मी कधीतरी आठरा -एकोणीस वर्षाची असतांना Sydney Sheldon चे Tell Me Your dreams नावाचं पुस्तक वाचलं होतं.त्यावेळेला, ही Multiple personality disorder बद्दल असणारी कादंबरी वाचून मी खूप भारावून गेले होते. त्यानंतर वर्ष दीड वर्षांनी माझ्या बहिणीकडे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाला जाऊन आल्यावर , तिथल्या त्या creative वातावरणाची झिंग चढल्यासारखं झालं. मला एकदम नाटक लिहावसं वाटायला लागलं. आमच्या घरात फक्त 'काहीतरी लिहायचं आहे .." असं सांगून चालत नसे . घरातल्या इतर चौघांनी उलट तपासणी घेण्याची तयारी ठेवावी लागे. त्यामुळे प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर आधी अभ्यास करायला हवा, म्हणजे " अभ्यासपूर्वक निर्णय " घेतला आहे असं सांगायला मोकळी. असं न केल्यास चार वेगवेगळ्या स्वभावाची अत्यंत हुशार माणसं , त्यांचे दृष्टीकोन, त्यांच्या सूचना समोर मांडून मला confuse करू शकतात ह्याची कल्पना होती. पहिली एकांकिकाच Multiple Personality Disorder , ज्या बद्दल मला काही माहिती नाही , psychology चा काही अभ्यास नाही , तरीही त्याबद्दलच लिहायची ठरवलेली असली, तरी अभ्यास होईपर्यंत त्याबद्दल काही बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं. अभ्यास करण्यासाठी मी बाबांचं ब्रिटीश काउन्सिल लायब्ररी चे कार्ड घेऊन पुस्तकं शोधायला गेले. clinical pshychology ची मोठी मोठी काही पुस्तकं आणून वाचायला लागले. सिनेमात कसे नायकाला आई असते किंवा बाबा नाही, किंवा कुणीतरी एक अपघातात गेलेलं असतं, कुणीतरी हरवलेलं असतं किंवा आजारी असतं , तशी काहीतरी दुखःमय परिस्तिथी माझ्या नायिकेची असणं गरजेचं होतं. तिच्या लहानपणी काहीतरी इतकं धक्कादायक झालंय की त्यामुळे MPD झालंय असा माझा निष्कर्ष होता. म्हणून मी ठरवलं की नायिकेची आई कुणाबरोबर तरी पळून गेली आहे, आणि त्यामुळे सामाजिक मानहानी होऊन वडिलांनी आत्महत्या केली आहे - अशी नायिकेची Backstory रचायची. तिचे alters किंवा multiple personalities हे तिचे आई वडीलच आहेत आणि एकांकिकेमध्ये ती त्यांच्याशी संवाद साधते. आता १९ वर्षाच्या मुलीच्या लिखाणासाठी हे खूप dark होतं, ढोबळ वरवरचं असलं तरी. पात्रांची मानसिकता उभी करण्यासाठी केलेल्या 'अभ्यासात', माणसांच्या आत लपलेल्या dark, विकृत ,दुष्ट विचारचक्रांनी ग्रासून मी पण थोडी भ्रष्ट झाले ,असं वाटलं. भ्रष्ट अशा साठी की ह्या पूर्वी त्या मानेने बाळबोध असणाऱ्या माझ्या भावविश्वात, विचार चक्रात ही नवीन न पुसून टाकता येणारी माहिती कोरली गेली होती. विकृतमनोवृत्ती माणसं सर्रास आपल्याभावती फिरत असतात आणि जगातली सगळं लोकं 'चांगली ' अजीबात असत नाहीत- अशा ठाम निष्कर्षाला मी पहिल्यांदाच पोचले होते.
एकांकिकालेखनाचे विषय निवडताना, the world could have been my Oyster, but I chose this!
तेव्हा मला पहिल्यांदा ' आपण ह्यांना पाहिलत का ' अशा अगदी छोट्या फोटो सहित, दोन वाक्यात माहिती दिलेल्या जाहिराती पेपरात येतात ह्याची जाणीव झाली. नयिका अशी कात्रणं काढून एक scrapbook बनवत असते.. ती एकांकिका संपली तरीही लोकं हरवण्याची, गायब होण्याची , कधीही परत न येणारी लोकं, ही जी कल्पना आहे ती मला डोक्यातून कधी पूर्ण काढूनच टाकता आली नाही. त्यांच्या घरच्यांचे काय होत असेल, काय सांगून घरातली लोकं स्वतःची समजूत काढत असतील? किती वर्ष वाट बघत असतील? नवस, तायीत, जप , मंत्रपूजन, केल्याने लोकं परत येत असतील का ? एखादा माणूस हरवला आणि त्याच्या कुटुंबाला राहतं घर सोडावं लागलं तर ? कायद्याचा अभ्यास करत असतांना लग्न , जमीन- जुमला ह्या सगळ्या बाबतीत एखादा माणूस सात वर्ष बेपत्ता असेल तर काय करायचं ह्यासाठी कायदे आहेत - जणू लोकांचे असं बेपत्ता होणं हे गृहीतच धरलेलं आहे ! Its an accepted eventuality...
ह्या एकांकिकेनंतर २-३ वर्षांनीच माझा एक खूप जवळचा मित्र ,एका संध्याकाळी , 'मी अमृताकडे जाऊन येतो , मित्रांना भेटून येतो " असं घरी सांगून निघाला तो परतच गेला नाही. मला फोन आला तेव्हा शहरायला झालं. २०- २५ दिवस मनात काहूर माजून राहिलं . घरचे, मित्र मैत्रिणी, सगळ्यांबरोबर हसत खेळत राहणारा , निर्व्यसनी, हुशार मुलगा असा का गेला असेल? कशामुळे दुखावला गेला असेल का ? आम्ही सगळेच मित्र खूप घाबरून गेलो होतो , माझ्या मनात नाटकाच्या वेळेला लपवून ठेवलेली भीती दाटून आली. एक २० -२५ दिवसांनी पोलिसांना तो सापडला आणि घरी आला पण आम्ही आज पर्यंत कधीही त्या दिवसांबद्दल बोललेलो नाही. कधीतरी मैत्रीत ही सल खुपते , पण त्यापेक्षा तो सही सलामत आहे हे खूप जास्त मौल्यवान आहे. पुस्तकात , वर्तमान पत्रात वाचलेल्या ऐकीव गोष्टी सत्यात अशा उतरतात त्यावेळेला त्याचा धक्का जास्त बसतो.
माझा भाचा आणि भाची माझ्या जवळ अमेरिकेत राहिला आल्यावर असाच एक प्रसंग घडला. एक दिवस nanny ला जमणार नाही आणि सरब ला meetings असल्यामुळे, मी कबीरला शाळेतून आणायला गेले होते. तसं त्याच्या शाळेत आणि त्यालाही सांगितलेलं होतं. मी वेळेत जाऊन शाळेच्या दाराबाहेर हजर झाले. त्याच्या शाळेत वर्गानुसार मुलं बाहेर curb वर येऊन उभी राहत आणि आई -वडील /nanny त्यांना कार मध्ये बसवत. Speakers मधून कुठला वर्ग चालू आहे , नंतरचा कुठला आहे , अशी सगळी माहिती देत होते. कबीर चा वर्ग पुकारून , मुलं येऊन निघून गेली. पुढचा वर्ग पुकारायला सुरुवात झाल्यावर मी घाबरले. पळत त्यांच्या office मध्ये गेले. खूप शांतपणे receptionistने वर्गशिक्षिकेला फोन केला, त्या वर्गातून निघाल्या होत्या म्हणून मग library मध्ये फोन केला. कबीरला रेंगाळण्याची सवय होती...पण तेव्हा मात्र कबीर कुठेच नव्हता. मला दरदरून घाम फुटला. शाळा घरा जवंळ असली तरी कबीर एकटा शाळेतून घरी कधीच चालत जात नसे. School administrator, curb duty वर असलेले पालक , सगळेच काय करायचं ह्याची चर्चा करत होते. तेवढ्यात कुणालातरी आठवलं की पांढरी पगडी घातलेला एक मुलगा एका पांढऱ्या गाडीत बसून गेला होता. कुठली पांढरी गाडी? कुणाची गाडी? गाडी कोण चालवत होतं ? बाकी काहीही सांगता येत नव्हतं. शाळेतून सरबला फोन लावला गेला , मला घरी जाऊन थांबायला सांगितलं आणि दोन तासात काही पत्ता लागला नाही तर बघू असं शाळेतल्या Resource officer ( security officer) ने मला सांगितलं. पुढे नको त्या शक्यता डोक्यातून परतत लावत ,वाट बघत घालवलेला पाउण एक तास मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. रडवेला चेहरा खांद्यात लपवत कबीर त्याच्या nanny आणि मित्राबरोबर घरी परतल्यावर , त्याला मी फक्त घट्ट मिठी मारली. मित्राशी खेळायला तो गेला होता , sorry म्हणाला..But I felt sorry for him. त्याच्या आयुष्यात त्यापूर्वी राक्षस, हिंसा, लहान मुलांबरोबर होऊ शकणारे गैरप्रकार, हे फक्त खेळात , comics किंवा सिनेमामध्ये असतील अशा शक्यता . पण ह्या प्रसंगामुळे -त्याला इतक्या शक्यतांची जाणीव करून देण्यात आल्यामुळे , त्याच्या सुरुक्षित विश्वाची उब थोडी कमी झाली असेल त्या दिवशी . I think he must have lost some of his innocence that day..
ह्या missing ह्या प्रकाराबाबत माझ्या संवेदना तीक्ष्ण झाल्या आहेत, म्हणून असेल कदाचित ,पण मला आता आपल्या रोजच्या आयुष्यात पण तो एक Pattern असल्यासारखा जाणवू लागलाय... लहान मुल मोठं होतं, त्यावेळेला त्याचं बाळसं नाहीसं होतं, पौगंडावस्थेतील मुलं मुलींचं एकमेकांबरोबर खेळणं, मुळात मुलींचं खेळणं नाहीसं होतं, कॉलेजमध्ये पाहिलेली अवास्तव स्वप्न कामाला लागल्यावर हळू हळू रेंगाळत नाहीशी होतात, लोकांना एकमेकांबद्दल वाटणारा आदर , प्रेम छोट्याश्या भांडणावरून नाहीसं होऊन जातं, काही वेळेला परत मिळतही ते , माझा मित्र नाही का आला परत ? तसच कधीतरी प्रेम आणि आदर परत मनात येतात , वाटायला लागतात. कदाचित," I miss you" म्हणत असतांना आपण समोरच्या व्यक्तीमधली हरवून गेलेली पण आपल्याला प्रिय असलेली त्याची सवय , कृती, स्पर्श आठवून त्याला ते 'I miss you' मधून सांगत असतो. काही वेळेला शारीरिक क्षमता नाहीश्या होऊन जातात, अल्झायमर सारखा आजार झाल्यावर , माणूस तर समोर असतो, पण आपल्या ओळखीचा माणूस निरोप न घेताच नाहीसा झालेला असतो. मला वाटतं, की शेवटच्या पूर्ण गायब, नाहीसं होण्या आधी, ही आपली कुडी , आपलं व्यक्तिमत्व, थोडे थोडे आपल्यातलेच तुकडे हरवत जात असतात, त्या जागी आपण नवीन तुकडे Fit करण्याच्या प्रयत्नात असतो -म्हणून आपल्याला हा सतत तुकडे हरवत जाण्यचा खेळ जाणवत नाही.
No comments:
Post a Comment