facebook

Monday, July 15, 2019

DNA

DNA हा मराठी सिनेमा खरंतर २९ जूनला अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये प्रदर्शित झाला. त्या पहिल्या शो नंतर लगेचच त्या बद्दल प्रेक्षकांनी भरभरून लिहिलं. Mukund Marathe , Shirin Mhadeshwar , Mohana Joglekar ,ह्यांनी त्यांच्या पद्धीतींने उत्तम परीक्षणं लिहिली. हा सिनेमा साकारण्यात माझ्या स्नेहातली काही मंडळी असल्यामुळे मी माझ्या परीने उशिरा का होईना हे परीक्षण लिहिते आहे. संधी मिळाल्यास हा सिनेमा नक्की पहा ! 

**** Spoilers alert, ****

DNA, अमेरिकेतला पहिला मराठी सिनेमा आहे, पण फक्त काही मराठी माणसांनी एकत्र येऊन सिनेमाचे चित्रीकरण अमेरिकेत केले आहे म्हणून नाही, तर ह्या सिनेमाचं कथाविश्व हे इथे अमेरिकेतच घडू शकतं म्हणूनही.  शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत राहायला आलेली माणसं, त्या शिक्षण प्रक्रियेत बदलतात. ज्ञानाने, अनुभवाने समृद्ध होतात तशी त्यांची जीवनशैली पण बदलते. आधी आई वडील,मित्र परिवारापासून लांब, नवीन बस्तान बसवायचं म्हणून आत्मनिर्भरता अवलंबली जाते पण मग हळू हळू लक्षात येतं की अमेरिकेत रूळायचं असेल तर  इथल्या Individualistic  समाजपद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे माणसं अलिप्त होतात किंवा माणूसघाणी होतात असं नाही, ती जास्त खंबीर होतात. सगळेच भारतीय असं करतात असं माझं म्हणणं नाही, पण ह्या सिनेमाचे कथानायक, कांचन आणि यतीन, तसे आहेत असं मला वाटतं. 
जीवन मरणाचे निर्णय घ्यायचे झाले, तरी कुणा मोठयाचा सल्ला किंवा इतर कुणाच्या पाठिंब्याशिवाय आपण स्वतःचे बरं वाईट ठरवू शकतो आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाऊ शकतो, असा आत्मविश्वास किंवा आभास (?) बाळगून,कांचन आणि यतीन आयुष्याचे  निर्णय घेतांना दिसतात.
मिसकॅरेजेस, सदोष स्त्रीबीज त्यामुळे निरोगी मूल जन्माला घालण्याची अशक्यता ,अश्या सगळ्या भावनिक, नाजूक गोष्टी रंगवताना यतीन किंवा कांचनचा भावनिक विस्फोट ,रडण्या ओरडण्यातून किंवा आई वडिलांशी / मित्रांशी हळव्या संवादात अडकत नाही. त्यांच्या एकमेकांच्या विश्वात माजलेलं काहूर ते अतिशय रॅशनली सोडवण्याचा प्रयत्न करतात. मला हे भावनाविवश होऊन आक्रस्ताळेपणा न करणारे, कणखर कांचन आणि यतीन खूप आवडले. हे असे नायक लिहिण्यात, साकारण्यात सगळ्याच DNA च्या टीमचा मोठा वाटा आहे.
मूल दत्तक घेतलं तर ते आपल्यासारखं ,'आपलं ' असणार नाही. स्त्रीबीजात मायटोकाँड्रियल डीफेकट असल्यामुळे सरोगसी हा पर्याय आपल्याला लागू पडणार नाही. मग इंग्लंड मध्ये होणाऱ्या क्लिनिकल ट्रायल मध्ये आपल्याला थ्री पेरन्ट बेबी मिळू शकतं हे त्यांना कळतं. यतीनला कुठल्यातरी तिसऱ्या माणसाची जेनेटिक भेसळ स्वतःच्या मुलात नकोय. कांचनला तो अतिशय कोरडेपणाने सांगतो, "दोष तुझ्यात आहे ....मला माझी जर्मलाइन करप्ट करायची नाहीये." हे ऐकून कांचन भडकते आणि त्याला एक सणसणीत थोबाडीत मारते. तो घरातून बाहेर पडतो. ती घरात, तो कॉफी शॉप मध्ये. ती फोन मेसेजेस मधून त्याला घरी बोलावते, थोडया वेळाने तो घरी परततो. ह्या एका भांडणावर खूप फुटेज वाया घालवता येऊ शकलं असतं, पण लेखक आणि दिग्दर्शकाची म्यॅच्युरिटी दिसते ती ते भांडण  तेवढ्यातच आटोपशीर घेऊन सिनेमा पुढच्या टप्प्याकडे वळतो. एवढं खोलात जाऊन त्या भांडणाबद्दल लिहिण्याचं कारण असं की त्यानंतरच्या सीनमध्ये सिनेमाचा गाभा आहे असं मला वाटतं. रात्री त्यांच्या खोलीत, यतीन अचानक काहीतरी सुचून उठतो,क्लिनिकल ट्रायल मधून आपल्याला मूल कसं मिळणार आहे हे दाखवायला काही वरवरच्या वाटणाऱ्या गोष्टी एका ग्लासात गोळा करतो. कांचन कडून तिची अंगठी (साखरपुडा/ लग्न)  घेतो तिचं स्त्रीबीज म्हणून , स्वतःचा स्पर्म म्हणून ब्रश आणि कांचनच्या मेकअप बॉक्स मधलं एक डबडं, म्हणजे अनोळखी व्यक्तीचा मायटोकाँड्रिया दर्शवणारं प्रतीक म्हणून. स्वतःच मूल तर हवं आहे पण माहित नसलेल्या कुणाही त्रयस्थ स्त्रीकडून तिच्या स्त्रीबीजातला मायटोकोण्ड्रिया घेऊन तो कांचनच्या सदोष स्त्रीबीजात मिसळण्याऐवजी, यतीन एक वेगळाच प्रायोगिक उपाय सुचवतो. ग्लासातून तिची अंगठी काढून तिच्या हातात ठेवत तिला सांगतो की ह्या एग मध्ये प्रॉब्लेम आहे तर ते बाजूला ठेऊया.  एग डोनर व्यक्ती आपल्या आवडी निवडीने आपल्या  क्रायटेरिया मध्ये बसणारी, आपणच शोधूया,  आणि मग ते बाळ तू तुझ्या पोटात वाढव म्हणजे तुला पण मातृतव अनुभवता येईल. तुझ्या बाळाची तूच सरोगेट आई हो,असं यतीन कांचनला पटवून देतो. ती नाखुशीने हा पर्याय स्वीकारते हे तिच्या देहबोलीतून, चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं.. टेस्टट्यूब दाखवणं अशक्य आहे हे समजून इथे एका ग्लास मध्ये होऊ घातलेलं बाळ दाखवणं प्रतीकात्मक आहे. ती प्रक्रिया पूर्णतः क्लिनिकल आहे  हे शब्दातून न मांडता, सिनेमा हे दृश्यांचे माध्यम आहे तर केवळ दृश्यातून दाखवणं हे छान जमवून आणलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या एका प्रसंगातून सिनेमातलं द्वंद्व ह्यापुढे दोन पातळ्यांवर चालू राहणार हे उघड होतं. 'आपलं' वाटेल असं हाडामासांचं मूल हे दोघं कसं मिळवणार ? आणि त्या मुलाच्या ध्यासात वेगवगेळे पर्याय पडताळताना ह्या जोडप्याचं नातं शाबूत राहील का ?  
यतीन आणि कांचन मध्ये आपण गुंतलो असल्यामुळे आपल्यालाही वाटायला लागतं की ह्या दुपदरी द्वंद्वातून ह्या दोघांना एकत्र ठेवणारा मार्ग निघू दे. पुढे ही दोन्ही द्वंद्वाची विश्व विस्तारत जात असताना काही ठिकाणी नीटश्या ट्रांझीशन्स विणता आलेल्या नाहीत . सिनेमा पाहताना त्या खटकतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे सिनेमा बघत रहावासा वाटतो. 
ह्या कथा विश्वात उपस्थित होणारे सगळेच प्रश्न सिनेमा संपतो तेव्हा सुटत नाहीत . क्लिनिकल ट्रायल बद्दल माहिती मिळते,कांचन सहभागी होणार हे दिसतं ,पण प्रत्यक्षात ती ट्रायल, त्यातली इतर कुटुंब न दिसता सुद्धा आपल्याला साद घालतात. त्यांच्या बद्दल उत्सुकता वाटत राहते.
कांचन आणि यतीनच्या आयुष्यात मैत्रेयी नावाचं छोटं माणूस आल्यावर सिनेमा काही काळ थोडा सैल पडतो. ह्या नंतरच्या प्रवासात यतीनच्या स्वभावाचे कंगोरे जितके छान दाखवले आहेत,मैत्रेयीला काखेत उचलून धरणारा यतीन ते इमर्जन्सी रम मध्ये, "येस आय अँम् हर फादर." म्हणणारा यतीन ,हा  प्रवास चांगला रंगवलाय. तितकासा कांचनचा ग्राफ बदलत नाही. 
एका जोडप्याला मूल हवं आहे मग त्यांना एक गोंडस, प्रेमळ मूल मिळालं म्हणून लगेच इन्स्टंट हॅपी फॅमिली होत नाही, हे पचायला जड असलं तरी पडद्यावर ते छान साकारलंय. 
मैत्रेयीला त्यांनी भारतात पाठवून देऊ नये असं आपल्याला प्रेक्षक म्हणून कित्तीही वाटत असलं तरी, रॅशनल कांचन आणि यतीन पाणावलेल्या डोळ्यांनी तिचा निरोप घेतात. काल्पनिक विश्वात न रमणारे कांचन आणि यतीन त्यावेळेला आणखीनच आवडून जातात. एक नवीन विश्व निर्माण करायच्या आधी, आहे त्या विश्वातले वेगवेगळे पुर्जे डिसअसेम्बल करून त्याच तुकड्यातुन पुनरनिर्मिती करावी लागणार आहे हे शाश्वत सत्य जड मनाने ते स्वीकारतात.
औषधं,शस्त्रक्रिया, नवनवीन रिसर्च मधून आपल्याला ग्रासलेल्या प्रॉब्लेम्स वर उपाय मिळतीलच, पण अंतरंगातले पुर्जे पण थोडे हलवायला लागतील, स्वतःला पुन्हा पारखावं लागेल तरच त्या 'व्याधीचं' /प्रॉब्लेम्सचं' खरं निराकरण करता येईल असा काहीसा संदेश सिनेमातून आपल्यापर्यंत येऊन पोचतो. 
सिनेमा संपल्यावरही खूप वेळ मनात रेंगाळत राहतो. म्हणूनच संधी मिळाली तर हा सिनेमा आवर्जून बघा !
DNAचया सगळ्या टीमला खूप शुभेच्छा ! आणि ह्या कलाकृतीमुळे अपेक्षा उंचावल्या आहेत त्यामुळे पुढच्या प्रोजेक्ट्स साठी ऑल द बेस्ट !

No comments:

Post a Comment