक आणि डाळीची puree, आंब्याची puree, भात, बटाटा, टोमॅटोची puree. तीन वेगवेगळ्या वाट्या दोघांच्या highchair च्या ट्रे मध्ये ठेवल्या. मायाच्या ट्यूब मधून क्रिस तिला भरवत होता. मेघन सिडला पहिला चमचा भरवत होती. सिड आणि माया मेजवानी जेवल्याच्या थाटात मिटक्या मारत होते. मेघनचं लक्ष नसताना सिड ने दोन बोटांवर आंब्याची puree घेऊन तिच्या तोंडाजवळ आणली,तिने मिटक्या मारत डोळे मिचकावत ती खालली. माया ट्रे वर हात आपटत होती. मेघनने तिच्याकडे वळून एक flying kiss दिला आणि परत सिडकडे वळली.... ट्रे वर अजून हात आपटत, माया जोरात किंचाळली, “ Ma ma” Speech थेरपी सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच..सिड मेघानला स्वतः जवळ ओढत म्हणाला, “ my mama..”
मेघनचा बांध फुटला, तिने मायाचे आणि सिडचे मुकेघेतल्यावर, त्यांनी तोंडातली puree फुरर फुरर करून तोंडातून थुंकायला, उडवायला सुरु केलं. क्रिस ने वाटीत हात घालून दोघांच्या गालाला puree फासली...." Bring it on!! Let the best food fight ever begin!"
मेघनला वाटलं, Happily ever after नसेल कदाचित त्यांच्या आयुष्यात पण happily ecstatic in stolen precious moments हे वास्तवात आणणं त्यांना नक्कीच शक्य होतं.

Wednesday, December 19, 2018

Layers


मी अमेरिकेत रहायला आले तेव्हा पानगळीचा ऋतू होता. भगवी, पिवळी, लाल, हिरवी पानं; सोनेरी, केशरी, पिवळट, धुळकट रंगाचे पायाशी पडलेले पानांचे गालिचे आणि रस्त्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले उंच झाडांचे, मनाला आणि डोळ्याला दिपवून टाकणारे जिवंत कॅनवास; पानगळ होत असली तर हवेत नव निर्मितीची चाहूल होती असं मला वाटलं होतं. नवीन देशात ह्यापेक्षा दुसरं अनोखं स्वागत अजून काय असू शकतं? असं सगळं poetic वगैरे मला पहिले सात दिवस वाटलं असेल, मग साडे चार ला होणारा अंधार खटकायला लागला, थंडी बोचायला लागली. पुण्यातून आणलेले लोकरी स्वेटरच गार पडायला लागले; अती शहाणपणा करून थर्मल शर्ट वगैरे मी आणले नव्हते, अमेरिकेत आल्या आल्या मला खरेदीला जायचे नव्हतं. बाहेर पानं,पाचोळा उडवणारं वारं कपड्यांमध्ये शिरून माझ्याभवती फेर धरायला लागलं. तेव्हा माझी बहिण Upstate Newyork, Albany मध्ये राहत होती. तिला दोन फुट बर्फात दोन मुलांना साधं libraryत घेऊन जायचे असेल तर चारशे साठ गोष्टींमध्ये त्यांना गुंडाळून घराबाहेर पडण्याची सवय होती. Sunny California बद्दलची माझी तक्रार ऐकून ती आधी मनसोक्त हसली मग तिने LLBean companyचे Thermal shirts आणि Layering shirts पाठवले.( त्यातला एक आजूनही माझ्या वापरात आहेJ) पण त्याने माझा प्रशन सुटला नाही..
अमेरिकेत आल्यावर “Wear layers” किंवा “Dress in layers” असं सर्रास ऐकायला मिळतं. पण पुण्यात असताना जीन्स आणि कुर्ता हा युनिफॉर्म असणाऱ्या आणि थोडसं fashion challenged असणाऱ्या मला, layering ही संकल्पना समजायला खूप दिवस, खूप महिने, खूप वर्ष गेली. खरंतर Layering ची theory खूपच साधी, सोपी, सरळ आहे. त्यात rocket science निश्चितच नाहीये.पण नाही जमत बुआ एकेकाला साध्या गोष्टी...एकेकाला नाही, बहुदा खूप जणांना जमत नसावं म्हणूनच तर wikipediaवर ह्या विषयावर एक अख्खं पेज आहे, youtube वर व्हिडीओ आहेत. Wikipedia वरचे नियम खाली थोडक्यात:
Usually at least three layers are identified as follows:
  • Inner layer provides comfort by keeping the skin dry. Also called base layer or first layer.
  • Mid layer provides warmth. Also called insulating layer.
  • Shell layer protects from wind and/or water. Also called outer layer which works as protection over the other two layers.
तीनही layers योग्य रंगसंगतीत बसणारे, हवे असतील तेव्हा Laundry hamper मध्ये नसून, स्वच्छ धुवून, घडी केलेले असणं, गळ्याला आणि कानाला थंडी वाजू नये म्हणून योग्य रंग संगतीत स्कार्फ आणि ear muff ची जोडी हाताशी असणे, अशी अनेक Aesthetic कारणं माझ्या आड येत. मग ९९ टक्के वेळा मी सगळे Aesthetic नियम धाब्यावर बसवून, वाटेल ते, सापडेल ते घालायचे. २-३ वर्ष तरी मी आसपासच्या student housing मधल्या लोकांची भरपूर करमणूक केली असणार.

अगदी निव्वळ योगायोगाने हे सगळे layers एकाचवेळी उपलब्ध झाल्यास, ते घालून मी बाहेर पडले की निकीत,“काय आज Antartica का?” एवढंच विचारायचा. मग माझा पारा चढायचा. देश बदलल्यामुळे त्याच्या कपड्यात, कपाटात कोंबलेल्या ऐवाजांमध्ये फारसा काहीच फरक पडला नव्हता. Jeans, ड्रेस shirts, tshirts, २ blazers एक formal एक casual, स्वेटर्स, mufflers आणि  fleece jackets, ३ कुर्ते आणि fabindia ची दोन जाकीटं. माझ्या कपाटात एक गोंधळ माजलेला होता; माझी भारतातली identity दरवळत असणारा cotton, खण, ब्लॉकप्रिंट, तल्लम सिल्क चा पसरलेला खजिना आणि मला न उलगडलेली, स्वीकारायला थोडी अवघड जाणारी polyester, synthetics, linen आणि cotton blend चा अनोळखी स्पर्श असणारी, नवीन देशातली सगळी नवीन वस्त्र. ह्या गोंधळातून योग्य वस्त्र निवडून, एक सुसंगती साधणं अवघड जात होतं मला...ती सगळी layers उतरल्यावर आत मी कोण असणार होते हे एक कोडं होतं माझ्यासमोर.म्हणूनच कदाचित layering समजायला उमजायला मला अवघड गेलं...

थोडीशी सुसंगती साधता येते आहे असं वाटायला लागतंय तेवढ्यात एक अनपेक्षित आक्रीत घडलं. इरा पोटात असताना अचानक मला वाजणारी थंडी, कपड्यात फेर धरणारं वारं नाहीसं झालं. जाकीट न घालता, दिसेल त्या उबदार वस्त्रात स्वतःला न गुंडाळता मी बाहेर हिंडत फिरत होते. आई म्हणाली, “ इथलं पाणी मुरलं आता अमृता, सरावलीस तू.” मला वाटलं की इराची उर्जा माझ्या अंतरंगात उब पसरवत होती.

इराचा जन्म भर थंडीतला आहे. तिला घरी आणलं आणि लक्षात आलं आता एकीच्या नाही दोघींच्या layers ची डोक्याला कटकट असणार. पण इराच्या गावी असले थंडी बिंडी शब्दच नव्हते. डोक्यावरच्या टोप्या काढून टाकणे, पायतले मोजे घासून घासून काढून टाकणे, लाथा मारून पांघरूण ढकलून देणे हे तिने सहाव्या महिन्यापासून सुरु केलं. तिच्या मा, म्हणजे निकीतच्या आईने, अपार मायेने विणलेले स्वेटर ती फक्त फोटोपुरते घालते. मी Hot house flower असले तरी तिच्यात ह्याच मातीतलं पाणी मुरलंय.  

मागच्या वर्षी Lake Tahoe च्या बर्फाळलेल्या पाण्यात, जोरजोरात खिदळत इरा तासभर खेळत होती; निकीत तिच्या शेजारी कुडकुडत, बत्तीशी घासत उभा होता. तेव्हा मला विचारावसं वाटत होतं, “काय आज Antartica का?” पण मी काहीच बोलले नाही. पोटातली उर्जा बर्फाच्या पाण्यात खेळत होती आणि मी असेल नसेल त्या उबदार वस्त्रांमध्ये स्वतःला गुंडाळून किनाऱ्यावर बसले होते.

Tuesday, December 18, 2018

बिल आणि पेगी










Bay Area मध्ये Sunnyvale, Mountain view, Fremont सारख्या शहरात शेकडो प्रकारची उत्तम भारतीय restaurants आहेत तशी बर्कलीमध्ये नाहीयेत. पण जिथे अड्डा टाकून, चहा आणि चविष्ट भारतीय पदार्थांचा आस्वाद घेताघेता, मित्र मैत्रिंणीबरोबर गप्पा मारत बसता येयील, असं बर्कली मधलं Viks chat आहे, आणि ते आमचं वीकेंडच्या brunch चे आवडतं ठिकाण आहे. Viks मध्ये उत्तर भारतीय पद्धतीचे चाटचे प्रकार मिळतात, ताजी मिठाई, कुल्फी, फालुदा, शहाळं, लस्सी आणि शंभरवेळा न उकळलेला, अस्सल वेलची घातलेला, योग्य प्रमाणात दूध असलेला उत्तम चहा मिळतो.

२०१५ च्या नोव्हेंबर मध्ये भारतातून आम्ही नुकतेच परतलो होतो. १० महिन्याची इरा, जिभल्या वेडावून दाखवायला शिकली होती. Viks मध्ये गर्दीची वेळ होती, टेबल मिळवण्यासाठी माझ्या मागे कुणीतरी येऊन उभं होतं म्हणून मी इराला माझ्या खांद्यावर घेऊन उभ्या उभ्याच माझी पाव भाजी संपवत होते, निकीत टेबल साफ करत होता, आणि इराने चार टेबल पलीकडल्या एका म्हाताऱ्या जोडप्याला जिभल्या वेडावून, डोळे मिचकावून, स्वतःच्या मोहात पाडलं. ते दोघंही आमच्याजवळ इराची ओळख करून घ्यायला आले. इरा ह्या शब्दाचा अर्थ काय ह्यावर आमची थोडी चर्चा झाली. बिल आणि पेगी, निकीत आणि अमृता अशा नावांची अदलाबदल झाली, हातमिळवणी झाली. त्या दोघांचे चंदेरी केस आणि आमची तिघांची छोटी ‘young family’, खरंतर परत आमची काही देवाणघेवाण होईल असं तेव्हा मला वाटलं नव्हतं. पण कथा, कादंबऱ्यामध्ये वर्णनं असतात न अनपेक्षित predestined भेटी, अनामिक मैत्र , चौकटीत न बसणाऱ्या ओळखी किंवा नाती, तशीच ती सुरुवात होती आमच्या आयुष्यातल्या एका बिल आणि पेगी नावाच्या नाजूक रेशमी विणीची. म्हणूनच मला इराने करून दिलेली आमची ती पहिली भेट ठळकपणे आठवते..

त्या पहिल्या भेटीनंतर पुढचे ६ -८ महिने आमचं नातं अतिशय संथ गतीने पुढे सरकत राहिलं. लांबचा कुठला पल्ला गाठायचा नव्हता, कुठल्या boundaries define करायच्या नव्हत्या, पण एकमेकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मात्र होती. आमच्या आईवडिलांच्या वयाचे किंवा जास्त मोठे असतील ते दोघंही पण आमच्या बाबतीत त्यांच्याकडून कधीच parental भूमिका डोकावली नाही. महिन्यातून २-३ शनिवारी / रविवारी आमची येता जाता भेट व्हायची. जुजबी बोलणं व्हायचं. ते त्यांच्या टेबलवर आणि आम्ही आमच्या मित्र मैत्रिणीनबरोबर किंवा आम्ही तिघंच वेगळ्या टेबलवर असायचो. Self service order घेऊन स्वतःच्या टेबल वर परत जाताना किंवा आवरून घरी जायला निघताना, बिल येऊन हाय म्हणायचा, मग पेगी आणि स्वतःचे टेबल दाखवायचा. बिल इराकडे कौतुकाने बघत, तिच्याशी लपंडाव खेळण्याचा प्रयत्न करायचा,किंवा डोक्यावरच्या टोपीने तोंड झाकून इराला हसवण्याचा प्रयत्न करायचा.पण इराला तो फारसा आवडत नसे. त्यांच्या टेबलाशी बोलायला गेलं की इरा किती बोलते, चालायला/ पळायला लागली का, उंची किती वाढली, तिला काय खेळायला आवडतं ह्याची चौकशी व्हायची. निकीतशी त्यांची फक्त हाय, हेलो पुरतीच ओळख होती. तेव्हा मला निकीतला वाटायचं, त्यांची नातवंड त्यांच्या जवळ नसणार म्हणून इराचे त्यांना इतकं कौतुक असेल.

पण मग माझ्या नकळत इराभवतीचे वलय विस्तारले आणि थोडेसे माझ्या भवती येऊन थांबलंं. मी कशी आहे, Motherhood/parenting चा माझा प्रवास कसा चालू आहे अशी विचारपूस पेगी करायला लागली. मध्येच एखादा स्वतःच्या मुलींचा किस्सा, आठवण सांगायला लागली. मी लिहिते असं कळल्यावर, नवीन काय लिहिणार आहेस, लिहायला वेळ कसा काढतेस, ह्याची विचारपूस ते दोघंही करत. हळूहळू  माझ्या मनातल्या न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळत गेली. पेगीच्या दोन्ही मुली, नातवंड बर्कलीतच राहतात हे कळलं. बिलच्या जुळ्या मुलींचे नाव त्याने शक्ती आणि शांती ठेवले होते; पण त्या वेगळ्या राज्यात राहतात, त्याच्यापासून दुरावलेल्या आहेत हे कळलं. पेगी तिच्या तिशीत असताना, तिच्या दोन मुलींना घेऊन दिल्लीत तब्बल अडीच वर्ष राहिली होती. शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न तिने केला होता आणि अजूनही तिला आणि बिलला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ऐकायला खूप आवडतं. रस्त्यावरच्या टपरीवर कुल्ल्डमधून प्यायलेल्या चहाची ती अनेकदा आठवण काढते.
भारतीय वंशांचे नसून, भारताबद्दल अपार माया असणाऱ्या ह्या दोघांमधला आणि आमच्या मधला दुआ म्हणजे Viks आणि आमचं भारतीय असणं.. हळूहळू Viks मध्ये गेल्यावर आपसूक नजर एकमेकांना शोधायला लागली. पण एकमेकांचा फोन नंबर, घरी येण्याचे आमंत्रण, एकत्र एका टेबल वर बसणे असं काहीही झालं नाही.

आमची ओळख होऊन वर्ष दीड वर्ष झालं असेल पण काही कारणांमुळे आमचं दोन अडीच महिने Viks ला जाणं झालंच नाही.  परत गेलो तेव्हा बिल आणि पेगी पहिल्यांदा आम्हाला पाहून मोठ्या टेबलवर सरकले. त्या दोघांना आम्ही सामोरासमोरच्या खुर्च्या देऊ केल्यास, त्यांनी त्या बदलून ते एकमेकांच्या शेजारी एका बेन्चवर बसले. तसं एकमेकांच्या शेजारी बसायला जाताना त्यांची जी नजरा नजर झाली न, ती त्यांच्या नात्याबद्दल खूप काही सांगून गेली. त्यांची order, आमची order, वेगवेगळीच होती; पण ताटल्या एका हातातून दुसऱ्या हातात फिरल्या. थोडं पोटात गेल्यावर बिलने अचानक गंभीर होत आम्हाला सांगितलं, “ I have a confession to make. Three weeks ago I was in a really bad place, my long time spiritual guide passed away. I couldn't stop the tears, the bouts of crying; nothing helped. After a couple of days in mourning I had the most compelling urge to see you all but I had no way of meeting you, finding you. So I stalked Facebook, but I didn't find you ...I found Amruta's pictures on her sisters wall, but then I started reading one of her posts. It was a poem by a Sufi poet shared on her wall by her spiritual guru. I read it many many times and it gave me peace, it gave me light.” वरवरच्या भेटी आणि बोलण्यानंतर, अध्यात्मिक विहिरीत मारलेली ही उडी दोन क्षण मला आणि निकीतला शांत करून गेली. पेगी आमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे शांतपणे बघत होती, खोल डोहाची शांतता तिच्या डोळ्यात आणि ओठांवर होती, किंवा ती कायमच असेल तशी; मी तिच्याकडे पहिल्यांदा त्या जाणीवेने पाहिलं. पुढे काही बोलण्याच्या आधी बिल ने घसा खाकरून विषय बदलला, “Can I take a picture of you?” आणि त्याने आमचा फोटो काढला...

त्या दिवसा नंतर आम्ही Viks मध्ये अनेकदा जातो ते बिल आणि पेगीला भेटायलाच. गेल्या दोन वर्षात, मुलं, स्थलांतर इत्यादी कारणांमुळे आमच्या Viks मध्ये रंगणाऱ्या कट्ट्यामधली सगळी मंडळी वेगवेगळ्या दिशेला पांगली आहेत. Viks तेच आहे, आमच्या आवडीच्या पदार्थांची किंमत दर वर्षी थोडी वाढली आहे, आणि आमचं कट्टा पण बदलला आहे.

पेगीची मागच्या वर्षी हीप रिप्लेसमेंट झाली त्यानंतर लगेच पुढच्या आठवड्यात ती Viks मध्ये हजर होती, “ घरी विश्रांती घे, बरी कशी होशील?” असं निकीत म्हणाला तेव्हा तिने उत्तर दिलं, “ Viks Is like coming to Church. Good wholesome food, meeting the people we are meant to meet, how can I stay away? My body will heal in its own sweet time..” आम्ही जिथे फक्त पोटोबा भरायला जातो त्याला तिने चर्च वगैरे म्हणून आम्हाला गारच करून टाकलं. पण मग मी पण त्यांच्याबरोबरच्या आमच्या नात्याचा विचार करायला लागले... तिच्या surgery नंतर तिच्या मुलीच्या घरी मी डबा घेऊन गेले होते. पेगीला इतका आनंद झाला होता, ती कौतुकाने स्वतःच्या मुलीला सांगत होती की दुसऱ्या दिवशी मी भारतात चालले आहे तरी मी डबा घेऊन भेटायला आले आहे. तिची मुलगी आंगण झाडत होती, आम्ही कुठे भेटलो, आमची एकमेकांबद्दलची ओढ नक्की काय आहे हे तिला काही केल्या कळत नव्हतं, किंवा तिला ते समजून घ्यायचं नव्हतं. आम्ही दारातूनच निघतो असं म्हटलं तर पेगी हट्टाने तिच्या खोलीत घेऊन गेली . कवर घातलेली पेटी आणि संतूर तिने निकीतला दाखवली. निकीतने पेटीचा एक सूर छेडताच पेगीच्या चेहऱ्यावर जे तेज झळकलं ते मी कधीच विसरणार नाही...पुढे गाणी , शब्द काहीच उमटलं नाही , फक्त तो एकच सूर माझ्या मनात वाजत राहिला...

आज हे लिहायला घेतलं तेव्हा लक्षात आलं की परत त्यांना भेटून महिने होऊन गेले आहेत. शेवटचे भेटलो होतो तेव्हा बिल त्याच्या अंगणाच्या गजांमध्ये अडकलेल्या एका हरणाविषयी सांगत होता. ते हरीण अर्ध अंगणात आणि अर्ध रस्त्यावर होतं. Animal control ने गज फाकवून त्याला अंगणात ढकललं तर त्याला उठताच येयीना. अर्धा तास झाला , त्याच्या कानाशी मोठे आवाज करून झाले. अशा हरणाला सोडून दिलं, तर कुठेतरी रस्त्यात अपघात होऊ शकतो त्यामुळे त्याला मारून टाकणं हेच त्याच्या द्रुष्टीने योग्य ठरेल असं Animal control ला वाटत होतं. बिल चा जीव आम्हाला सांगताना सुद्धा तळमळत होता, डोळे पाणावले होते. त्याने हरणाभवती तात्पुरतं फेन्सिंग केलं आणि हरीण राहूदे त्यात रात्र भर अशी request केली. पहाटे स्वैपाकघरात कॉफ्फी पीत असताना , बिलला ते हरीण फेन्सिंग वर उडी मारून पळत जाताना दिसलं. पेगीने त्याचा हात थोपटला, त्याने तिच्याकडे पोटभर पाहिलं. आम्हला त्या हरणाचे फोटो दाखवले.

बिल आणि पेगीच्या डोळ्यात एकमेकांबद्दल एक हळवेपणा आहे; फक्त प्रेम नाही, हळवेपणा. तो खूप भुरळ घालणारा आहे. ते एकत्र राहत नाहीत, त्यांचं एकमेकांशी लग्न झालेलं नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा खडबडीत रस्त्यांवरचा लांबचा प्रवास होऊन गेलेला आहे, त्या वाटांवरच्या काट्यांचे बोचणे, चुकीच्या वळणाचे बसलेले धक्के, अपेक्षाभंग, स्वप्न पुरती, ध्येयपुरती, घर, कर्ज, मुलं, एक ना अनेक विवंचना पचवूनही, कुण्याएका व्यक्तीच्यासाठी डोळ्यात साठणारं ते हळवेपण मला खूप लोभस,खूप हवं हवंस वाटतं. त्यातून मला ऊर्जा मिळते, उमेद मिळते. वेगवेगळ्या वयात प्रेम कसं असावं ह्याच्या आपल्या कल्पना बदलत असतात...बिल आणि पेगीमुळे मला अजून एक कंगोरा सापडला आहे...चंदेरी केस होतील तेव्हाही माझ्या डोळ्यात हळवेपणा जिवंत ठेवणारा....

काही लोकांचं आपल्या आयुष्यात असणं...नुसतं ते असणं, त्यांचे मोजके शब्द, स्पर्श आणि ते नसतानाही तरळत राहणारा त्यांचा सहवास ..... असं असणं असायलाच हवं ...

तळ टीप: माझ्याकडे बिल पेगीचा फोटो नाही. एक दीड तास त्यांचे चित्र काढण्यात घालवले. इराने ते पाहिल्यावर मला विचारलं, "हे कोण आहेत?" मी म्हटलं बिल आणि पेगी. तर तिने “nope” असं उत्तर दिलं. खरच बिल आणि पेगी असे दिसत नाहीत. पण दोन तास मी त्यांच्या दिसण्याचे, असण्याचे चिंतन करत होते, त्यामुळे त्यांनाही स्वतःच्या फोटोपेक्षा हे चित्रच आवडेल.


Thursday, August 23, 2018

The travelling club of Unicorn Boots

इराची शाळेतली मैत्रीण पिया, Germanyला परत गेली.
तिचे वडील, सेबास्तिअन,वर्षभराच्या कामासाठीच कॅलिफोर्निया मध्ये आले होते; बरोबर बायको लॉटी, पिया,  आणि पियाचा धाकटा भाऊ लेनी. पहिल्या भेटीत सेबास्तिअन आणि निकीत, मी आणि लॉटी , आमची छान तार जुळली.
पिया आणि इराला एकमेकींमध्ये फारसा रस नव्हता. इराला  लेनीशी खेळायला जास्त आवडायचं.  पिया आणि इराची मैत्री अगदी वर्षाच्या शेवटी झाली. Jeans आणि t shirt मध्ये रमणारी इरा , तिला अचानक tutu skirt आवडायला लागले. Lego आणि ट्रेन tracks बरोबर My little pony आणि baking set आवडायला लागला..सगळा प्रभाव पियाचा नव्हता, इतर मैत्रिणीचा पण होता पण तरीही माझ्या मनात असे काय काय विचार येऊन गेले... \
शेवटच्या महिन्यात, साधं बागेतून आपआपल्या घरी परतताना ह्या तिघी चौघी मैत्रिणी एकमेकिंना मिठी मारून, "Bye,Bye, I will miss you " म्हणायला लागल्या. तीन आणि चार वर्षाच्या ह्या मुलींचा एकमेकींना मिठीत घेतलेला घोळका पाहून , बागेतल्या इतर आया " Aww.." ," So cute.." असं काय काय कौतुकाने म्हणायला लागल्या.ते ऐकून ह्यांना आणखीन चेव चढायला लागला, मग खेळता खेळता मध्येच एकमेकांना मिठी मारणे,स्वतःचा आवडता snack एकमेकींना भरवणे, वगैरे....
मैत्रीचा शेवटच्या महिना त्यांनी पुरेपूर उपभोगला.  वेळ संपत आलीय किंवा काही काळाने आपण एकमेकींच्या  हजारो मैल लांब जाणार आहोत, कदाचित मोठ्या होऊ तेव्हा एकमेकींना विसरून जाणार आहोत, असल्या जाणीवा त्या मुलींना अजिबात नव्हत्या.. हे सगळे विचार, दुख इत्यादी मुलींच्या आयांच्या मनात, कधी डोळ्यात तरळत होतं. पिया जाणार तशीच लॉटी जाणार ह्याची मला खंत वाटायला लागली होती ...
जायच्या आदल्या दिवशी आमचा निरोप समारंभसुद्धा मुलींच्या आवडत्या बागेतच झाला. जाता जाता लॉटीने एक फाटकी कापडी पिशवी काढून दिली, त्यात पियाचे गुलाबी बूट, अगदी  girly pink rain boots होते. मी कधीही बाजारातून निवडून आणले नसते असे ते बूट. त्या गुलाबी बुटांवर unicorns. इरा ,पियापेक्षा लहान आहे, तर तिला ते येणाऱ्या पावसाळ्यात वापरता येतील म्हणून लॉटीने ते मला दिले. मुली एकमेकींना मिठ्या मारून रडल्या नाहीत पण आम्ही दोघी मात्र रडलो....
पिया गेली त्यानंतर शाळा सुरूच होती. एक दोन दिवस पियाचं नसणं इराला खटकलं नाही. पण मग ती Germany होऊन कधी येणार? ती, तिच्या आजा, अब्बूला भेटून, इरासार्खीच परत Berkeleyला येणार, असे वेगवेगळे निष्कर्ष इराच्या मनात घोळायला लागले. मग चार दिवसांनी, भर उन्हाळ्यात तिला shorts खाली rain boots घालून बाहेर जावसं वाटायला लागलं...
आता ह्या गोष्टीला दोन महिने होत आले आहेत.आम्ही भारतातून परत गेलो, शाळा सुरु झाली की पिया पण शाळेत परत येणार अशी इराची समजूत आहे. तिला कितीही संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं तरी तात्पुरतं तिला पटतं मग काही दिवसांनी पुन्हा ते चक्र सुरु होतं.
इरा शाळेत गेली आणि पिया आली नाही की कदाचित तिचा खूप मोठा भ्रमनिरास होईल, तिला त्रास होइल, कदाचित तिला लोकांचे देशांतर थोडेसे उमगायला लागेल... तिने काल तिच्या अब्बुला सांगितलेही," अब्बू मी berkeley मध्ये गेल्यावर तू मला भेटणार नाहीस...." काहीतरी तुटेल, घडेल ...इरा अजून थोडी मोठी होईल..
खरतर Unicorns खरे नसतात हे मुलांना पण खूप लवकर उमगत असतं. पण तरीही त्यांच्या आयुष्यात unicorns असणं खूप महत्वाचं असतं. अशा unicorns सारख्याच , मनाच्या नाजूक कोपऱ्यात ठेवलेल्या, इतर जगाला अवास्तव वाटणाऱ्या गोष्टी, मित्रांपुढे आपसूक मांडल्या जातात, कधीकधी मित्रांमुळेच आपल्या भाव विश्वात येऊन त्या अवास्तव कल्पना विसावतात, कधी पंख पसरून उडून जातात...
Unicornsची गरज काही वेळा मुलांपेक्षा जास्त आपल्याला असते, कदाचित लॉटीने ते ओळखून मला ते बूट दिलेले असणार....

अंबाडी पुराण

( 1. माझ्या अंगणातला रेड रिबन सोरेल. २. रोजेल म्हणजे अंबाडीचे झाड.३. स्विस चार्ड ४.डँडेलीअन ५. खऱ्या अंबाडीची भाजी.६. रेड रिबन सोरेल ची भाजी, ज्वारीची उकडीची भाकरी, ठेचा, ताक)

२०१४ सालच्या ऑक्टोबर मध्ये, सात महिन्यांची pregnant असताना अमेरिका ते पुणे प्रवास करून आल्यावर, आईने विचारलं होतं," काय खावंसं वाटतंय?" डोहाळे वगैरे काहीही नव्हते. भाकरी खावीशी वाटायची. पालक, मेथी, kale, standard पालेभाज्या खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे बिनधास्त ठोकून दिलं, "अंबाडीची भाजी- भाकरी खावीशी वाटते आहे!" 
तसं पहायचं झालं तर त्यावेळेला पुणं सुटून पाच सहा वर्ष झाली होती आणि त्या पाच सहा वर्षात, भारतवारी दर वर्षी घडली असली तरी अंबाडीची आस बीस मनाला लागली नव्हती. आई खूपच छान अंबाडीची भाजी करते पण डोहाळे पुरवण्यासाठी चौकशी करेपर्यंत, मनातल्या यादीत अंबाडीचा सहभाग नव्हता. पण तेव्हा बोलून गेले आणि मग अंबाडीचा आणि माझा एक छान प्रवास सुरु झाला. अर्थातच त्या माझ्या तीन आठवड्याच्या सुट्टीत अंबाडी काही मिळाली नाही. चंदनबटवा, केळफुल अगदी कोकणातून फणस येऊन त्याची भाजी माझ्या पोटात गेली पण दोन्ही आय्यांना बाजारात अंबाडी मिळाली नाही...
२०१५ मध्ये ८ महिन्याच्या मुलीला घेऊन पुण्यात आले आणि वर्षाच्या प्रतीक्षेनंतर finally माझ्या ताटात डाळ-तांदूळकण्या-दाणे-मेथीचे दाणे घातलेली आणि वरून चुरचुरीत लसणाची आणि लाल मिरचीची फोडणी घातलेली, जिभेला ambrosia चा प्रत्यय देणारी अंबाडीची भाजी आणि लोण्याच्या गोळ्याने सजवलेली ज्वारीची भाकरी पडली. पहिला घास घेतल्यावर, कढईत नक्की किती भाजी आहे हे पाहत असतांना दाराची बेल वाजली. इराला आणि मला भेटायला माझे कॉलेजमधले मित्र मैत्रिणी दारात उभे. दारातच कळलं अंबाडीचे अनेक वाटे पडलेत..त्यानंतरच्या पुण्यातल्या खाद्य दौऱ्यात अंबाडीचा योग परत आला नाही.
२०१६ मध्ये भारतात येणं झालं नाही. मे -जून मध्ये कळलं की यंदा भारत वारी नाही, मग अचानकसा एक विरह जाणवायला लागला. आणि चक्क सिनेमात किंवा नाटकात प्लॉट पाँइंट असतो ना तसाच,  Berkley मधल्या एका भारतीय मैत्रीणीने डब्ब्यात अंबाडीची भाजी आणून दिली. मनात विचार आला की सलाड, टोमॅटो, भोपळा, मटार, पालक, मेथीच्या जोडीला बागेत एक अंबाडीचं रोप लावावं. मग google वर शोध. आणि आजच्या जगात माझ्यासारखी वेनधळी मीच असणार अंबाडी म्हणजे रोजेल, पण मी आणले सोरेल. रोजेल- सोरेल ...गंगारांनी-जमनारानी. Mistaken identity..
पण गम्मत इथेच संपली असती तर पुराण ते काय ? अतिशय देखण्या लाल रेषा असणारं, हिरव्या पानाची दोन रोपं माझ्या half wine barrel मध्ये जोमाने वाढायला लागली. त्याची कोवळी पानं आंबट जास्त, ती म्हणे फ्रेंच आणि विएतनामिज लोकं सूप आणि स्टू करायला वापरतात असं रोपाच्या माहितीपत्रावर लिहिलेलं वाचलं होतं. अंबाडीचे अंतरराष्ट्रीय स्थान पाहून खूप भारी वाटलं. ( (डोक्यात हेच ते अंबाडीच अमेरिकन भावंडं म्हणून मी स्वीकारलेल.)मग आलेल्या गेलेल्या सगळ्यांना अंगणातली ही दोन रोपटी मी न चुकवता दाखवायचे. पहिली भाजी करताना सगळी कोवळी पानं तोडताना जीवावर आलं, पण रोपं अजून जोमाने वाढली. मग आमच्या मराठी मित्र मैत्रिणींच्या पार्टी, जेवणांना मी मुद्दाम अंबाडीची भाजी करून न्यायला लागले. इतकी की कुणाला वाटावं मला इतर कुठली भाजी येत नाही.( ही अतिशयोक्ती आहे हे समजून घ्यावे :) ) एकदा तर माझी उस्मानाबादची मैत्रीण Boston ला तिच्या भावाला भेटायला येणार हे कळल्यावर मी विमानातून पिशवीभर घरची' अंबाडी' घेऊन गेले. त्या पिशवीचे १०० ग्राम सोन्यापेक्षा जास्त अदबीने स्वागत झाले. मी माझी अमेरिकेतल्या अंगणातली अंबाडी मिरवत राहिले. साधारण वर्षभाराने लक्षात आलं की मोठी किंवा जून पानं तितकीशी आंबट नाहीत. भाजीत चक्क चिंच घालावी लागली दोनदा. तरीही माझे डोळे उघडले नाहीत.
अखेर साक्षात्काराची घडी आली. मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन तिला गरम स्वैपाक करून वाढायचे ठरवले होते. बरोबर कुठ्ली भाजी? अर्थात अंबाडी, पण 'अंबाडीची' पानं ह:) गप्पा मारत, wine पीत सगळ्यांनी मिळून स्वैपाक करायचा, असं ठरलेलं. Climax जरा anti climatic होता. भाजी झाल्यावर त्यात घालायला चिंच मागितल्यावर ताईने मला वेड्यात काढणारा कटाक्ष टाकला. मग नव्याने google research झाला. गंगारानी, जमनारानी समोरासमोर उभ्या ठाकल्या wikipedia च्या पानांवर. सोरेल आणि त्यात रेड रिबन सोरेल म्हणजे सध्याचे नवीन ग्रीन सुपरफूड, Vitamin A&C, आणि potassium भरपूर, शिवाय दिसायला देखणे ( मी ह्या कशासाठीच ते आणलं नव्हतं, पण ते माझ्या पदरात आपसूक पडलं होतं). नवीन पालेभाजी पानात करून वाढल्याबद्दल माझं कौतुक झालं. पण माझा किती मोठा पोपट झालाय हे मला कळत होतंच की ! 
जिभेच्या कक्षा अजून रुंद करायला मग मी स्विस चार्ड आणि डँडेलीअन ह्या दोन अजिबात आंबट नसणाऱ्या पालेभाज्यांची अंबाडीची भाजी सारखी म्हणजे डाळ-तांदूळ कण्या-मेथीचे दाणे- शेंगदाणे घालून भाजी केली, वरून चमचा दीड चमचा चिंचेचा कोळ, लसूण -लाल मिरचीची फोडणी. 
ह्या दोन-अडीच वर्ष घडत असणाऱ्या अंबाडी पुराणात मला माझ्या परदेशातल्या वास्तव्याबद्दल खूप महत्वाची शिकवण मिळाली. स्वतःचा प्रांत किंवा देश सोडून गेल्यावर, जशी आपल्या घरची, मित्र मैत्रीणींची कमी जाणवत राहते, एक पोकळी निर्माण होते; ती पोकळी नवीन देशातल्या माणसांनी भरता येत नाही. पण आपल्याच आत एक नवीन अवकाश निर्माण होतं नवीन लोकांना सामावून घ्यायला. ज्या खाद्यसंस्कृतीवर आपला पिंड पोसलेला असतो, माहेर-सासरची समृद्ध खाद्यसंस्कृती जिभेवर तरंगळत असते, ती पोकळी नवीन खाद्यसंस्कृतीने भरून काढणं अशक्य आहे. एक नवीन अन्नपूर्णा पुजायला लागते, आजी-आईकडे शिकलेल्या क्लुप्त्या स्वतःच्या अनुभवांवर, नवीन प्रांतातल्या देणग्या, नवीन खाद्यसंस्कृती अभ्यासून, पारखून, त्यातूनच एका नवीन सुगरणीचा जन्म होत असतो. ह्या शोधाच्या मार्गावर निघाल्यावर, तिथेच कुठेतरी Fusionचा जन्म होतो का? 
२ ऑगस्ट २०१८ला मुंबईत पोचले. मैत्रिणीला आठवडा आधी खरी 'अंबाडी' आणून ठेवायला सांगितली होती. तिचा सहा महिन्याचा मुलगा, माझी साडे तीन वर्षाची मुलगी, jetlag, रात्र भर गप्पा; धुवून निवडून ठेवलेली अंबाडी असून सुद्धा आम्ही रडेपणा करून भाजी करणार नव्हतो. पण मग राहवलं नाही. खोचायला पदर नव्हते पण तरीही कामाला लागलो. शिळा भात, गुळ घालून सारखं केलेलं वरण, microwave मध्ये शिजवलेले शेंगदाणे आणि मेथीचे दाणे. कांदा परतत असताना चिरलेली अंबाडी. आई जेवायला बसल्यावर रडायला लागलेलं आमचं सहा महिन्याचं तान्हुलं...मला वाटलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं, माझ्यासाठी. 
अंबाडीच्या शोधत सोरेल, चार्ड, डँडेलीअनची भर आमच्या खाद्यविश्वात पडली...ती शिकण्याची सुरुवात आहे, अजून शिकलेलं बरच काही पुन्हा कधीतरी....... 


Wednesday, August 15, 2018

Sacred Spaces

Mumbai.Damp,musty,foul smells exaggerated by the rains ,cramped spaces,endless ebb and flow of traffic,harsh honking every other second, half constructed ghost bridges,toxic fumes, dreary gray skies,overwhelming crush of humanity. I had a epiphany about the need and consumption of escapist cinema,for at the end of the day I yearned for it too.
Mumbai, a city I have had a love and hate relationship with ,was the last place I had imagined would have the power to calm the storm that resides within...
But surprisingly,for my first solo trip (away from family in a long, long time) I found peace in this insomniac city..
Met mentors,teachers,friends that I hadn't seen in years.And with them they brought a part of me that I hadn't seen in years,  words and aspirations that I had forgotten,half baked dreams,disillusionment...Seeing these bits of myself in the eyes of people I love and respect, but who live and are part of a world I don't inhabit was liberating...It was like going on a treasure hunt, looking for those sacred places,that I have lost, parts of me floating, residing, in a city that I hadn't much cared for before.
I am blessed to have these sacred places,indebted to the people who carry them.. I have no identity in Mumbai; a faceless nobody like a thousand others in the crowd, yet it has absorbed something precious from me,kept it floating..That's the allure of the city I guess, it will tempt me to keep coming back to claim and build on the sacred places that I have left behind.