facebook

Thursday, December 28, 2017

वाडा



    Photo credit : Sonalee Hardikar

कुठल्याही सिनेमात ,"पुश्तानी मकान /कोठी /हवेली.." वगैरेचे उल्लेख ऐकले की मला आणि निकीतला चुकल्या चुकल्या सारखं होतं. आम्ही दोघांनी हे ,पिढीजात  वास्तूत रहायचं , वावरायचं  'धन', आपआपल्या आजोळी अनुभवलं आहे आणि आमच्या डोळ्यासमोर ते लुप्त होऊन गेलेलं पण पाहिलं आहे.
आई , तिची तिन्ही भावंडं ज्या वाड्यात लहानाची मोठी झाली आता त्या वाड्यात त्यांच्यापैकी  कुणीच राहत नाही. ह्या भावंडांनी पानशेतचा १९६१ सालचा पूर अनुभवला आहे. त्या पुरात वाड्याचा  सोपा ,मागचे अंगण,  आणि काही भाग वाहून गेला. आई सगळ्यात मोठी आहे, ती तेव्हा फक्त १० वर्षाची होती. ह्या वाहून जाण्याआधीच्या वाड्याबद्दलच्या,  तिच्या काही आठवणी आहेत.भावंडानशी निगडीत, तिला "चिम्या' म्हणणाऱ्या तिच्या आजोबांविषयीच्या, पोपट-पेरूच्या बागा, पेरू  खाल्ल्याच्या, भजनी मंडळ, मारुतीला येणारी लोकं , वारकरी, गच्चीतून दिसणारा शनिवारवाडा. तिच्या आठवणीतून तिने तो ,तिच्यासामोरून वाहून गेलेला काळ, जपून ठेवलाय. कधीतरी दुसऱ्याच कशामुळे  तरी तिला आठवण होते आणि मग ती चार पाच वाक्य बोलून दाखवते. एवढंच काय ते मला त्या पुरापूर्वीच्या वाड्याबद्दल माहिती आहे.
माझा जन्म पण वाड्यातच झाला. पण आमचं घर म्हणजे, वाड्यात वसलेली एक चाळ , त्यातलं एक बिर्हाड. आई बाबा कधी कधी त्याला ट्रेन चा डब्बा म्हणत. एका भिंतीला डोकं लावलं की समोरच्या भिंतीला पाय पोचत. म्हणजे सहा फुटी माणसांचे नाहीत, साडे पाच, फार फार तर पाच फूट सात इंची माणसाचे पाय पोचतिल, एवढ्या अरुंद तीन खोल्या, आणि स्वैपाकघर त्याच्यापेक्षा थोडंसच मोठं. स्वैपाकघराला लागुनच मोरी होती, घराबाहेर दोन फरलांगावर toilets. आणि ह्या अरुंद खोल्यांमध्ये आम्ही तीन भावंडं, आई वडील, आजी आजोबा आणि आले -गेलेले नातेवाईक सुखाने नांदत होतो. मी ह्या घरात वयाच्या सहाव्या - सातव्या  वर्षापर्यंतच राहिले, नंतर दहा -बारा वर्षाची होईपर्यंत येऊन खेळत राहिले. पण मला त्या अरुंद वगैरे खोल्या आठवत नाहीत. मला हुंदडल्याच्या, गोट्या -भिंगर्यांसाठी भांडल्याच्या, अंधार होऊन दिसत नाही तोपर्यंत लगोरी, डबा ऐस पैस, लपाछपी खेळल्याच्या गोष्टी आठवतात. 
वाड्यातल्या प्रत्येक घरात स्वैपाक करणाऱ्या काकुचं एक वैशिष्ट्य होतं. आम्ही सगळी मुलं एकत्र खेळत असल्यामुळे ते प्रत्येकाला चाख्याला मिळत. कुणाच्या घरी जास्त किंवा कुणाच्या घरी कमी. लसणाची झमझमित फोडणी मला खूप आवडे. मी स्वतः कांदा लसूण मसाला वापरायला लागेपर्यंत मला माझ्या आठवणीतली ती फोडणी कशी करत असतील ह्याची फार उत्सुकता होती. कारण आमच्याघरी असा वास कधीच येत नसे.  आईच्या फोडण्या खमंग असत, लगेच जेवायला बसावसं वाटे, पण ते पानात न पडणाऱ्या , तरीही घमघमणारया वासाने,कधी कधी तोंडाला पाणी सुटे. ते वाड्यातले वेगवेगळ्या फोडण्यांंचे वास, आवाज, मला अजूनही आठवतात. तो वाडा आता नाही- तिथे आता एक building उभी आहे. बिल्डरचे काहीतरी वाद झाल्यामुळे त्याचं बांधकाम अनेक वर्ष अपूर्णच आहे. त्या घराचे छोटे छोटे कवडसे, जुन्या black and white फोटो मध्ये दिसतात, बाकी ते सगळं भावनाविश्व फक्त आठवणींमध्ये आणि वेळोवेळी व्यक्त होणाऱ्या शब्दांमध्ये. मधूनच आठवणाऱ्या विद्याधर, वीणा, आरती, राणी , अमित, संजा, ह्या नावांमध्ये आठवणी आहेत.
ह्या आमच्या चाळ वजा वाड्यातून आईच्या माहेरी , म्हणजे 'चारशे पंचाहत्तर' ला गेलं के तिथेही माझं उड्या मारणं -पळणं सुरु व्हायचं. अण्णांना , आईच्या बाबांना ते आवडत नसे, "दाण दाण पाय आपटलेस की खाली बिऱ्हाडांच्या डोक्यावर पडेल माती. वर आले तर काय सांगू ? कोण नाचतंय म्हणून ?" असं मला विचारायचे. माझ्या दादाला पोहायला शिकवणारे , बहिणीला चित्रकलेचा वारसा देणारे हे माझे आजोबा,  मला मात्र ,'wild child' म्हणत . मग ते असे ओरडले, की मी  गच्चीत जाऊन बसे. गच्चीत नेहमीच जुईच्या किंवा मोगर्याच्या फुलांचा दरवळ असे !गच्ची मधून 'top view'  बघायला मिळणं, माझ्यासाठीच नाही, सगळ्या भावंडांसाठी पर्वणीच असायची. समोर एक मोठं निवासी हॉटेल होतं , शेजारी उडपी हॉटेल होतं, मंदिराशेजारी बसलेला नारळ वाला , त्याच्याकडे विकत घ्यायला येणारी लोकं, सुट्ट्यापैश्यांसाठी चालणारी बाचाबाची , बस stop ला उतरणारी लोकं - आम्ही तासान तास लोक दर्शन करत बसायचो.
गच्चीला फक्त कडे नव्हते तर एका बाजूला बसायला,एक छान , दगडी पण नक्षीदार , प्लास्टर च coating असलेला बाक होता. बाकाला मागे टेकायला असलेली पाठ इतर कट्ट्यानपेक्षा मोठी होती.त्या  भिंती पलीकडचं बघायला बाकावर चढून बसायला लागे. कधी कधी मोठ्यांच्या नजर चुकवून गच्चीतून खाली रस्ता नक्की किती 'खोल' आहे हे बघायला आम्ही वरून छोटे खडे टाकून बघत असू. ह्या बाकाच्या भिंतीच्या टोकावर एक वातकुकुट( weather vane) लावलेलं होतं. ते काही मला वाचता यायचं नाही की कळायचं नाही , पण त्याच्याकडे बघत बसायला मला खूप आवडायचं. ते वातकुकुट अजून शाबूत आहे, पण गच्चीत जाणारी वाट खचली आहे, पूर्वीचा बाक अजून आहे, पण आता तिथपर्यंत पोचता येत नाही. ह्या वाड्याचे फोटो नाहीत, पण त्या आतल्या आमच्या साठी 'आजोळ ' असणाऱ्या मामा मामीच्या घराचे खूप फोटो आहेत. आईच्या बालपणात वाहून गेलेलं घर , माझ्या बालपणातलं जुईच्या फुलांचं  आता खचलेलं घर, ह्यापेक्षा वेगळं ,हसरं खेळतं घर, छान फोटोबद्ध आहे हे काय कमी आहे? 
निकीतच्या आजोळी, म्हणजे निप्पाणीला खूप मोठा वाडा होता. एका चौकात सुरु होऊन दुसऱ्या चौकात संपणारा ! चौकभर लांब. माझ्या, त्या वाड्याबद्दल काहीच आठवणी नाहीत - त्या संपतीत मी भागीदार नाही, कारण आम्ही भेटायच्या आधीच तो पडला होता. पण निकीतच्याच आठवणी इतक्या देखण्या आहेत की चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. निप्पाणीला , सगळीच नातवंडं त्यांच्या आजोबांना ,'Daddy'म्हणत आणि आज्जीला 'मोठी आई'. निप्पाणी भागात सगळी तंम्बाखुची शेती होती पण ती प्रथा मोडून द्राक्षाची शेती करणारे आणि गांधीवादी विचारसरणीचे म्हणून Daddyनचे नाव खूप अदबीने घेतले जात. म्हणजे एकूणच गावात फिरताना नातवंडांची collar ताठ आणि चंगळ असायची. दुकानातून काहीही जिन्नस घेऊन,"मेहतांचा नातू / नात " सांगितलं तर घेतलेल्या खाऊ मध्ये भर पडायची. केस खूप वाढलेले आहेत असं daddy ना वाटलं तर घरी न्हावी येई, सगळ्या मुलांना चौकात बसवून , एका मागोमाग केस कापून जाई.  कपडे, काजू मेव्याचे पण तेच असायचं . वाड्यावर येऊन काम करणारी ही मंडळी, वाड्यातल्या कुटुंबाचा भाग बनून नातवंडांचे अगत्य करत. सगळ्या नातवंडांना मोठी आई आणि daddy ह्यांच्या बेडरूमबद्दल खूप कौतुक होतं. ज्या काळी master bedroom वगैरे कल्पनाही फारशा प्रचलित नव्हत्या, तेव्हा स्वतः लक्ष घालून daddy नी तशी वाड्यात बांधून घेतली होती. त्याला एक छोटीशी बाल्कनी होती , ज्या मध्ये छान फुलझाडं फुललेली असत. ह्या वाड्याचे खूप फोटो नाहीत पण नऊ नातवंडांच्या मनात त्याची उरलेली वेग वेगळी रूपं , निश्चितच आहेत!

हा असा आमच्या मनातला 'वाडा' घेऊन आम्ही सगळे एकदा, एका 'पर्यटनासाठी' बांधलेल्या वाड्यात गेलो. प्रवेश दाराबाहेर बांधलेलं मंदिर पाहून आई नाराज झाली पण तिला मी ओढत आत घेऊन गेले.  मोकळा चौसोपी चौक पाहिल्यावर तिचा चेहरा खुलला ! ताई आणि कबीर सोडून तिचं सगळं कुटुंब तिच्या समोर , जणू तिच्या लहानपणच्या वाड्यात उभं होतं. फुगडी घालताना, नातवंडाच्यामागे उंच पायऱ्या चढताना -उतरताना तिचे गुडघे दुखले नाहीत. तिच्या कल्पनेत हरवलेलं एक जग जणू तिला तिच्या समोर अवतरलं! नव्वारी साडी, नथ, दागिने घालून तयार होऊन तिने आम्हाला सगळ्यांना तयार व्हायला लावलं ! सगळ्यात आधी फोटो काढून घेतले! आता डोळे बंद न करता, डोळसपणे ती ह्या स्वप्नवत क्षणांचे वारंवार अनुभव जगू शकते..
तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की जवळ जवळ सगळं बालपण, संसाराची पहिली १५ -१६ वर्ष , माझ्या बाबांची ज्या वाड्यात गेली , त्या वाड्याबद्दल मी त्यांच्याशी कधीच बोललेले नाही. म्हणजे व्यावहारिक संभाषण नाही , पण त्यांना त्या जागे विषयी काय वाटतं वगैरे. मी त्यांना विचारलेलं नाही आणि त्यांनी ते आई सारखं कुठल्या वेगळ्याच कारणाने बोलून दाखवलेलं नाही. त्यांचा वाडा -फक्त त्यांच्याच मनात आहे!
.माझ्या आठवणीतले आवाज , वास ह्या वाड्यात काहीच नव्हतं. हा वाडा खूप रेखीव आखीव होता. माझ्या आठवणीतल्या वाड्याला कायमच एक धारदार किनार होती, किंवा ती किनार मी त्याला दिली होती...आमच्या बालपणीच्या कथा पुढे वारसाने देताना, एकतर आम्ही पण शब्द फुलवून, आठवणी सक्षम ठेवल्या पाहिजेत नाहीतर शब्द गिरवून त्या आठवणी जिवंत ठेवल्या  पाहिजेत . कारण आम्ही निदान थोडं तरी 'वाडा' हे प्रकरण उपभोगलं आहे , आमच्या पिल्लांच्या ते दृष्टीस पडेल फक्त, museum मध्ये ठेवलेल्या वस्तूंसारखं. पण खूप प्रयत्न केले तरी शब्दातून वास आणि आवाज transcend होतील का ? 






No comments:

Post a Comment