facebook

Thursday, August 23, 2018

The travelling club of Unicorn Boots

इराची शाळेतली मैत्रीण पिया, Germanyला परत गेली.
तिचे वडील, सेबास्तिअन,वर्षभराच्या कामासाठीच कॅलिफोर्निया मध्ये आले होते; बरोबर बायको लॉटी, पिया,  आणि पियाचा धाकटा भाऊ लेनी. पहिल्या भेटीत सेबास्तिअन आणि निकीत, मी आणि लॉटी , आमची छान तार जुळली.
पिया आणि इराला एकमेकींमध्ये फारसा रस नव्हता. इराला  लेनीशी खेळायला जास्त आवडायचं.  पिया आणि इराची मैत्री अगदी वर्षाच्या शेवटी झाली. Jeans आणि t shirt मध्ये रमणारी इरा , तिला अचानक tutu skirt आवडायला लागले. Lego आणि ट्रेन tracks बरोबर My little pony आणि baking set आवडायला लागला..सगळा प्रभाव पियाचा नव्हता, इतर मैत्रिणीचा पण होता पण तरीही माझ्या मनात असे काय काय विचार येऊन गेले... \
शेवटच्या महिन्यात, साधं बागेतून आपआपल्या घरी परतताना ह्या तिघी चौघी मैत्रिणी एकमेकिंना मिठी मारून, "Bye,Bye, I will miss you " म्हणायला लागल्या. तीन आणि चार वर्षाच्या ह्या मुलींचा एकमेकींना मिठीत घेतलेला घोळका पाहून , बागेतल्या इतर आया " Aww.." ," So cute.." असं काय काय कौतुकाने म्हणायला लागल्या.ते ऐकून ह्यांना आणखीन चेव चढायला लागला, मग खेळता खेळता मध्येच एकमेकांना मिठी मारणे,स्वतःचा आवडता snack एकमेकींना भरवणे, वगैरे....
मैत्रीचा शेवटच्या महिना त्यांनी पुरेपूर उपभोगला.  वेळ संपत आलीय किंवा काही काळाने आपण एकमेकींच्या  हजारो मैल लांब जाणार आहोत, कदाचित मोठ्या होऊ तेव्हा एकमेकींना विसरून जाणार आहोत, असल्या जाणीवा त्या मुलींना अजिबात नव्हत्या.. हे सगळे विचार, दुख इत्यादी मुलींच्या आयांच्या मनात, कधी डोळ्यात तरळत होतं. पिया जाणार तशीच लॉटी जाणार ह्याची मला खंत वाटायला लागली होती ...
जायच्या आदल्या दिवशी आमचा निरोप समारंभसुद्धा मुलींच्या आवडत्या बागेतच झाला. जाता जाता लॉटीने एक फाटकी कापडी पिशवी काढून दिली, त्यात पियाचे गुलाबी बूट, अगदी  girly pink rain boots होते. मी कधीही बाजारातून निवडून आणले नसते असे ते बूट. त्या गुलाबी बुटांवर unicorns. इरा ,पियापेक्षा लहान आहे, तर तिला ते येणाऱ्या पावसाळ्यात वापरता येतील म्हणून लॉटीने ते मला दिले. मुली एकमेकींना मिठ्या मारून रडल्या नाहीत पण आम्ही दोघी मात्र रडलो....
पिया गेली त्यानंतर शाळा सुरूच होती. एक दोन दिवस पियाचं नसणं इराला खटकलं नाही. पण मग ती Germany होऊन कधी येणार? ती, तिच्या आजा, अब्बूला भेटून, इरासार्खीच परत Berkeleyला येणार, असे वेगवेगळे निष्कर्ष इराच्या मनात घोळायला लागले. मग चार दिवसांनी, भर उन्हाळ्यात तिला shorts खाली rain boots घालून बाहेर जावसं वाटायला लागलं...
आता ह्या गोष्टीला दोन महिने होत आले आहेत.आम्ही भारतातून परत गेलो, शाळा सुरु झाली की पिया पण शाळेत परत येणार अशी इराची समजूत आहे. तिला कितीही संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं तरी तात्पुरतं तिला पटतं मग काही दिवसांनी पुन्हा ते चक्र सुरु होतं.
इरा शाळेत गेली आणि पिया आली नाही की कदाचित तिचा खूप मोठा भ्रमनिरास होईल, तिला त्रास होइल, कदाचित तिला लोकांचे देशांतर थोडेसे उमगायला लागेल... तिने काल तिच्या अब्बुला सांगितलेही," अब्बू मी berkeley मध्ये गेल्यावर तू मला भेटणार नाहीस...." काहीतरी तुटेल, घडेल ...इरा अजून थोडी मोठी होईल..
खरतर Unicorns खरे नसतात हे मुलांना पण खूप लवकर उमगत असतं. पण तरीही त्यांच्या आयुष्यात unicorns असणं खूप महत्वाचं असतं. अशा unicorns सारख्याच , मनाच्या नाजूक कोपऱ्यात ठेवलेल्या, इतर जगाला अवास्तव वाटणाऱ्या गोष्टी, मित्रांपुढे आपसूक मांडल्या जातात, कधीकधी मित्रांमुळेच आपल्या भाव विश्वात येऊन त्या अवास्तव कल्पना विसावतात, कधी पंख पसरून उडून जातात...
Unicornsची गरज काही वेळा मुलांपेक्षा जास्त आपल्याला असते, कदाचित लॉटीने ते ओळखून मला ते बूट दिलेले असणार....

1 comment: