facebook

Friday, April 27, 2018

मनीची आई

मनी , गोट्या आणि बेबी बागेचं दार उघडून आत धावत सुटली. आपआपले stroller सांभाळत त्यांच्यामागे हळू हळू त्यांच्या आया बागेत शिरल्या. गोट्या आणि बेबीला छोटी भावंडं होती, आपआपल्या आयांच्या खांद्यावर खेळणारी. मनी बागेतल्या उंच वाढलेल्या गवतातून पळत मागे गेली; गोट्याच्या आणि बेबीच्या आईला, " Hi गोट्याची आई, Hi बबलू..." असं म्हणत तिने त्यांच्या stroller वरून हलकेच हात फिरवला...मग ती बेबीच्या आई जवळ गेली." Hi! बेबीची आई, Hi सिंबू.." ती हलकेच बेबीच्या stroller वरून हात फिरवणार तर बेबी पळत तिच्या जवळ गेली आणि तिला बाजूला ढकलत म्हणाली ," माझी आई , माझा भाऊ , माझं ...ह." असं म्हणून मनीला बाजूलाच केलं. मनीची आई बागेत शिरल्या शिरल्या झाडाखालची सावली शोधत तरा तरा पुढे चालत गेली होती. ती लांबूनच हा प्रकार बघत होती. तिला बेबीने मनीला असं बाजूला केलेलं आवडलं नाही, पण ती काही बोलली नाही. ती वाट पाहत होती मनी तिच्या जवळ येऊन तिला मिठी मारून  परत एकदा ," Hi आई!" म्हणण्याची..
पण मनी तिच्याजवळ काही गेली नाही; तिला ओलांडून,धावत धावत Sandbox मध्ये खेळायला गेली. वाळू शेजारीच पाण्याचं छोटं कारंजं होतं. वाळू आणि पाण्यात मनी तासंतास खेळत बसे; झोका घेण्यानंतरचा तिचा सगळ्यात आवडता खेळ. त्यामुळे मनीच्या आई बाबांनी तिच्यासाठी प्लास्टिकची छोटी घमेली , फावडं,चाळणी, पाण्याचा झारा, छोटी बादली सगळंच आणलं होतं. मनी भराभरा चपला काढत होती आणि तिची आई stroller च्या खालच्या कप्प्यातून मनीची खेळणी. खेळणी काढण्यासाठी खाली वाकलेली असताना, मनीच्या आईचं लक्ष परत बेबी आणि गोट्याकडे गेलं... ते दोघंही बागेच्या मध्यभागी झाडाच्या सावलीत  बेबीच्या stroller जवळ बसले होते. त्यांच्या आया बबलू आणि सिंबूला गुडघ्यावर उडवत एकमेकींशी काहीतरी गप्पा मारत  होत्या. बेबी तिच्या खेळण्यांचे वाटप करत होती आणि गोट्या ती देईल त्यात समाधान मानून मान डोलवत, तिच्याकडून खेळणी हातात घेत होता. ते पाहून मनीच्या आईला कालचा प्रसंग आठवला.
काल मनीची आई तिची प्लास्टिकची खेळणी चुकून घरीच विसरली होती. बागेत आल्यावर तिच्या लक्षात आलं. तिला वाटलं, मुलं आप आपसात वाटून घेतील खेळ... घमेली, बादली फावडी सोडून बेबीकडे बरेच समुद्री प्राण्यांच्या आकाराचे साचे पण होते, एक मोठा देखणा प्लास्टिकचा किल्ला होता. पण बेबीने मनिला त्यातलं काहीही दिलं नाही.. बेबीची आई ओरडली,म्हणाली,"You have to share बेबी,नाहीतर मनी खेळणार नाही हं तुझ्याशी.."  मग, अगदीच मनाविरुद्ध, "आईच्या धाकापोटी मी तुला देते आहे, नाहीतर .." अशा अविर्भावात बेबीने ,मनीकडे एक छोटा कासवाचा साचा टाकला...मनीला फावडं किंवा बादली हवी होती, तिने त्याकडे बोट दाखवून बेबीला खुणावलं, पण बेबी "No! ते माझं आहे " असं म्हणून वाळू उधळत ,तोंड फिरवून खेळायला लागली.
मनीची पडलेली मान, फुगलेल्या नाकपुड्या, लपलेला पण नक्कीच हिरमुसलेला चेहरा पाहून आईला एक युक्ती सुचली. तिने घरून आणलेले खाऊचे डब्बे उघडले, सगळे जिन्नस एकाच डब्ब्यात भरले आणि मग वेगवेगळ्या आकाराचे तीन डब्बे, मनीच्या पाण्याच्या बाटलीवरचा ग्लास वजा झाकण आणि खाण्यासाठी आणलेले चमचे मनीला खेळायला दिले...मनीचा चेहरा खुलला, " आईकडे सगळ्या कोड्यांची उतरं असतात !" असा काहीसा भाव तिच्या चेहऱ्यावर झळकला. तिने वाळूत छोटासा भातुकलीचा संसार थाटला. थोड्या वेळाने बेबी आणि  गोट्या तिच्या खेळात सामील झाले, मनीने त्यांना पाण्यात वाळू घातलेला चहा करून दिला. मग त्याच सामग्रीत soup केलं गेलं, पाला पाचोळा गोळा करून फ्रुट सलाड आणि बिस्कीटं झाली. खाऊचे डब्बे आणि चमचे तिघांच्या हातात वावरले पण मनीला हवी असलेली बेबीची खेळणी तिला काही खेळायला मिळाली नाहीत. भातुकली रंगात आली आणि मग बेबीची आई आणि सिंबू वाळूत खेळायला बसले.सगळ्यांनी किल्ला करायचं ठरलं.मनी उड्या मारत उठली आणि म्हणाली "मी आणते पाणी , मी आणते पाणी...."तर बेबीने मुद्दाम बादली स्वतःच्या पाठीमागे लपवली...बेबीच्या आईने आणि मनीच्या आईने एकमेकींकडे एक कटाक्ष टाकला, पण दोघीही काही बोलल्या नाहीत. मनी नावाच्या वेड्या कोकराच्या मनात बादली मागण्याचा सुद्धा विचार आला  नव्हता...ते कारंज्यातून डब्यात पाणी भरून, ते अंगावर सांडत, किंवा मुद्दाम ओतून घेत, वाटेत हिंदकळत वाळूच्या ढिगाऱ्याजवळ  पोचलं सुद्धा!  बेबी, गोट्या, बेबीची आई , सिंबू सगळे एका जागी बसून किल्ला बांधत राहिले आणि मनी तिच्या छोट्याश्या डब्यात पाणी भरत किल्ल्याला पाणी पुरवण्याचं काम मजेने करत राहिली..मनीच्या आईला स्वतःच्या कोकराचं खूप कौतुक वाटलं, तिने पुढे होऊन तिची एक गोड पापी घेतली. मनीपण अनपेक्षितपणे तिच्या गळ्यात पडली आणि गोड हसली, पण आई तिला दोन क्षण घट्ट धरणार तर ती डोळे मिचकावून पाणी आणायला पळाली.....कालचा तो दिवस सरला, आज अजून खेळाचा खेळ रंगायचा होता.
मनीचा खिदळण्याचा आवाज कानावर पडला तशी मनीची आई खेळण्यांची पिशवी घेऊन कारंजाजवळ जाऊन बसली. मनीने पिशवी वाळूत उलटी केली, सगळी खेळणी वाळूत पसरली. तिने बादली उचलली आणि त्यात कारंजातलं पाणी भरायला लागली. बेबी आणि गोट्यापण पळत पळत आले, त्यांच्या हातात बेबीची खेळणी होती. त्यांनी वाळूत पडलेल्या मनीच्या खेळण्यांकडे बघितलं. stroller जवळ बाकड्यांवर बसलेल्या त्यांच्या आयांनी ओरडूनच 'बूट बूट ...please.." असं सांगितल्यावर दोघांनी लाथा मारत बूट उडवले, मनीला त्या उडणाऱ्या बुटांचं खूप अप्रुप वाटलं.. आईला कळून चुकलं की आता हा बूट उडवण्याचा प्रकार त्यांच्या पण घरी होणार...
बूट उडवून बेबी आणि गोट्या कारंजापासून लांब जाऊन वाळूत बसले आणि फावड्याने वाळू उकरायला लागले. वाळूचा छोटा ढीग जमा झालेला पाहून मनी त्यांच्याकडे धावात गेली आणि म्हणाली ," मी आणते पाणी, मी आणते पाणी.." ती परत पळत कारंजाकडे गेली आणि तिला जमेल तितक्या वेगात बादली भरायला लागली, जणू शर्यत आहे आणि घडाळ्याचा काटा वेगाने पुढे सरकतोय... इवल्याश्या मनीच्या इवल्याश्या बादलीत तिच्या मनाइतकं पाणी भरल्यावर ती पळत बेबी आणि गोट्याकडे गेली आणि तिने त्यांनी खणलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर ती बादली ओतली... तशी बेबी तिला म्हणाली, " no...no मनी..." पण मनीला थांबून तिचं ऐकायला उसंत नव्हती..ती पळत कारंजाजवळ गेली अजून पाणी आणयला. ती पाणी भरत असताना बेबी आणि गोट्या त्या ढिगाऱ्याजवळून उठले आणि दुसऱ्या कोपऱ्यात खणायला लागले...मनी तिची बादली भरून परत त्यांच्यापाशी हजर.. तिने परत एकदा तिथे वाळूत तिच्या बादलीतलं पाणी ओतलं... परत बेबीने , " नकोय आम्हाला पाणी... आम्हाला आमचं खेळायचंय .." असं मनीला ठसक्यात सांगितलं.. बेबीच्या आवाजामुळे असेल कदाचित पण मनीची पावलं कारंजाकडे वळली पण अडखळली.तिने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आई तिच्याकडे बघून हलकेच हसली.पुढे होऊन आईने हाताने वाळूचा ढिगारा करायला लागली..मनी वाळूत पसरलेल्या तिच्या खेळण्यांकडे गेली आणि त्यातलं घमेलं उचलून तिने त्याच्यात पाणी भरलं, थोडी वाळू भुरभुरली आणि एक पान चुरडून घातलं. ते घमेलं आईला देत मनी म्हणाली, " कॉफ्फी...". आई  चव घेत म्हणाली," आहा ..Thank you ..मनु तुला कसं कळलं मला कॉफ्फी हवी होती म्हणून?" मनी हसली, म्हणली, 
"तू कायमच पीत असतेस कॉफ्फी! तुला खाऊ काय हवाय खायला? उ?" आईने उत्तर द्यायची वाट न पाहता, मनी काहीतरी खटपट करायला लागली. मग आईला sandwich, बिस्कीट, फ्रुट सलाड इत्यादी खायला घालून मनी परत बादली उचलून त्यात पाणी भरायला लागली...बादली भरून मनी बेबी आणि गोट्याच्या दिशेने वळली तेव्हा आईच्या छातीत थोडं धडधडायला लागलं...आईने तिला हाक मारली," मनी इकडे ह्या ढिगाऱ्यावर घाल पाणी. आपण मोठा किल्ला .." पण आईचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत बेबीच खेकसली,"नकोय आम्हाला तुझ्याकडून पाणी. आम्हाला आमचं आमचं खेळायचंय.." पण मनी तिथेच उभी राहिली, फतकल मारून खाली बसली आणि बेबीच्या खेळण्यांना गोंजारायला लागली, तशी बेबी तिथे उठून उभी राहिली. गोट्या, बेबी आणि मनीकडे आलटून पालटून बघत होता. न राहवून मनीची आई म्हणाली," बेबी आणि गोट्या , मनीला तुमच्याशी खेळायचंय म्हणून तर आपण एकत्र बागेत आलोय. तुम्ही सगळे एकत्र खेळा.." 
" पण ती सारखी माझी खेळणी घेते.." बेबी उत्तरली.
" तिला तुझी खेळणी नकोयत बेबी.तिच्याकडे तिची खेळणी आहेत......" मनीच्या आईने शांतपणे उत्तर दिलं.
" मग आमच्याशी का खेळायचंय ?" बेबीचा चढ्या स्वरातला प्रश्न.
गोट्या एक खेळणं तोंडात घालून हे सगळं बघत होता..मनी मान खाली घालून बसलेली पाहून, आईला एकदम राग आला...
" ठीक आहे आम्ही खेळतो एकत्र... तुम्ही नका खेळू तिच्याशी." असं म्हणत आई उठली, तिने मनीला आणि तिच्या बादलीला उचलून घेतलं. कारंजाजवळ मनिला खाली उतरवून, मनीच्या पाठीवर हात थोपटत आई तिला म्हणाली,"मनुली आपण मोठाच्या मोठा किल्ला करू. मी वाळू खणते तू पाणी आण बरं का?" बागेत आल्यापासून पहिल्यांदाच मनी जरा नाखुशीने बादलीत पाणी भरायला लागली.. आईने बेबी आणि गोट्या पासून अंतर ठेऊन वाळू खणायला सुरुवात केली. तितक्यात बेबीची आई सिंबूला घेऊन आली, वाळूत बसता बसता तिने विचारलं,"काय झालं?" मनीच्या आईने तपशीलवार न सांगता ,"मनीला खेळायला घेत नाहीयेत..." एवढंच सांगितलं. वाळूकडेच नजर केंद्रित करून आईने एक छोटं आळंं केलं, त्याच्यात खाली पाचोळा भरला. मनी बादलीत पाणी घेऊन आल्यावर आई तिला म्हणाली,"ही आपली विहीर आहे बरं का मनु. किल्ल्यासाठी पाणी विहिरीत गोळा करूया.." मनीने घाईघाईत बादलीतलं पाणी विहिरीत ओतलं आणि ती परत पळत कारंजाकडे गेली. आईने सहजच बेबी आणि गोट्याकडे बघितलं. ते दोघंही मनीकडे बघत, तिच्याकडे बोट दाखवून, एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते आणि मग हसायला लागले. आईने, बेबीच्या आईकडे बघितलं. ती पण त्यांच्याकडे बघत होती...हे त्यांचं वागणं मनीला कळलं आहे का हे बघायला आईने कारंजाकडे बघितलं तर मनी बादलीने घमेल्यात पाणी भरत होती आणि तिला एका हातात बादली आणि एका हातात घमेलं आणायचं होतं. अर्थातच घमेलं कंबरेला टेकवून ठेवताना ते तिच्या अंगावर लवंडलं...मनीचा फ्रॉक ओला झाला तसं ती शहारून म्हणाली ," आई पाणी खूप गार आहे." बेबी आणि गोट्या तोंड लपवून, मनीकडे बोट दाखवत हसतच होते....आणि मनीला पण ते कळलं .... तिने आईकडे पाहिलं, फ्रॉक घट्ट धरला आणि ती बागेच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या झोपाळ्याकडे ती धावत सुटली... आई तिच्यामागे जायला उठली पण उद्वेगाने बेबीच्या आईला म्हणाली, " हे दोघं जे वागतायत ते खूपच वाईट आहे...its mean and its heartbreaking..." बेबीची आई मान डोलावते आहे एवढंच मनीच्या आईने पाहिलं आणि ती चालायला लागली तेवढ्यात तिच्या कानावर पडलं " I am sorry मी बोलते त्यांच्याशी..." 
मनीची आई झोक्यांजवळ पोचली तेव्हा मनी झोक्यावर चढण्याचा प्रयत्न करत होती. लहान बाळांच्या bucket झोक्यासाठी मनी मोठी झाली होती पण ह्या मोठ्या मुलांच्या झोक्यासाठी ती लहानच होती. मनीचे ते झोक्यावर चढण्याचे प्रयत्न पाहून, आईचे डोळे पाणावले. एक दोन थेंब गालावर ओघळले ते तिने पटकन पुसले आणि डोळे चोळले. मनी तिचा शर्ट ओढत तिला विचारात होती,"आई डोळे का चोळते आहेस? sunscreen गेलंय?" आईने मान हलवली...ती मनीसमोर गुडघ्यांवर बसली आणि डोळे मिटून म्हणाली,"फुंकर मार. आईला बरं वाटेल..." 
मनीने आईच्या गालावर हात ठेऊन तिच्या डोळ्यावर फुंकर मारली. मग गाल ओढत म्हणाली, "झोका! उंच उंच दे हा ..अगदी उंच !" आईने मनीला झोक्यावर बसवलं. झोका हलकेच पुढे ढकलला... मनी उंच गेल्यावर हसत होती आणि खाली आली की ,"अजून अजून जोरात" असं म्हणत होती. तीन वर्षाच्या आपल्या ह्या मनीला आपण 'शाळेत' किंवा प्लेस्कुल मध्ये घातलं ते तिला मित्र मिळावेत म्हणून...गेले काही दिवस शाळेनंतर तिच्याह्या 'मित्रांबरोबर' आपण बागेत आलो ते तिची 'मैत्री' वाढावी म्हणून. तिच्याशी तिच्या इतकंच खोडकर, निर्मळ, भाबड्या मनाचं तिला खेळणारं कुणीतरी मिळावं म्हणून..आईचं मन कळवलं,तिला वाटलं  मनीला आणि स्वतःला एका छान मऊ bubblewrap मध्ये बांधून घ्यावं..मनीने धडपडावं, चुका कराव्यात खूप खेळावं,शिकावं पण तिच्या मनावर ओरखाडे येऊ नयेत.. ओरखाडे न येता, शिकता येत असतीलच की किती गोष्टी..आईला वाटलं सगळ्यांना, जगातल्या सगळ्या सगळ्यांना, आईला तिची मनी जशी वाटते, कळते, भावते तशीच कळावी. पण तसे लोक कुठे भेटणार,तिच्या मनीचं मन तिच्या इतकं जाणणारे, जपणारे...?
जोरातल्या झोक्यात, वाहणाऱ्या वाऱ्यात मनीला हळूच जांभया यायला लागल्या. तिने लाडिक हाक मारली आईला, पण आईने तिला झोक्यावरून खाली काढलं नाही; आई वाट पाहत होती बेबी आणि गोट्याने येऊन मनीला sorry म्हणण्याची.....



Wednesday, April 11, 2018

Wildflowers and hot glue hearts!

स्प्रिंग ब्रेक आमच्याघरी दीड आठवडा चालला. प्रवास झाला, snow tubing झालं, बर्फाच्या पाण्यात खेळून झालं, zoo मधल्या प्राण्यांना भेट देऊन झाली, potty training झालं, सर्दी खोकला येऊन गेला,( पिल्लामुळे आईला पण),अवेळी पाउस पडून गेला पण आमच्या घरात non stop गुणगुणं नाहीतर बडबड, १२ तास गुणिले १० दिवस चालूच होती. ( इरा १२ तास झोपते, निदान आत्तातरी झोपेत बोलत नाहीये.)  मी खूप आतुरतेने सोमवारी शाळा परत सुरु होण्याची आणि घरातल्या pin drop silence ची वाट बघत होते. रविवार सुट्टीचा शेवटचा दिवस, त्यामुळे ' मुलं' म्हणजे कबीर आणि मेहेर,आमच्याघरी येणार होती... त्यामुळे एकाची बडबड गुणिले ३ अशाने सुट्टीची सांगता होणार हे निश्चित होतं...
मी स्वैपाकघरात होते, इरा खिडकीला तोंड लाऊन त्यांची येण्याची वाट बघत बसली होती. त्यामुळे दार वाजायच्या आधीच निकीतने दार उघडलं. मी किचनमध्ये काम करत होते,तर मी पाठ्मोरीच असताना एक कडकडून मिठी मारण्यात आली. मग माझ्या हातात एक कागदी गिफ्ट बॅग ठेऊन, उड्या मारत, "Open it ! Open it ! I made it !" अशी सूचना करण्यात आली. मी हात धुण्याची पण उसंत नव्हती.  पेपर bag वर लिहिलं होतं, "Contain yourself". आत छान  टिशू पेपर  मध्ये गुंडाळलेली PNG गाडगीळ सराफांची लांबूळकी पेटी. त्या पेटीवर लहान- मोठे पांढरे मोती Hot Glue ने चिकटवून केलेलं छान नक्षीकाम. पेटी उघडली तर त्यात Hot glue  ला आकार देऊन केलेला  गुलाबी रंगाचा बदाम, त्यावर छानसं चंदेरी पॅालिश असलेलं एक छोटं पदक, एका नाजूक साखळी मध्ये अडकवलेलं. सोबत दोन assymetrical कानातलीएका कानात anchor आणि दुसऱ्यामध्ये निळा कुमुद असलेलं एक फुल " Because they look cool !". हे सगळं करणारा प्राणी, मेहेर, वय वर्ष ९ (sometimes going on 30, sometimes 75 and sometimes 5).  तिच्याबरोबर दुसरा प्राणी, कबीर, वय वर्ष १२, आमच्यासाठी एक नवीन Invention घेऊन आला होता, एक बॉक्स-कम-ग्लास ज्यामधून popcorn खाणं आणि कोक पिणं एकत्र करता येयील. त्याचा फोटो मात्र नाही काढता आला कारण संशोधन आजून चालू आहे आणि Product trials इत्यादी अजून व्हायचे आहेत. दोघांनी एकाच वेळी ," do you like it?" चा गजर सुरु केला, पण मी इतकी सुखावले होते की 'मुलांना' ओल्या पापण्यांनी " छान आहे!" एवढंच म्हणू शकले...


कबीर आणि मेहेर, निकीत आणि माझं लग्न व्हायच्या आधीपासून आमच्या आयुष्यात आले आणि आम्ही त्यांना आपसूक 'मुलं' असं म्हणायला लागलो. खरं, माझ्या मोठ्या बहिणीची मुलं, पण मी निकीत बरोबर आहे म्हणून ती मला accept करतात. घरी गेल्यावर , दारात एकटीच उभी असेन तर मुलं सरळ मला ढकलून बाहेर पळत  जातात त्याला भेटायला. इराच्या जन्मानंतर निकीत आणि इरा पहिलं स्थान आणि मी अजूनही afterthought आहे त्यांच्यासाठी. Hero and his sidekick असं म्हणू काहीसं. अलीकडे मी ह्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे मला जुजबी मिठी मारतात किंवा इराला डोक्यावर थोपटावं तसं मला 'उगी ,उगी ' म्हणून पळून जातात. मी एकटीच गेले तर निकीत आणि इरा कुठे आहेत आणि कधी येणार ह्या प्रश्नांची त्यांना पटतील अशी उत्तरं द्यावी लागतात. मला हे मनाला खूप बोचतं. ह्या दोघांचे लहान असताना diaper मी बदलले आहेत, २-३ आठवड्याचे असतांना त्यांची नखं कापली आहेत,शेंबूड पुसला आहे, गोष्टी सांगत भरवलं आहे, कधी थोपटून झोपवण्याचा प्रयत्न केला आहे, माझे भारतीय इंग्रजी उच्चार कसे चुकीचे आहेत हे समजावून घेतलंय,अनेक अनेक दिव्य पार पाडली आहेत त्यांचा स्नेह मिळवण्याकरता. त्यामुळे निकीतकडे त्यांची ओढ जास्त आहे  हे मनाला खुपतं, पण hero worship चा रोख असा ठरवून कुठे बदलता येतो का ? त्यामुळे मी पण status quo acceptकेला आहे. पण मुलं खूप unpredictable असतात.  अचानकअपेक्षा नसतांना त्यांचा spotlight माझ्याकडे वळतो आणि त्यांच्या मायेचा वर्षाव माझ्यावर होतो तेव्हा मन इतकं सुखावतं, नव्याने  त्यांच्या प्रेमात पडतं.. 
इतक्या गोंडस रुपड्याची, हाताने बनवलेली, मोहरणाऱ्या कल्पकतेने अलंकृत केलेली ही भेट, मला एखाद्या ‘खऱ्या’ दागीन्यापेक्षा अधिक मौल्यवान वाटली. पुढे चार पाच तास मी हवेत होते....माझ्या ह्या euphoriaमुळेच मला एक साक्षात्कार घडला..
संध्याकाळी आम्ही तिघंच, मी, कबीर आणि मेहेर एका टेकाड्यावर wildflowers बघत चाललो होतो. चालता चालता आकाशी रंगाची,नाजूक देठाची, अनेक चिमुकल्या फुलांच्या एक गुच्छ म्हणजे एक डेरेदार मोठं फुल, अशा एका अनामिक फुलाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांची पळापळ सुरु झाली की कोण आईसाठी सगळ्यात मोठं , जास्त डेरेदार फुल तोडतय. मी म्हटलं, “I wish someone was picking a flower for me....” उत्तर आलं, “Duh! you can pick one for yourself!” Translated to mean in Adult parlance, “ आई इथे नाहीये, पण तू आहेस तर मग तू स्वतःसाठी स्वतःच फुलं तोड, इतर कुणाची वाट कशाला बघतेस?” मुलांचा भाबडेपणा काही वेळा आपल्याला बोचू शकतो, पण त्याचा नीट विचार केला तर लक्षात येतं की काही सत्य आपल्या हातून आपण ‘मोठं’ होत असतांना निसटलेली असतात. मोठं झाल्यावर आपण उगाच नसत्या obligations इत्यादी मध्ये अडकतो,social niceties वगैरेचा विचार करतो. मुलांच्या उत्तराचं मला हसू आलं आणि खरच स्वतःसाठी फुलं शोधायला लागले.मी मागितलं म्हणून माझ्यासाठी नंतरही त्यांनी फुलं तोडली नाहीत, पण मला आवडलेल्या फुलाचं रोपटं मी मुळापासून काढून घेऊन घरी कुंडीत लावावं अशी सूचना करून झाली. मी सांगितलं की “ wildflowers कुंडीत नाही लावता येत.” त्यावर मग प्रश्नांची रांग लागली...
रात्री मुलं, ताई-सरब बरोबर त्यांच्या घरी गेली तरी मी खूप वेळ आमच्या संभाषणाचा विचार करत राहिले. आपली ही मुलं, आपली असून, आपली नसलेली. त्यांना दररोजची शिस्त, त्यांची भुणभुण, पिरपिर, टूमणी, डोक्यातले स्क्रू पडल्यासारखे वेडंवाकडं वागणं काहीही आपल्याला भोगायला लागत नाही.ह्या सगळ्यावर फक्त त्यांच्या आई वडिलांचा जन्मसिद्ध हक्क असतो. आपल्या वाटेला त्यांचं गुणी, बहुतांश चांगलं, डोक्यातले सगळे स्क्रू जागच्याजागी फीट झालेले असतांनाचं वागणं येतं, त्यांच्या स्वप्नांचे पाढे कधी ऐकायला मिळतात, कधी मोठ्या आवाजातल्या कुजबुज्ण्यात त्यांची ‘secrets’ आपल्याला सोपवण्यात येतात, त्यांच्यातल्या सुप्तगुणांचं बहरणं आपल्याला अनुभवता येतं...आपण फारशी मेह्नात न करता ही मुलं अत्तरदाणीतलं अत्तर शिंपडावं तसं आपल्यावर प्रेम शिंपडतात- पण तेही दररोज आपल्या वाटेला येत नाही. seasonal असतं. त्या टेकड्यावरच्या wildflowers सारखंच. कुंडीत लाऊन दररोज पाणी घालून नाही बहरत ती, उंच झाडांच्या सावलीत, भरपूर थंडी पावसानंतर, डोंगर उतारांवर, मुक्तपणे वाढत बहरत असतात ती..आपल्याला फक्त तिथपर्यंत जाऊन पोचायला लागतं...