facebook

Wednesday, December 20, 2017

अन्नपूर्णेचं पात्र

आईच्या स्वैपाकाचा आस्वाद घेऊन, तिचं कधी कौतुक केलं की ती नेहमी सांगते," अन्नदाता सुखी भवो ! आजच्या सारखच उद्या मिळो!" असं म्हणा.  कधी कुणी तिला कौतुकाने 'अन्नपूर्णा' वगैरे म्हणालं तर ती लगेच गंभीरपणे सांगते," छे ! अन्नपूर्णा होती ती आमची आई. बिचारीकडे कणकेशिवाय काही नसायचं ,पण घरात आलेला कुणी तृप्त न होता गेला नाही." आईची आई , मालती आजी , मी खूपच लहान असतांना, म्हणजे तिच्याबद्दलच्या मनात ठळक आठवणी तयार होतील ,त्याच्या आधीच गेली. मला तिचा सहवास फार लाभला नाही. पण आई , दोन्ही मावश्या , मामा ह्यांचे शाळेतले, कॉलेजमधले मित्र, दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिराजवळचे 'आळीकर', आम्हा नातवंडांना  भेटल्यावर नेहमी सांगत, " तुमची आजी न ... किती गरम पोळ्या खाल्ल्या आहेत त्यांच्या हातच्या ! आम्ही खातच सुटायचो." आई सांगते त्यानुसार त्या गरम पोळीला तोंडी लावायला गुळ, कधी कच्च्या लसणीचे तेलामधले तिखट, एवढेच असत. चव होती ती आजीच्या हातच्या घडीच्या पोळ्यांची. कधी काही खास प्रसंग असेल तर आजी, नातवंडांसाठी, त्या कणकेची उकड नाहीतर गुळ घालून शिरा करायची.  घरात सुबत्ता असती, मुबलक सामुग्री तिच्या हाताशी असती तर तिने ह्या पोळ्यांपेक्षा खूप काही करून खाऊ घातलं असतं. पण चणचण आहे म्हणून तिने आगत्य सोडलं नाही.तिच्या हातची  गरम पोळी,त्याचा घेतलेला आस्वाद, जिभेवर त्याची चव राहिली नसेल, पण तिच्या नंतरही अनेकांच्या मनात तिची ही आठवण तरळत राहिली. माझा दादा अनेकदा कणकेची उकड करायचा प्रयत्न करतो, पण त्याला कधीच समाधान होत नाही;त्या उकडीला कधीच आजीच्या हातची चव येत नाही.

हा अन्नपूर्णेचा वारसा माझ्या आईने, दोन्ही मावश्यांनी, मामीने छान जपलाय! आईला पटो न पटो, पण आजीचा अंश तिच्याआत आल्याने , आमची तर तीच अन्नपूर्णा आहे!
नुकतीच,आई बाबांच्या लग्नाला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली. 'गृहिणी' म्हणून तिच्या ह्या प्रवासात, तिच्या स्वैपाकघरातला एक अविभाज्य भाग आहे तो म्हणजे  ही मोठी Aluminium ची कढई ,त्याला मी अन्नपूर्णेचं पात्र म्हणते.
 लग्नानंतर, आईने वाड्यातल्या बायकांबरोबर,एका भिशीत भाग घेतला होता.  ती भिशी जिंकल्यावर त्या पैश्यातून विकत घेतलेली ही कढई, माझ्यापेक्षाही जुनी आहे, माझ्यापेक्षा जास्त आईच्या सहवासात आहे ! तिला वाटलं तर Non stickच्या branded कढया, pans, ग्रील्स काहीही विकत घेऊ शकेल अशी तिची आर्थिक परिस्थिती झाल्यावरही, आईने कधीच त्यातलं काही विकत घेतलं नाही. Futura चा कुकर घेताना , तिला आम्हीच भरीला घातलं म्हणून एक कढई घेतली पण काही महिन्यांनी, " खसा खसा परतलं की चरे जातात ..मग काय उपयोग ?" असं म्हणून ती कपाटात मागे टाकून दिली.
Wok बिक ची भानगड भारतात यायच्या आधी कित्येक वर्ष , आई ह्या कढईत स्वैपाक करत होती.  तिच्या 'Stir fry' type भाज्यांमुळे ,पोळी भाजीचा डब्बा न्यायला आम्हाला खूप आवडायचा. घेवडा, गवार, भेंडी, डिंगरी, तोंडली; अर्ध्या कच्चा, कुरकुरीत  परतलेल्या आणि तरीही त्यांचा हिरवा रंग राखलेल्या  भाज्या खायला  आम्ही आतुर असायचो. कोबीची, फक्त तीळ, हिरवीमिरची आणि कोथिंबीर घातलेली डब्यातली भाजी आम्ही तिघंही , आजही आठवून , आपआपल्या घरी करायचा प्रयत्न करतो. बटाट्याच्या काचर्या पोळी बरोबर खायला लावणं गुन्हा आहे, असं म्हणून त्या नुसत्याच खाऊन टाकायचो; त्यामुळे आई काचर्यानबरोबर , दाण्याच्या चटणीचा रोल द्यायची. दाण्याचे कुट, कांदा-लसूण घालून परतलेल्या पालेभाज्या पण  तितक्याच आवडीने खायचो .पण ह्या एवढ्या परतलेल्या भाज्या करत असताना, आईचे तेल वापरण्याचं, एक ठरलेलं गणित होतं. कधी तेल जास्त झालं तर त्यात भात कालवून फोडणीचा भात खायला मिळायचा. असा भात रोज खायला मिळावा असं आम्हाला वाटे , पण तो १५ -२० दिवसातून एकदाच मिळे.
बहुतेक, आणल्यापासून ह्या कढईला आमच्या घरी उसंत अशी मिळालेलीच नाही . दररोजचा स्वैपाक , चिवडे, लाडू , सणासमारंभाचे पुलाव आणि मसालेभात, दिवाळीतला फराळ , भाजणी, आम्ही मुलांनी पाक कला शिकताना केलेले प्रयोग, सगळंच ह्या एका पात्रात बनवलं गेलंय. कधी आम्हाला तिघांना विचारलं," आईच्या स्वैपाकघरातलं काय हवंय ?" तर आम्ही निर्विवादपणे  ह्या कढईकडेच बोट दाखवू. पण कढई मिळाल्याने , आईच्या हाताची चव कुठे येणार आहे? कढई बरोबर आई येणार असेल तरच ती घेण्यात अर्थ आहे - नाहीतरी  अन्नपूर्णेचं पात्र तिच्यामुळेच विपुल आहे...
उत्तम, सुग्रास जेवण बनवायला नाना प्रकारची, उपकरणं आणि भांडी लागतातच असं नाही...आजीकडे नव्हतं , पण आईच्या हाती सुबत्ता, आर्थिक स्वातंत्र्य होतं, आहे, तरीही तिचा ही स्वैपाकाचा कानमंत्र सोपा आहे. चविष्ठ जेवण बनवायला ३० जिन्नस लागत नाहीत; साधं पोष्टिक पण रुचकर जेवण , पोटोबा आणि आत्म्याला तृप्त करू शकतो.  आम्ही तृप्तच होते , पण मग आमच्या , जिभेचे चोचले पुरवायला, हॉटेल मधले पंजाबी,chinese, pizza, Italian, continental इत्यादीची चव लागायला लागली. जिभेला एकदा का ह्या चवी कळल्या की मग परत फिरणं अवघड होतं...
अशा ह्या खाद्यसंस्कृतीत वाढलेली आम्ही  तिघं  मुलं, आमची मुलं  तर खूप लहानपणापासूनच Mexican, ethiopian, Thai, Burmese, Italian, American खाद्य संस्कृतींचा आस्वाद घेतायत. त्यांच्यासाठी आमच्या बालपणातली तृप्तता शोधताना बरीच घालमेल होते. Berkeley मध्ये, इरा  कधी हात ओरपून कुळथाचं पिठलं आणि तूप भात खाते , तव्यावरच्या फुगलेल्या पोळीचा हट्ट करते किंवा Kale ची तीळ, खोबरं घातलेली,'परतलेली ' भाजी  पुन्हा मागून खाते , तेव्हा वाटतं आमच्या आन्नपुर्णेचा अंश माझ्यातही थोडा थोडा झिरप्तोय ...तिच्यासारखंच एखादं पात्र सापडवून आपला वारसा तयार करता आला पाहिजे...


3 comments:

  1. Very well expressed. Really enjoyed reading this piece.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Prachee for taking the time to leave a reply! Thank you :)

      Delete
  2. Excellent write up. Was moved while reading it.

    ReplyDelete