( 1. माझ्या अंगणातला रेड रिबन सोरेल. २. रोजेल म्हणजे अंबाडीचे झाड.३. स्विस चार्ड ४.डँडेलीअन ५. खऱ्या अंबाडीची भाजी.६. रेड रिबन सोरेल ची भाजी, ज्वारीची उकडीची भाकरी, ठेचा, ताक)
२०१४ सालच्या ऑक्टोबर मध्ये, सात महिन्यांची pregnant असताना अमेरिका ते पुणे प्रवास करून आल्यावर, आईने विचारलं होतं," काय खावंसं वाटतंय?" डोहाळे वगैरे काहीही नव्हते. भाकरी खावीशी वाटायची. पालक, मेथी, kale, standard पालेभाज्या खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे बिनधास्त ठोकून दिलं, "अंबाडीची भाजी- भाकरी खावीशी वाटते आहे!"
तसं पहायचं झालं तर त्यावेळेला पुणं सुटून पाच सहा वर्ष झाली होती आणि त्या पाच सहा वर्षात, भारतवारी दर वर्षी घडली असली तरी अंबाडीची आस बीस मनाला लागली नव्हती. आई खूपच छान अंबाडीची भाजी करते पण डोहाळे पुरवण्यासाठी चौकशी करेपर्यंत, मनातल्या यादीत अंबाडीचा सहभाग नव्हता. पण तेव्हा बोलून गेले आणि मग अंबाडीचा आणि माझा एक छान प्रवास सुरु झाला. अर्थातच त्या माझ्या तीन आठवड्याच्या सुट्टीत अंबाडी काही मिळाली नाही. चंदनबटवा, केळफुल अगदी कोकणातून फणस येऊन त्याची भाजी माझ्या पोटात गेली पण दोन्ही आय्यांना बाजारात अंबाडी मिळाली नाही...
२०१५ मध्ये ८ महिन्याच्या
मुलीला घेऊन पुण्यात आले आणि वर्षाच्या प्रतीक्षेनंतर finally माझ्या ताटात डाळ-तांदूळकण्या-दाणे-मेथीचे
दाणे घातलेली आणि वरून चुरचुरीत लसणाची आणि लाल मिरचीची फोडणी घातलेली, जिभेला ambrosia
चा प्रत्यय देणारी अंबाडीची भाजी आणि लोण्याच्या गोळ्याने सजवलेली ज्वारीची भाकरी
पडली. पहिला घास घेतल्यावर, कढईत नक्की किती भाजी आहे हे पाहत असतांना दाराची बेल वाजली.
इराला आणि मला भेटायला माझे कॉलेजमधले मित्र मैत्रिणी दारात उभे. दारातच कळलं
अंबाडीचे अनेक वाटे पडलेत..त्यानंतरच्या पुण्यातल्या खाद्य दौऱ्यात अंबाडीचा योग
परत आला नाही.
२०१६ मध्ये भारतात येणं
झालं नाही. मे -जून मध्ये कळलं की यंदा भारत वारी नाही, मग अचानकसा एक विरह जाणवायला
लागला. आणि चक्क सिनेमात किंवा नाटकात प्लॉट पाँइंट असतो ना तसाच, Berkley मधल्या एका भारतीय मैत्रीणीने डब्ब्यात
अंबाडीची भाजी आणून दिली. मनात विचार आला की सलाड, टोमॅटो, भोपळा, मटार, पालक, मेथीच्या
जोडीला बागेत एक अंबाडीचं रोप लावावं. मग google वर शोध. आणि आजच्या जगात माझ्यासारखी वेनधळी मीच असणार अंबाडी म्हणजे रोजेल, पण मी आणले सोरेल. रोजेल- सोरेल ...गंगारांनी-जमनारानी. Mistaken identity..
पण गम्मत इथेच संपली असती तर पुराण ते काय ? अतिशय देखण्या लाल रेषा असणारं, हिरव्या पानाची दोन रोपं माझ्या half wine barrel मध्ये जोमाने वाढायला लागली. त्याची कोवळी पानं आंबट जास्त, ती म्हणे फ्रेंच आणि विएतनामिज लोकं सूप आणि स्टू करायला वापरतात असं रोपाच्या माहितीपत्रावर लिहिलेलं वाचलं होतं. अंबाडीचे अंतरराष्ट्रीय स्थान पाहून खूप भारी वाटलं. ( (डोक्यात हेच ते अंबाडीच अमेरिकन भावंडं म्हणून मी स्वीकारलेल.)मग आलेल्या गेलेल्या सगळ्यांना अंगणातली ही दोन रोपटी मी न चुकवता दाखवायचे. पहिली भाजी करताना सगळी कोवळी पानं तोडताना जीवावर आलं, पण रोपं अजून जोमाने वाढली. मग आमच्या मराठी मित्र मैत्रिणींच्या पार्टी, जेवणांना मी मुद्दाम अंबाडीची भाजी करून न्यायला लागले. इतकी की कुणाला वाटावं मला इतर कुठली भाजी येत नाही.( ही अतिशयोक्ती आहे हे समजून घ्यावे :) ) एकदा तर माझी उस्मानाबादची मैत्रीण Boston ला तिच्या भावाला भेटायला येणार हे कळल्यावर मी विमानातून पिशवीभर घरची' अंबाडी' घेऊन गेले. त्या पिशवीचे १०० ग्राम सोन्यापेक्षा जास्त अदबीने स्वागत झाले. मी माझी अमेरिकेतल्या अंगणातली अंबाडी मिरवत राहिले. साधारण वर्षभाराने लक्षात आलं की मोठी किंवा जून पानं तितकीशी आंबट नाहीत. भाजीत चक्क चिंच घालावी लागली दोनदा. तरीही माझे डोळे उघडले नाहीत.
अखेर साक्षात्काराची घडी आली. मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन तिला गरम स्वैपाक करून वाढायचे ठरवले होते. बरोबर कुठ्ली भाजी? अर्थात अंबाडी, पण 'अंबाडीची' पानं ह:) गप्पा मारत, wine पीत सगळ्यांनी मिळून स्वैपाक करायचा, असं ठरलेलं. Climax जरा anti climatic होता. भाजी झाल्यावर त्यात घालायला चिंच मागितल्यावर ताईने मला वेड्यात काढणारा कटाक्ष टाकला. मग नव्याने google research झाला. गंगारानी, जमनारानी समोरासमोर उभ्या ठाकल्या wikipedia च्या पानांवर. सोरेल आणि त्यात रेड रिबन सोरेल म्हणजे सध्याचे नवीन ग्रीन सुपरफूड, Vitamin A&C, आणि potassium भरपूर, शिवाय दिसायला देखणे ( मी ह्या कशासाठीच ते आणलं नव्हतं, पण ते माझ्या पदरात आपसूक पडलं होतं). नवीन पालेभाजी पानात करून वाढल्याबद्दल माझं कौतुक झालं. पण माझा किती मोठा पोपट झालाय हे मला कळत होतंच की !
जिभेच्या कक्षा अजून रुंद करायला मग मी स्विस चार्ड आणि डँडेलीअन ह्या दोन अजिबात आंबट नसणाऱ्या पालेभाज्यांची अंबाडीची भाजी सारखी म्हणजे डाळ-तांदूळ कण्या-मेथीचे दाणे- शेंगदाणे घालून भाजी केली, वरून चमचा दीड चमचा चिंचेचा कोळ, लसूण -लाल मिरचीची फोडणी.
ह्या दोन-अडीच वर्ष घडत असणाऱ्या अंबाडी पुराणात मला माझ्या परदेशातल्या वास्तव्याबद्दल खूप महत्वाची शिकवण मिळाली. स्वतःचा प्रांत किंवा देश सोडून गेल्यावर, जशी आपल्या घरची, मित्र मैत्रीणींची कमी जाणवत राहते, एक पोकळी निर्माण होते; ती पोकळी नवीन देशातल्या माणसांनी भरता येत नाही. पण आपल्याच आत एक नवीन अवकाश निर्माण होतं नवीन लोकांना सामावून घ्यायला. ज्या खाद्यसंस्कृतीवर आपला पिंड पोसलेला असतो, माहेर-सासरची समृद्ध खाद्यसंस्कृती जिभेवर तरंगळत असते, ती पोकळी नवीन खाद्यसंस्कृतीने भरून काढणं अशक्य आहे. एक नवीन अन्नपूर्णा पुजायला लागते, आजी-आईकडे शिकलेल्या क्लुप्त्या स्वतःच्या अनुभवांवर, नवीन प्रांतातल्या देणग्या, नवीन खाद्यसंस्कृती अभ्यासून, पारखून, त्यातूनच एका नवीन सुगरणीचा जन्म होत असतो. ह्या शोधाच्या मार्गावर निघाल्यावर, तिथेच कुठेतरी Fusionचा जन्म होतो का?
२ ऑगस्ट २०१८ला मुंबईत पोचले. मैत्रिणीला आठवडा आधी खरी 'अंबाडी' आणून ठेवायला सांगितली होती. तिचा सहा महिन्याचा मुलगा, माझी साडे तीन वर्षाची मुलगी, jetlag, रात्र भर गप्पा; धुवून निवडून ठेवलेली अंबाडी असून सुद्धा आम्ही रडेपणा करून भाजी करणार नव्हतो. पण मग राहवलं नाही. खोचायला पदर नव्हते पण तरीही कामाला लागलो. शिळा भात, गुळ घालून सारखं केलेलं वरण, microwave मध्ये शिजवलेले शेंगदाणे आणि मेथीचे दाणे. कांदा परतत असताना चिरलेली अंबाडी. आई जेवायला बसल्यावर रडायला लागलेलं आमचं सहा महिन्याचं तान्हुलं...मला वाटलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं, माझ्यासाठी.
अंबाडीच्या शोधत सोरेल, चार्ड, डँडेलीअनची भर आमच्या खाद्यविश्वात पडली...ती शिकण्याची सुरुवात आहे, अजून शिकलेलं बरच काही पुन्हा कधीतरी.......
No comments:
Post a Comment