मला मांजरं फारशी आवडत
नाहीत, पण श्वान समुदाय मला फारच प्रिय आहे. म्हणजे, “The more I see of people,
the more I like my dog.”, “ Never met a dog that hasn't liked me..” अशा
काहीश्या गटात मोडणारी. लहानपणी मावशीकडे खूप मांजरं असायची- त्यांच्याशी खेळायला
मला कधी कधी आवडायचं. शिट्ट्या-बिट्ट्या मारून ती जवळ येत नाहीत, त्यांना दिलेल्या
नावांनी ती फक्त मालकाने बोलावल्यावारच जवळ येतात, ते सुद्धा त्यांचा मूड असेल तर;
शेपूट तावातावाने हलवून राग दर्शवतात, तरीही मला मांजरं थोडी का होईना, पण आवडायची.
मांडीवर येऊन बसली की त्यांच्या तुकतुकीत, मऊ केसांना कुरवाळण्यात अप्रूप वाटायचं.
पण मग अनेकदा ओचकारणे, चावणे, फिस्स करून शेपूट दाखवून निघून जाणें असे प्रत्ययाला
आल्यावर मी मांजरींना ‘माजोरड्या’ करार देऊन त्यांच्या कडून ‘स्नेहाची अपेक्षा
करणं सोडून दिलं.
श्वान समुदायाशी मला कधीच
प्रयत्नपूर्वक मैत्री करायला लागली नाही. आजोळच्या वाड्यात – आईच्या आई बाबांनी “
Rocky” पाळला होता. आम्ही सगळी नातवंडे त्याला भू भू ,यु यु, रॉक्या, काहीही
म्हणत; त्याचे कान ओढ, शेपटीची रुंदी –लांबी मोज, पंज्यात किंवा कानामागे गोचीड्या
आहेत का बघ, खाताना तो कसा आधाश्यासारखा खातो हे बघ..असे काहीही करायचो.रॉकी
अल्सेशीअन आणि गावठी कुत्रा असं Mixed Breed होता- काळा, छातीला पांढरट केस आणि
काळ्या केसाचीच अगदी किंचित आयाळ असल्यासारखा.पण ह्या काळ्या केसांमध्ये लपलेले त्याचे
डोळे ,विरघळलेल्या चोकॉलेटच्या रंगाचे होते, प्रेमळ, inviting.आमच्या उंचपुऱ्या
अण्णा आजोबांना, “आज रॉक्याने मला फिरवून आणलं” असं,धापा टाकत म्हणायला भाग
पाडणारा, आडदांड शक्ती असणारा रॉकी. माझ्या दादाने अनेकदा त्याच्या तोंडात वगैरे
हात घातला असेल, पण तो कधीच त्याला किंवा आमच्यापैकी कुणाला चावला नाही. आम्हा
नातवंडांवर त्याने आजी- अण्णांइतकेच प्रेम केलं, माया लावली. मी ह्या अश्या मायाळू
रॉक्याला पाहत मोठी झाले. इतर भेटलेली श्वानमंडळी, पाळीव किंवा रस्त्यावरची
गावठी-ह्यांच्याशी मैत्रीच होते. त्यांना ओळखता येतात त्यांची खास माणसं..
मग मध्ये दोन दशकं हे
‘माजोरड्या’ आणि ‘मैत्र’ असं समीकरण बदलावं असं काहीच झालं नाही. मग इराचा जन्म
झाला.
इराच्या पहिल्या वाढदिवसाला
एका मैत्रिणीने, “ Kitten’s First Full Moon” हे Kevin Henkes ह्या लेखकाचं पुस्तक
भेट दिलं. छोट्या मांजराच्या पिल्लाला , पौर्णिमेचा चंद्र म्हणजे दुधाची वाटी
वाटते आणि मग ती मिळवण्यासाठी ते काय काय करतं अशी ही गोष्ट आम्हाला फार काही
आवडली नाही. आणि मग ‘Prince’ भेटला.. इरा दीड वर्षाची असताना, आज्जा तिला Stroller
मधून फिरवायला गेला असता, त्यांना Prince भेटला. दिसायला अतिशय देखणा; करडा,
पांढरा, काळा, निळसरहिरवे डोळे असणारा हा बोका, इरा आणि आज्जाला पाहून
त्यांच्याकडे स्वतःहून आला(?). इराच्या strollerवर उडी मारून बसला, वास घेऊन
काहीतरी खात्री करून खाली उतरला. इराने हात फिरवला आणि तो परत घरासमोरच्या सोप्यात
जाऊन बसला. जणू त्याने परवानगी दिली असल्यासारखी, आमच्या आसपासच्या गल्ल्यांमध्ये
कुठे कुठे मांजरं आहेत, ती मांजरं आणि त्यांची घरं माहित झाली. दररोज संध्याकाळी
ही मांजरं बघायला जायची वरात निघायला लागली. थोड्या दिवसांनी, एखादा शेपटीचा फटका
बसला की सुधारेल, असा विचार करून मी ह्या मार्जार प्रेमाकडे दुर्लक्ष केलं. पण
घरात सुद्धा Kittens first full moon वरचं प्रेम वाढायला लागलं. दुपारी झोपताना,
रात्री झोपायच्या आधी, जमलंच तर आधे मध्ये कधी –ह्या पुस्तकाची उजळणी व्हायला लागली.
एक दोन महिन्यांनी “ I am a Kitten..” असं म्हणणं सुरु झालं...
मग मी पण मुद्दामच, आमच्या
शेजारच्या दोन श्वान मित्रांशी मैत्री वाढवली. बागेत येता जाता, मालकाबरोबर
फिरायला, पळायला जाणाऱ्या सगळ्या कुत्र्यांना आम्ही थांबून, “ Can I pet the
doggie” असं म्हणून थांबवायला लागलो. संध्याकाळचा वेळ छान जायला लागला. कधी कधी “I
am a Puppy”असा खेळ सुरु झाला. मला खूपच आनंद झाला. मग इराने “ म्याव ,म्याव “
च्या भाषेत बोलणं सुरु केलं. मुळात माणूस सोडून इतर कुठल्याच प्राण्याची फार आवड
नसलेल्या निकीतला, हे फारच विनोदी वाटत होतं. इरा आणि तिच्या मावशीला ही भाषा एकमेकींशी
बोलायला खूप मज्जा वाटत होती. “एक म्याव म्हणजे..” असं ताई मला समजवायला
लागल्यावर, मी म्हटलं, “तुमची Secret language असू देत ती..”
आमच्या ‘कुत्र का मांजर?”
या चढाओढीत एकेदिवशी संध्याकाळी, निकीत आणि इराच्या मागे मागे एक मांजर घराच्या
दारापर्यंत आलं. जवळच्या २ घरात मांजरी पाळलेल्या आहेत , पण हे मांजर वेगळच होतं.
इराला लगेच त्याला घरात घेऊन तिची खेळणी दाखवायची होती. “aww” असं वगैरे म्हणून
त्याच्या अवतीभवती फिरणं चालू होतं. आमच्या सोप्याच्या कठड्यावर Halloweenसाठीच्या
सजावटीतले लाल भोपळे ठेवले होते, त्या कठड्यावर बसून ते माझ्याकडे बघून खूप
केविलवाणे ‘म्याव’ म्हणालं...मी फक्त भुवया उंचावून त्याच्याकडे बघितलं. निकीतला
म्हटलं, “ हरवलंय बहुतेक. फोटो काढून Nextdoor वर टाकूया..” मी सांगायच्या आधीच
त्याने फोटो post पण केले होते. आम्ही घरात गेलो. दार बंद करून घेताना, घरातल्या
उजेडाची तिरीप त्या मांजराच्या चेहऱ्यावर पडली होती. अत्यंत केविलवाण्या स्वरात,
माझ्याकडे बघत ते “म्याव” म्हणालं. पण मी दार बंद करून घेतलं.
हात पाय धुवून आम्ही
जेवायला बसलो. इराला ‘फुग्गी’,म्हणजे फुगलेला फुलका वाढत असतांना तिने विचारलं,
“मांजरं खातात का फुग्गी?” मी आणि निकीत एकदम म्हणालो, “ नाही. मांजरं फक्तं cat
food खातात..” ह्या देशात हे असं का आहे ते मला न उलगडलेलं कोडं आहे.म्हणजे
आपल्याकडे कसं दूधभात, दूधपोळी , घरात जे शिजेल ते खातात आणि उत्तम आयुष्य जगतात
की कुत्री-मांजरी..पण इथे मांजरांना catfood च देतात. घराबाहेर अधून मधून ‘म्याव’ ऐकू
येत होतं ,पण इराचं आवडीचे जेवण असल्यामुळे पुढे फार चर्चा न होता जेवण आटोपलं.
अर्धा पाउण तास झाला तरी
Nextdoor वरच्या post ला मांजराच्या मालकाचा, किंवा कुणाचा ओळखीचा काहीही मेसेज
आला नव्हता.मीच थोडी अस्वस्थ झाले होते. गेलं वर्षभर Nextdoor वर ,’ Coyotes
sighted..” “ Coyotes eating Cats..” अशा बऱ्याच post वाचल्या होत्या. इथली पाळीव
मांजरं उंदराची शिकार बिकार सोडा,बरेचदा घराबाहेर म्हणजे घराच्या आसपास असलेल्या
अंगणात, फार फार तर शेजार-पाजारच्या एक दोन घरात एवढीच फिरलेली असतात. आपल्याकडे
कसं मांजरं कुठेही भटकून, भूक लागली तर उंदीर खून, आळशी असेल तर कुणाकडेही दूध पिऊन,
त्यांना वाटेल तेव्हा घरी येतात, तसं इथे बहुदा नाहीये..म्हणजे हे विधान मी
ओळखीच्या दोन तीन उधारणांवरून, इंटरनेट वर हरवलेल्या मांजरीच्या पोस्ट्स वाचून करते
आहे. त्यामुळे, ह्या मांजरीच्या मानेला धरून उचलून टाकून दिलं तर this cat will land on its feet ह्याची खात्री नव्हती.
जेवणानंतर इरा खिडकीला नाक
लाऊन, सोप्यात ते मांजर दिसतं आहे का बघायला गेली.Coyotes च्या बातम्या, बाहेर
पडलेली थंडी, अंधार, घरासमोरच्या रस्त्यावरची रहदारी, ह्या सगळ्यामुळे मला पण
अस्वस्थच वाटत होतं. मी जाऊन घराचं दार उघडलं, तर मांजर अजून तिथेच कठड्यावर
बसलेलं.. मी दार उघडताच, टुणकन उडी मारून माझ्यापुढे येऊन उभं राहिलं. मी उमब्रयावर उभी होते तर मान हलवत माझ्या
पायामागे दिसणाऱ्या उबदार घरात कसं शिरता येईल ते बघायला लागलं. मी दार लाऊन
घेतलं. जुन्या बॉक्स मध्ये दोन स्टोल्स अंथरले आणि बॉक्स दाराबाहेर ठेवायला
गेले...इरा माझ्या पायात घुटमळत हे सगळं बघत होती. दार उघडताच इरा खाली बसून मांजराला स्वतःकडे बोलवत होती.
तिच्या हाताचा मांजराने वास घेतला मग चक्क येऊन माझ्या पायाला अंग घासायला लागलं.
बॉक्समध्ये न बसता माझ्या मांडीत हनवटी ठेऊन, माझ्याकडे बघत होतं. मी पण सगळे
पूर्वगृह विसरून त्याच्या अंगावरून हात फिरवून पुढचा मागचा विचार न करता मांजराला
घरात घेतलं.
आत येताच,मांजरोबांनी लगेच
उडी मारुन घराची टेहाळणी सुरु केली. इराला भयानक आनंद झाल्याने ती नाचत ,लेगो, आणि भातुकली काढून मांजराला दाखवायला लागली. अडीच वर्षाचं पोर जेव्हा अति
उत्साहाने, जुन्या घरातल्या wooden floor वर नाचायला लागतं त्यावेळेला त्याचा
प्रचंडirritating आवाज होतो.( निदान मला तरी irritate होतं). मांजर घाबरून
सोफ्याखाली जाऊन बसलं. त्याला “प्सप्स’ करून, हाताचा वास घ्यायला हात सोफ्याखाली घातला
तर मलाच फटका मारण्यात आला. निकीत हा प्रकार पाहून म्हणाला, “ what’s प्लान B?”. मी
iphone वरून Next Door वरच्या फोटो खाली लिहिलं, “ We are not cat people. But I was
scared of the coyote attacks –so I have taken the cat inside my house. Please
advise what to do next.” ३ सेकंदात उत्तर आलं, “ Go to the 24 hour open animal hospital. They will scan him for a
chip.” पुढे काय करायचं ह्याचा मार्ग कळला पण त्याकरता मांजराला सोफ्याखालून त्याने
मला न चावता आणि ओरखाडता ,बाहेर कसं काढायचं?
रेशमी कापडांच्या उरलेल्या
चिंध्यांमधून, इरासाठी एका आजींनी एक विदुषक बनवला होता; त्याला मागे चांगली मोठी रेशमी
सुतळी होती. floor वर झोपून, मांजरापुढे तो विदुषक टाकला आणि सुतळीने तो पुढे मागे
करण्याचा खेळ सुरु झाला. इराला नाच करायला अजून स्फूर्ती मिळाली. थोडसं
सोफ्याबाहेर आलेलं मांजर परत सोफ्याच्या आतल्या कोपऱ्यात जाऊन लपून बसलं. निकीत
Next door वरती updates बघत होता. त्याला म्हटलं, “बाबा आणि इरा तुम्ही Cat food आणायला
गाडीत जाऊन बसा..मग आपण hospital मध्ये जाऊ..” नाच बीच लगेच थांबला. दोन मिनिटात
ती दोघं घराबाहेर आणि आम्ही दोघं दिवाणखान्यातल्या सोफ्यासमोर,“ To like or to
dislike..” ह्या विषयावरचा निर्णय लावण्यात जुंपलो. विदुषक आणि सुतळीचा खेळ, आणि त्याच्याशी मी खेळत होते म्हणून मी , त्या मांजराला Finally पसंत पडले.
विदुषकाला सावरत, मांजरला एका बखोटीला घालून, कसं बसं दाराला कुलूप लावलं आणि पळत
गाडीत जाऊन बसले.
सीट बेल्ट लावतांना ते चक्क
शांतपणे मांडीवर बसून राहिलं, कळल्यासारख –की त्याला त्याच्या घरी पोचो वतोय. कारचा
प्रवास सुरु झाल्यावर मात्र ते घाबरून, शाहारायला लागलं. तसं मी त्याच्याशी, “ It
will be Allright baby,dont worry..” म्हणत गप्पा मारत राहिले. इरा अजूनही ह्या
प्रसंगाची गोष्टं वारंवार सांगते म्हणून मला हे माहितीये. कारण असं काही केल्याचं
मला आठवत नाही. Finally, हॉस्पिटलमध्ये पोचलो. पण चीप-बीप स्कॅन करायलाच लागली
नाही. हॉस्पिटलच्या भकास पांढऱ्या प्रकाशात, त्याच्या गळ्यातल्या पट्ट्यावर एक
छोटासा स्टील tag होता, तो लख्ख चमकला. त्यावर “Milkyway” अशा नावाखाली दोन सेलफोन
नंबर कोरलेले होते. निकीतने फोन लावला तर आमच्या शेजारच्या गल्लीतच होतं
Milkywayचं घर; घरातले तो सापडल्याचं ऐकून सुखावले. बरक्ली पासून ४०-५० मैलावर
सान्टा रोसा गावात आणि आसपासच्या परिसरात वणव्याने पेटलेली आग
खूप दिवस क्षमली नव्हती. ४०-५० मैल लांब आसूनही बरक्लीमध्ये हवेत धुरकट,जळका वास भरून राहिला होता. त्यामुळे Milkyway घरचा रस्ता चुकला असेल असं हाॅस्पिटलमधल्या चर्चेत आम्ही निश्चित केलं.
खूप दिवस क्षमली नव्हती. ४०-५० मैल लांब आसूनही बरक्लीमध्ये हवेत धुरकट,जळका वास भरून राहिला होता. त्यामुळे Milkyway घरचा रस्ता चुकला असेल असं हाॅस्पिटलमधल्या चर्चेत आम्ही निश्चित केलं.
हॉस्पिटलहून त्याच्या घरी
जाताना, milkyway च्या तुकतुकीत कांतीची, त्याच्या पोटातून येणाऱ्या गुरगुर
आवाजाची जाणीव झाली. लहानपणची माऊशीच्या घरची मांजरं आठवली. आमच्याच घराबाहेर का
येऊन बसला असेल हा Milkyway बोका? इरा त्यांच्या गटातली ‘खास’ व्यक्ती आहे म्हणून? का माझं काही देणं राहिलं होतं? I declared a temporary truce.
Milkyway ला भेटायला त्याचे
‘आई बाबा’ घराबाहेर येऊन उभे होते. रात्री साडे दहा वाजता, आम्ही इराला घेऊन एका
मांजरासाठी हा सगळा उपद्व्याप करतो आहे, ह्याचं त्यांना खूप आश्चर्य वाटलं.
Milkyway च्या ‘आईने’ खूप वेळा कृतज्ञता व्यक्त केली, म्हणून न राहवून मी म्हटलं, “
Dont worry, I had a dog for 17years.I understand what a pet means to you..”
कुत्रा Vs मांजर , दोन्ही गटांचं नेत्रापल्ल्वीतून
संभाषण झालं, संपलं. इराने पुरेसे “ aww” , “cute” उच्चारण केलं असल्यामुळे,
Milkyway आणि त्याच्या भावाला कधीही भेटायला यायचं निमंत्रण मिळवून आम्ही तिथून निघालो.
“ चिऊ ताईच्या पिल्ला, खरं
सांग मला,आकाशातले रस्ते कसे सापडतात रे तुला ? चुकून कधी रस्ता चुकलाच तर, नाव,
गाव, पत्ता सांगून, पोलीस मामा सोडतात का?”
कवितेसारखीच हरवलेली पिल्लं वाट शोधत घरी परततात, त्यांना मदत करणारी लोकं भेटतात, आई बाबा पण हरवलेल्या पिल्लांना खूप शोधतात आणि सापडल्यावर आनंदी होतात..सगळच एका संध्याकाळी आमच्या चिमुकलीच्या भावविश्वात उलगडलं.
कवितेसारखीच हरवलेली पिल्लं वाट शोधत घरी परततात, त्यांना मदत करणारी लोकं भेटतात, आई बाबा पण हरवलेल्या पिल्लांना खूप शोधतात आणि सापडल्यावर आनंदी होतात..सगळच एका संध्याकाळी आमच्या चिमुकलीच्या भावविश्वात उलगडलं.
आनंदाची गोष्ट म्हणजे Milky way च्या भेटी नंतर आम्ही एकदा शेतावर गेलो होतो. तिथे गाईला आणि बकऱ्यांना खायला
घालून झाल्यावर , इराला, “ I am cow” आणि “I am a goat” असं ही वाटायला लागलं.
Zoo मध्ये python पाहिल्यावर तिने जमिनीवर लोळून “I am a snake” असं पण म्हणून
झालं...श्वान मित्र का मार्जार मित्र ...का दोन्ही? अजून ठरायला खूप वेळ आहे. तोपर्यत निवांत !
Thank you so much Sneha! You are absolutely right-kids aren't ashamed of expressing at all! I had totally forgotten this philosophical concept of 'humans having all animal elements!"
ReplyDelete