लहानपणी, वार्षीक परीक्षेनंतर मिळणारी उन्हाळ्याची सुट्टी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चैन असायची. In fact, शाळेतले दिवस पटपट संपायचे, कॅलेंडरची पानं भर्र्क्कन पुढे सरकत जायची ती त्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आस मनात घर करून असायची म्हणूनच.. दिवाळीची सुट्टी, किल्ले, आकाश कंदील, फराळ, अभ्यंग स्नान, नवीन कपडे, भाऊबीज इत्यादी मज्जा घेऊन यायची पण त्यात निवांतपणा, लोळत बसणे, वर्ष सरून मोठं झाल्याची जाणीव होणे असे स्वतः बद्दलचे समज, गैरसमज करून घेण्याचा आवकाश नसे.
उन्हाळ्याची सुट्टी सगळच घेऊन येई, प्रत्येक वर्षी मनात स्वतः बद्दलची coming of age फिल्म बनत असे. उगाच वाटत असे आपण कसे शहाणे, मोठे होत आहोत; तुमच्यापेक्षा अमुक अमुक पावसाळे जास्त पाहिले आहेत म्हणण्यापेक्षा मोठ्यांनी अमुक अमुक उन्हाळे जास्त पाहिले आहेत असं म्हणावं असे वाटे.. इयता नव्वी आधीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या 'लई भारी' होत्या.... त्या इतक्या मुक्तपणे, उनाडपणे अनुभवल्या म्हणून त्या सुट्ट्या जितक्या हव्या हव्याश्या वाटत तितक्याच आज त्या दिवसांच्या आठवणी प्रिय आहेत..
आम्हाला सुट्टी असली तरी आई बाबांना नेहमीच कसलं न कसलं काम असत. सुट्टी निम्मित कुठेतरी सहलीला गेलं पाहिजे असं आमच्या कुटुंबात अजिबातच घडत नसे. आई शिक्षिका असल्यामुळे तिला पेपर तपासायला जाणें, refresher कोर्स इत्यादी साठी जावं लागे. रोज सकाळी उठून, इतर दिवट्यानी पेपर मध्ये काय दिवे लावले आहेत ह्याचा निकाल लावायला आईला जायला लागे. त्यामुळे माझं निकालपत्र कधी घरी येतंय ह्याबद्दल एक Antenna सतत active असे. पण माझ्या परीक्षेचं दडपण मी सोडून घरातली इतर माणसंच घेत, त्यामुळे निकालाचे दडपण पण मी त्यांच्यावरच सोपवलेलं होतं.
Fridge आल्यावर, त्याचं आम्हाला भयंकर आकर्षण होतं. माठातलं वाळा घातलेलं पाणी fridge मधून बर्फच्या रुपात पोटात गेलं की वेगळीच मज्जा वाटे. Fridge बराचसा मोकळाच असे, त्यात आज ठेवतो तशा खचून गोष्टी भरलेल्या नसत. पण fridge आल्या नंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आई घरात पेप्सीकोला आण्याला लागली आणि नंतर अनेक वर्ष सुट्टीच्या पहिल्या दिवशी फ्रीझर मध्ये पेप्सीकोला आणून आणून ठेवलेला असे. मुळातच fridge च आकर्षण, त्यात पेप्सी ही नाही आणि कोला पण नसलेला पेप्सीकोला! आम्हाला lotteryच लागल्यासारखं वाटायचं.. पेप्सीकोलाच्या box वर 'एक शेकडा' असं काळ्या रंगाच्या स्केचपेन ने लिहिलेलं असायचं.मला शंभर म्हणण्यापेक्षा एक शेकडा म्हणणं जास्त भारदस्त वाटायचं. शिवाय आहे त्यापेक्षा जास्त ऐवज आहे अशी फसवी समजूत शेकडा हा शब्द मला करून द्यायचा. दररोज उठून कुठल्यातरी दुकानातून कुठल्यातरी अस्वछ्, अशुद्ध पाण्याचा केलेला पेप्सीकोला खाणायचा आम्ही हट्ट करू नये म्हणून सुट्टीच्या पहिल्या दिवशी fridge च्या फ्रीझर मध्ये हे wholesale शेकडा पेप्सीकोले हजर होत. (आता ते पेप्सीकोले स्वच्छ पाण्याचे आहेत ह्याचे quality testing आईने कसं केलं होतं हे माहित नाही - पण आम्ही अनेक वर्ष त्यांचा आस्वाद घेऊनही कधी आजारी पडलो नाही, पोटं बिघडली नाहीत.) मला सगळ्यात जास्त त्यातला काला खट्टा चा स्वाद आवडत असे, त्यानंतर काचेच्या हिरव्या बाटलीच्या रंगाचा 'खस' स्वाद असलेला. दादाला पण हे आवडत आणि मग कधी कधी आम्ही ते शेर करत असू. ताईला कुठला जास्त आवडायचा आता आठवत नाही -पण ती नेहमी आमच्याबरोबर exchange करायला तयार असे, बरेचदा तिच्या वाटणीचा पेप्सीकोला ती आम्हाला देऊन टाके. पेप्सीकोला कधी खायचा ह्या बद्दल लिखित अलिखित नियम नव्हते. त्यामुळे मनात आल्यास सकाळी उठल्या उठल्या सुद्धा पेप्सीकोला खाण्याची मुभा होती, फक्त आम्हा तिघांना, दिवसाला एक पेप्सीकोला असा कोटा होता. सकाळी सकाळी स्वतःचा पेप्सीकोला संपवला तर मग दिवसा भावंडाना त्यांचा पेप्सीकोला खाताना बघून परत मोह होणार आणि त्यावेळेला फक्त मिटक्या मारण्याशिवाय पर्याय उरणार नाही, म्हणून आपोआपच मनावर संतुलन राही .. अर्थात हा धडा अनुभवातून सिद्ध होई, पहिले दोन तीन दिवस सकाळी सकाळी पेप्सीकोला खाऊन झाल्यावर! पेप्सीकोला घरात आणूनसुद्धा कधी आई बाबांनी खाल्ला नाही, खूप आग्रह केला किंवा उन्हातून आल्यावर आईच्या हातात तो ठेवला तर एखादवेळ ती तो खाई. पण fridge घरात आल्यावर आईला 'समशीतोष्ण'पाणी प्यायला आवडायला लागलं. fridge मध्ये पण आम्ही तांब्यातच पाणी गार करायला ठेवत होतो, बाटल्या- बीटल्या खूपच नंतर आल्या.
Fridge आल्यानंतरच्या काळात नंदा आजी म्हणजे बाबांची आई cancer मधल्या पहिल्या chemo मधून बरी झाली त्यानंतर वाडा सोडून आमच्याबरोबर राहत होती. तिच्यासाठी बाबा ice cream, कुल्फी आणत,( घशाचा cancer होता तिला). ते पण ती जेमतेमच, थोडं थोडकं खाई. आजीला पेप्सीकोला दिल्यावर ती गालावर थापटी मारत म्हणे," तुम्ही खा हो...मला नाही त्याचं काही आपरूप." तिच्या ह्या गालावरच्या थापटी मारण्यात तिच्या डोळ्यात बघितलं की मला त्या पेप्सीकोला बद्दल वाटणारी ओढ बरोबर का चूक असा प्रश्न पडे....पण मग तो प्रश्न पेप्सीकोला आणि fridge मधल्या बर्फाच्या cubes कुडुम कुडुम करण्यात डोक्यातून विरघळून जाई.
Fridge मधल्या ice cubes कुडुम कुडुम करून खाण्याला वेळेची बंधनं होती. झोपेच्या आसपास घरात हा आवाज झाल्यावर प्रचंड चिडचिड होई, ती व्यक्त करायला शब्दांचा पण वापर करण्याची गरज नव्हती. चेहरा, भुवया , भावमुद्रांंमधून सगळं व्यक्त होई, इतकं छान व्यक्त की तोंडातला बर्फ आपसूक घशाखाली उतरत.
वार्षिक परीक्षा संपत असतानाच घरात कोकणातली एक आंब्याची पेटी आलेली असायची. देसाईबंधूची आणखीन एक पेटी असे दोन पेट्यातले आंबे आढ्यात पिकत असायचे. घराच्या दारात उभं राहिल्या राहिल्या पिकणाऱ्या आंब्याचा वास यायचा.. सकाळी कुकरच्या शिट्ट्यांंबरोबर दरवळणारा आंबे मोहर तांदळाचा वास जेव्हा ह्या आंब्याच्या वासात मिसळायचा , तेव्हा एक वेगळीच तृप्ता अनुभवायला मिळायची. त्या भाताबरोबर मेथांबा, कैरीची आमटी, कांदा कैरी, कैरीचे सार हे किंवा असं काहीसं आंबा कैरी भवती घुटमाळणारं काहीतरी दुपारच्या जेवणात हमखास पानात पडायचं.
घरात एवढे आंबे असूनसुद्धा मला स्वतः आंबा सोलून , फोडी करून खायला कधीही आवडत नसे. आई, ताई, क्वचित आजी आणि भाऊ हे माझ्यासाठी ते काम करत. सकाळी बाहेर पडायच्या आधी आई पिकलेले आंबे बाहेर काढून ठेवी आणि मग त्याच्या फोडी करण्याचे किंवा दूध आंबा करण्याचे काम हे खाणाऱ्याची जवाबदारी असे. दादाने वेगवेगळ्या ग्लासात दूध आंबा करून fridge मध्ये ठेवण्याची प्रथा सुरु केली. किती आंबा, किती दूध ह्याचं proportion ठरलेलं असे. Mixer, Blender, Hand mixer अशी काहीही भानगड नाही. मग कधीतरी का कुणास ठाऊक आमच्यात, कुणाचा दूधआंबा सगळ्यात शेवटी संपतो ह्याची चढाओढ सुरु झाली. त्यात जिंकणाऱ्याला कोणतेही बक्षीस मिळत नसे, फक्त स्वतःचा किती control आहे वगैरे मिरवायला मिळे.
मी आणि दादा जरी घराबाहेर पत्ते, कँरम, डबा ऐसपैस, क्रिकेट काहीही खेळायला गेलो असलो तरी मी दर तासाला घरात जाऊन दूध आंब्याचा एक एक घोट पीत असे. असे दर तासाला घरी येण्याने, दाराची बेल वाजवल्याने आजी हैराण होत असणार, पण कधीतरी," असं सारखं येऊ जाऊ नकोस.." असं म्हणण्या पलीकडे ती कधी काही ओरडली नाही. Main दरवाजा stopper ने उघडा ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, पण वाड्यासारखा आसपास घरोबा जमलेला नव्हता , आणि इतका सुसाट वारा असायचा की दार अनेकदा जोरात आपटून बंद होई; आजीला त्याची भीती वाटे. पण हा सगळा उपद्याप करूनही, मी खेळातून दर तासाने परत हजार होत आणि एक घोट दूध आंबा पीत. दादा मात्र रणरणत्या उन्हातून खेळून आल्यावर, जेवण उरकून मग एका दमात त्याचा ग्लास संपवून टाके. मग bedroom मध्ये पडदे ओढून अंधार झाला, तो दुपारच्या झोपेला गेला की मी हळूच माझ्या ग्लासातला शेवटचा घोट पिऊन टाके आणि नंतर दादाला चिडवत बसे. मग आम्ही घरभर झटापट करत, आरडा ओरडा करत, दारं ढकलत, सगळ्यात वरच्या पट्टीत खिदळत, बरळत फिरत बसू. अर्थात शारीरिक चकमकीत दादाच जिंकायचा. दिवसातून त्याला एकदा तरी," मनीष दादा तू देव आहेस. मनीष देवा मला माफ कर.." असे म्हणायला लावायचा. ताईचा दूध आंबा मात्र fridge मध्येच राही. तिची चढा ओढ आई बरोबर संध्याकाळी घडे. ताईचे म्हणणे दूध प्यायलाने तोंडाला वास येतो, आई चे म्हणणे दूध प्यायलच पाहिजे...ताईच्या वाटचा दूध आंबा दिवसभर fridge मध्ये राहून जास्त मुरलेला असे -तो अर्थात कुणाच्या पोटी जात असेल हे सांगायला नकोच..
त्या मूर्ख चढाओढी मुळे दर तासाला एक एक घोट घेतलेला किंवा एका दमात संपवलेला तो दूधआंबा- खरच आम्ही त्याचा आस्वाद घेत होतो का? का खरा आस्वाद आमच्या लुटूपुटूच्या भांडणामध्ये आणि चढाओढीत होता? कदाचित तसच असावं.. सुट्टीतली भावंडांशी केलेली भांडणं ही स्वतःच्या आणि इतरांच्या करमणुकीचा मोठा source होती. चढाओढी कशाबद्दल ही असत. साबुदाण्याची खिचडी खाताना एक एक साबुदाणा खाऊनही कोण खिचडी आधी संपवतय, सगळ्यात जोरात घराचे दार कोण लाऊ शकतंय, राणी ( आमची कुत्री) सगळ्यात जास्त कुणाचं ऐकते, कुणाशी जास्त खेळते,कुणाकडून दूधपोळी पटकन खाते, कुणाला जखमेवरची खपली काढताना अजिबात रडू येत नाही, कोण सगळ्यात जास्त जोरात ओरडू शकतं, शेजाऱ्यांंची बेल वाजवून, आवाज न करता कोण पळून जाऊ शकतं..मी आणि दादा काहीही bet लावायचो.. ताई ह्यामध्ये फारशी नसत.
ताई आमच्यात हे पोरकटपणे करायला फार कमी वेळा येत.. आता विचार केल्यावर वाटतं त्या काळात ती आजीसाठी घरात राहत असणार.ती माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. तिला भेटायला तिच्या अनेक मित्र -मैत्रिणी घरी येत, ते पण माझे खूप लाड करत. कुणी गरवारे कॉलेज जवळच्या तापडिया मधून सामोसे आणत, कुणी शनिवारवाड्या जवळच्या दुकानातून साबुदाणा वडा आणत. अर्थात आम्ही हे वाटून खात. माझ्या आठवणीत ताई सुट्टीत नेहमीच काहीतरी शिकत/ शिकवत असायची...उन्हाळ्याच्या सुट्टीत ताई ज्या ज्या शिबिरांना गेली, त्यातलं ती मला पण काही न काही शिकवत गेली.
ह्या सगळ्या अगदी मी आठ नउ वर्षाची असतानाच्या आठवणी.बिनडोक उनाडपणा संपला किंवा विचार करायला शिकवून गेला तो चौथी नंतरचा उन्हाळा. शेवटच्या पेपरहून वाड्यात गेले, आणि आजी गेलीच होती,... ते जाणार, ती गेली तर ती सुटेल ..असं काय काय कुजबुजणं आधी कानावर अनेकदा पडलं होतं. मी घरी आले आणि घराबाहेर ही मोठी गर्दी जमलेली. पण त्यातल्या ओळखीच्या कुणीच मला घरात शिरण्यापासून थांबवलं नाही. घरात शिरल्यावर आजीची वाड्यातली मैत्रीण, कावेरी आजी, तिनेच सगळ्यात आधी मला जवळ घेतलं. ताई, दादा तेव्हा काय करत होते, त्यांना कोण कुशीत घेऊन समजावत होतं ते आठवत नाही.. आजोबा, वडील आणि आई सगळं कार्य उरकण्यात मग्न होती, त्यांनी जुजबी पाठ थोपटली. घरात अन्न शिजवायचं नाही वगैरे त्या आधी मी अनुभवलं नव्हतं... एरवी वाड्यातल्या वेगवेगळ्या घरातून आलेले डब्बे चवीने खायला अवडलं असतं पण त्या दिवशी पिठलं भात तोंडात घोळत राहिला. आजी 'जाणं' म्हणजे नक्की काय ह्याचा अर्थ मी लावत होते... कोनाड्यातल्या आरशा शेजारी तिची Afghaan Snow ची बाटली, कुंकवाचा करंटा तिचा अडकित्ता आणि शेजारीच तारेवर तिची आवडती विटकरी रंगाची, निळ्या बुट्ट्याची, बारीक चंदेरी काठाची साडी टांगलेली होती....
डोक्यात हे असले विचार, curiosity घोळत राहिली असणार म्हणून असेल कदाचित पण माझ्या स्वप्नात आजी आली आणि म्हणाली, "आळंदीला घेऊन चल मला बबड्या..."
आजीला वारकऱ्यांचे खूप कौतुक होतं, पालखी बरोबर, वारकऱ्यांबरोबर, ती आणि कावेरी आजी थोडं अंतर चालत जात. Cancer झाल्यापासून मात्र ती फक्त ओसरीतूनच वारकर्यांना बघे, त्यांना शिधा द्यायला, चहा पाणी द्यायला धडपडे. पण तिला खरी आस लागून राहिली होती ती तिच्या कोकणाची ..बकुळी, आंबा, फणस,पोफळी... डोक्यात खोवलेल्या कर्दळीच्या, सोनचाफ्याची... औषधांच्या ग्लानीत ती अनेकदा हे बोलून दाखवे. पण मग आळंदी का आणि मला स्वप्न का ? हा प्रश्न मला अजूनही अनेकदा पडतो, आणि त्याची अनेक अनेक उत्तरं सापडतात.
बाबा, आजोबा, कावेरी आजी आणि मी आळंदीला गेलो..अस्थीविसर्जन करून परत बस मध्ये बसलो, तेव्हा बाबांच्या कुशीत शिरताना मला वाटलं....दर तासाला बेल वाजवून तिला नको होतं सतत उठवायला... स्टूल वर उभं राहून स्वैपाक करण्याचा हट्ट करत असताना, जरा तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं होतं. जरा तिच्या शेजारी बसून कधीतरी तिच्या धापा लागणाऱ्या आवाजात तिचा कोकणचा विरह, आळंदीची आस समजून घ्यायला हवी होती...पण आजी गेली म्हणजे हे पण सगळं गेलं...... आणि माझा अगदी बिनडोक उनाडपणा पण त्या सुट्टीत गेला....
( Continued.... )
No comments:
Post a Comment