facebook

Tuesday, July 31, 2018

भूक लाडू तहान लाडू ...

इराला घेऊन पुण्याला निघाले आहे. तिला एअरपोर्टवर पिझ्झा,पास्ता,कपकेक,फ्राइज इत्यादी आवडत असलं तरी घरची,मुगाची डाळीची खिचडी आणि तूप असा डबा बरोबर घ्यायलाच लागतो. प्रेक्षणीय स्थळासारखे, घरातले भूक लाडू तहान लाडू घेतल्याशिवाय सहल किंवा पिकनिकला अर्थ नाही हे तिने आत्तापासूनच ओळखलं आहे:).
आज तिच्यासाठी डबा भरताना आईची, खरं दोन्ही आयांची आठवण झाली. पुण्याहून निघताना घरातून करून घेतलेले पोळी /दशमी चटणीचे रोल त्या अमेरिकेत घरी पोचेपर्यंत छान मुरलेले असतात.अर्थात त्या त्यांच्यासाठी डबा भरताना जरा जास्तच भरतात. स्वतःसाठी नाही, तर थोडा आम्हाला आल्यावर मिळेल म्हणून. मग अमेरिकेतल्या घरी पोचल्यावर आपण आईच्या हातात गरम चहा दिल्यावर, तिने घरून आणलेल्या त्या पोळीचा रोल आपण खायचा. मग आईच्या चेहऱ्यावर जे समाधान झळकतं ते कमाल असतं..हे समाधान पुढे काही दिवस कायम राहतं. मग परतीच्या प्रवासाला दहा पंधरा दिवस उरले की प्रचंड चुळबुळ सुरु होते. घरात बायका येऊन काम करून गेल्या असतील ना, आमची वडील मंडळी ठीक ठाक जेवली असतील ना ? फ्रीज, वाण सामानाची काय बिकट परिस्थिती असेल ? दोन्ही बाबांना घरात आई नसेल तर, जेवणासाठी काय काय पदार्थ करून ठेवलेत ह्याची एक मोठ्या अक्षरातली चिट्टी लिहून ठेवावी लागते.नाहीतर भाजी, आमटी ,कोशिंबीर, भात, पोळी सगळं असूनही, दही साखर खाल्ली, दूध पोहे खाल्लेले, असं काहीही होऊ शकतं.अशा पार्श्वभूमीमुळे, महिनाभर ह्या वडील मंडळींवर घर सोडायचं म्हणजे आया सॉलिड टेन्शन घेतात..म्हणून आयांची परतीची चुळबुळ सुरु झाली की मी एक काम करते. त्यांच्यासाठी दाण्याची चटणी आणि पाताळपोह्याचा चिवडा करते. हे तहानलाडू भूक लाडू त्या नको नको म्हणत अमेरिकेतून पुण्याला घेऊन जातात. महिनाभराने लेकीच्या घरून स्वतःच्या घरी पोचतात.
ओट्याशी उभं राहून चहा करताना मग पातळ पोह्याचा चिवडा वाटीत भरला जातो. कांदा, टोमॅटो ,कोथिंबीर, लिंबू, सगळ्या रंगांनी तो चिवडा सजतो.चहाचा पहिला घोट आणि लेकीच्या हातचा तहान लाडू भूक लाडू खाताना त्याचा आस्वाद घेताना आईच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा कमालीचं समाधान झळकतं..लेकीला ते न दिसताही मनापर्यंत पोचतं ...

2 comments:

  1. अमृता, मन भरून आलं. अमेरिकेची प्रत्येक ट्रिप आठवली आणि तू वर्णन केल आहेस त्या प्रमाणे खाल्लेला तुझा चिवडा आठवला, कुणाची चटणी अधिक चांगली असं बाबाचं चिडवणे आठवलं ! वाचताना छान वाटल, त्या क्षणांचा पुनः प्रत्यय मिळाला! ☺

    ReplyDelete