facebook

Tuesday, July 16, 2019

संजीवनी


माफ करा ही पोस्ट एरवीच्या खास, ठेवणीतल्या, खमंग किंवा पंगतीने जेवतांनाच्या, सुग्रास पक्वानांची किंवा चमचमीत, रुचकर,पाककृतींची नाहीये. पण मी लिहिते आहे ते सगळ्यांना कळेल, उमगेल.
मी लहान होते तेव्हा सारखी आजारी पडायचे. तोंडाची चव जायची, का आजारपणात पण जिभेचे चोजले असायचे माहीत नाही. मऊ भाताची पेज किंवा खिचडीकडे ढुंकूनही पहायची नाही. बर, वर्षातून कधीतरीच आजारी पडत असते तर गोष्ट वेगळी होती. ऋतू बदलला- खोकला झाला, पावसात भिजले- नाक चोंदलं, आवळे खाल्ले -कफ झाला, काजू खाल्ले- ऍलर्जी झाली! चिंचेची पण ऍलर्जी!! ( अनेक डॉक्टरना अनेक वर्ष लागली ही कळायला.)  मी आजारी पडले कि मला हमखास आलू बुखार खावेसे वाटायचे. आधीच, सगळी सर्दी कफाची बोंब त्यात हे असले डोहाळे ! 
"काय करू?" किंवा "काय खावंसं वाटतंय?" असं आईने विचारलं ,की "काहीतरी वेगळं!" अस ठरलेलं उत्तर असायचं. 
कोबी, गाजर, मटार ,कांद्याची पात, आलं, लसूण,मिरं ,घालून आई कधी टोमॅटोचं सूप करायची पण टोमॅटो ऍसिडिक म्हणून हे लास्ट रिसॉर्ट असायचं. पण आईच्या सुगरणीच्या बटव्यात काही खास ठेवणीतले पदार्थ होते त्यांच्या बद्दल लिहिणार आहे . 
1.
पाचक 
मूठभर काळ्या मनुका, डिड ते दोन इंच आलं , दोन्हीही पाण्यात भिजवून ठेऊन नीट धुवून घ्यायच्या. आलं किसून घ्यायचं. मनुका आणि आलं झाकण असलेल्या डब्बीत भरायच्या आणि मग त्याच्यावर डिड ते दोन लिंबाचा रस पिळायचा. एक ते डिड छोटा चमचा काळं मीठ  घालायचं आणि हे सगळं छान ढवळून डब्बी झाकून ठेऊन द्यायची. चार पास तसांनी मनुका त्या लिंबाच्या आणि आल्याच्या रसात, रसरसून टम्म फुगतात. येता जाता ह्या मनुका तोंडात टाकल्या की आंबट गोड चव जिभेवर रेंगाळते आणि भूक चाळवते. 

मी आता काळं मीठ घालते . आई सैंधव संचळ घालते. त्याला शेंदेलोण -पादेलोण म्हणण्यातच जास्त मजा यायची. आम्ही खिदळत बसायचो.
2.स्वादिष्ट पेज. 
तांदूळ धुवून घ्यायचा. एका छोट्या कढईत दोन चमचे तूपावर तांदूळ भाजून घ्यायचा.त्यात थोडं मिरेपूड घालायची किंवा तीन चार अख्खे मिरे, आल्याचे लांबट काप आणि थोडं जिरं. ह्याची फोडणी नाही करायची तांदळाबरोबर परतायचं सगळं. दूप्पट पाणी घालून भाताची पेज करायची. काळं मीठ भुरभुरायचं आणि आवडत असल्यास थोडं लिंबू पिळायचं. गरमा गरम पेज सूप तयार ! माझ्या मुलीला मी हॅन्ड मिक्सरने भाताची शीतं बारीक करून देते. अशावेळेला आल्याचे मोठे काप मी भात शिजून मिक्सरने बारीक झाल्यावर मगच घालते.
3.तूप मीठ लसणाचा रोल.
लसणाच्या दोन छोट्या पाकळ्या अगदी बारीक चिरून तुकडे करायचे. पोळी तव्यावर फुगली की लगेचच चमचाभर साजूक तूप पोळी र घालायचं. आमच्या आईला तूप खूपच औषधी इत्यादी वाटत असल्याने तीच्या लेखी एक चमचा ह्या व्हॅल्यूला फारसे महत्व नव्हते. बारीक चिरलेला लसूण मध्ये एका ओळीत पसरायचा आणि हलक्या हाताने त्यावर मीठ भुरभुरायचं . मिठाला प्रमाण सांगता येणार नाही ते प्रत्येक आईचं वेगळंच गणित असतं .हा रोल, गरम पोळीची उब हाताला जाणवते आहे, तोपर्यंतच गट्टम करून टाकायचा.



4.हिरव्या मसाल्याचं वरण
आलं,लसूण, कोथिंबीर, मिरची,चिरून किंवा किसून घ्यायची. भरपूर कढीलिंबाची पानं. शिजलेली मुगाची   डाळ छान घोटून,एकजीव करून घ्यायची. जिरं,मोहरी न घालता हिंग, हळद आणि सगळ्या हिरव्या मसाल्याची फोडणी वरणावर घालायची. भरपूर पाणी घालून उकळी आणायची. सूप सारखं पिताना त्यात थोडी चिरलेली पुदिन्याची पानं, थोडी मिरपूड आणि थोडं लिंबू पिळायचं. ह्या वरणाची वरणफळं पण खूपच छान लागतात.
आता वाटतं, कधी कोणत्या आजारावर डॉक्टरांनी काय औषध दिलं होतं ते आठवत नाही, पण आईने मला बरं करण्यासाठी /वाटण्यासाठी केलेल्या कित्येक पदार्थांची चव तशीच्या तशी  आठवते. मीठ ते मीठच असतं पण तूपमीठ लसणाच्या रोल मध्ये माझं प्रमाण कधीच जुळून येत नाही.  डॉक्टर आजारातून बरं करतात पण आईच्या स्वैपाकात, ग्लानीत तिने डोक्यावरून फिरवलेल्या हातातच, संजीवनी असते असं मला वाटतं. प्रत्येक घरातले असे वेगवेगळे संचित, संजीवनीचे साठे असतीलच, माझ्या आईचा तिने मला दिलेला संजीवनीचा वारसा आज तुमच्या पर्यंत पोचवते आहे.

1 comment: