facebook

Saturday, March 31, 2018

A wishing Tree


इराच्या शाळेच्या मार्गावर, एका कोपऱ्यावर, छान पांढऱ्याशुभ्र, लाल कौलांच्या ( Spanish Revival style Bunglow) घरासमोर हे लिंबाचे  झाड आहे. झाडाच्या बुंध्याशी लावलेली, हलकेच डोकावणारी  छोटीशी पांढरी टाईल,  त्यावर नाजूक पण asymmetrical हस्ताक्षरात लिहिलं आहे, "Make a wish".पहिल्यांदा झाड पाहिलं तेव्हा वाटलं आपण पण लिहून, वाऱ्यावर फडफडणारी एखादी चिठ्ठी टांगावी त्या झाडावर..पण असा विचार येताच, लक्षात आलं की सगळे कागद एकसंध आकाराचे, पांढऱ्या शुभ्र कागदाचे तुकडे आहेत. झाडावर टांगायला वापरलेली दोरी /सुतळी/स्ट्रिंग ही पण एकाच प्रकारातली वाटली... भारतात मंदिराच्या आवारात, एखाद्या दर्ग्याबाहेर अशा मनोभावना व्यक्त करणाऱ्या, चिठ्या नाही पण लाल किंवा पिवळे गंडे , ताईत किंवा तत्सम गोष्टी गाठी मारून बांधलेल्या  मला आठवलं. लाल किंवा पिवळा रंग डोळ्यात भरत नव्हता , पण लिंबाच्या गडद हिरव्या पानांमधून डोकावणाऱ्या चिठ्ठ्या; त्या झाडाला एक स्वतःची अशी symmetry होती, ती मला भावली.
 खरंतर ऑक्टोबर २०१७ पासून, आठवड्यातले चार दिवस, जाऊन येऊन, असे आठ वेळा मी त्या झाडाजवळून  चालत जाते. बरेचदा मनात येऊन गेलं आहे की त्यातली एखादी तरी चिठ्ठी वाचावी. पण  वाचता येतील अशा उंचीवर नाहीत, थोडेसे पाय उंचावून सगळ्यात तळातल्या चीठ्ठीतली एखादी  वाचता येईल. पण मग मी ते वाचते आहे हे इतरांना पण कळेल ( त्या घरातल्या, रस्त्यावरून चालत जाणाऱ्या इतरांना.) " कुणा एका अनोळखी व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा वाचणारी वेडी बाई .." असं नको कुणाला वाटायला.. शिवाय एखादी इच्छा वाचली की मग ती पूर्ण झाली का नाही हा अजून एक विचार चिडवत राहणार. त्यामुळे हा मोह टाळला आहे. पण गेल्या काही महिन्यांच्या नजरभेटीत, मला लक्षात आलय कि प्रथमदर्शनी, एकसंध वाटणाऱ्या,  एकाच  आकाराच्या पांढऱ्या कागदाच्या चिठ्या; उन, पाउस , वाऱ्याने वेगवेगळ्या पद्धतीने विरल्या आहेत. काही जुन्या आहेत, काही नवीन आहेत, काही चीठ्यांचे रंग बदलले आहेत , काही जीर्ण झाल्या आहेत. काहींना पिवळी झाक आली आहे काहींना ओल लागून राखाडी रंगाची fungus ची छटा चढली आहे... आणि तरीही ते लिंबाचे झाड चहू बाजूंनी, छान टवटवीत वाढतंय, बहरतय....
यंदा पाउस उशिरा आला आमच्याकडे. ह्या पावसानंतर त्या लिंबाच्या फुलांचा घम घामाट पसरतो.. एकदा पावसात, तो सुवास भरून घेऊन ह्या झाडाकडे पाहिलं आणि लिंबाचा बहर, अस्फुट कळ्या, येऊ घातलेली एवूलीशी लिंबं, आणि त्या चिठ्या , सगळ्यांवरून एकाच वेळी पाण्याचे थेंब ओघळून, हळूच खाली मातीवर पडून झिरपून, गुडूप होत होते... ते गुडूप होणारं पाणी पाहत असताना वाटलं, झाड काहीतरी महत्वाचं सांगू पाहतंय, पण तेव्हा ते दृश्य सोडून मनात इतर काही झिरपलं नाही ...
काल इराला घेऊन परत येताना , झाडाकडे पाहिलं आणि  रस्त्यालगतच्या एका फांदीवर एका पिवळ्या post it note वर नजर पडली. लिंबाची symmetry भंगवणारा तो पिवळा चौकोनी चिटोरा डोळ्यात खुपला. तो काढून टाकणं माझ्याने शक्य नव्हतं, कारण तो बरच उंच होता. पण मी चालता चालता थांबले, कंबरेवर हात ठेऊन त्या post it कडे बघत राहिले.." ही वेडी बाई काय बघते आहे निरखून?" असा प्रश्न इरा आणि येणाऱ्या जाणार्यांना पडावा इतका वेळ निश्चित थांबले असेन....इतका वेळ बारीक डोळे करून निरखून बघितल्यामुळे ते अस्पष्टसं  लिहिलेलं वाचता आलं. डोळ्यात तरंगणाऱ्या पाण्यातून पुन्हा वाचलं,  "Not much I am thankful for.You are a beautiful tree, wish there were more people like you ..."  तेव्हा पावसात जे झिरपलं नव्हतं,ते डोळ्यात तरळलं...
कुणा कुणाच्या, किती आणि काय काय इच्छा असतील अशा तिथे टांगलेल्या, अनोळखी लोकांना साद घालणाऱ्या, वार्याशी  झाडापेक्षा वेगळंच , स्वतःच्या मनातलं गुजगीत गुणगुणाऱ्या,  उन्हाने /पाण्याने शाई पुसून कोरी पानं राहून, अपूर्ण, अतृप्त राहिलेल्या अनेक इच्छा, स्वतःच्या देहावर वागवत, त्याचा भार न घेता,  मोठं होणारं, बहरणारं, समृद्ध झाड.... हे जमलं पाहिजे , असं स्वच्छंद जगणं, स्वतः फुलत ,समृद्ध होत राहणं... बाकी ह्या Wish tree वर कितीही प्रेम जडलं असलं तरी चिठी लिहिण्यापेक्षा ते त्याच्या भाषेत व्यक्त होतं तसं मी माझ्या पद्धतीने व्यक्त होणं ..हेच योग्य नाही का ?