एखाद्या नात्याच्या संदर्भात, “Closure” ह्या शब्दाला जी व्याप्ती आहे ती ‘पूर्णविराम’ ह्या मराठी शब्दात नाही. नुकत्याच पार पडलेल्या CaLAA च्या एकांकिका महोत्सवातल्या तीनही एकांकिका, “ गेले द्यायचे राहून..”, “ प्रथमपुरुषी”, “ प्रेमच म्हणू हवं तर..”, ह्यामधली पात्र हे “ closure” शोधत होती..आणि ते हातात येऊन निसटत होतं किंवा मिळूनही मनाची घालमेल वाढवणारं होतं..
"गेले द्यायचे राहून .." मध्ये उजवीकडून समृद्धी घैसास, अमोल लेले आणि अमिता वैद्य
“गेले द्यायचे राहून” लिहिणारा चक्रपाणी चिटणीस, कविमनाचा आहे, त्याने लिहिलेलं, ‘कृष्णकिनारा’ ह्या अरुणा ढेरेंच्या कथेवर आधारित नाट्यही तसच आहे. त्याच्या काव्यमय वाक्यांना चार भिंतीतल्या देखण्या set मध्ये न आडकवता, शाम, रुचिरा आणि राधिकाला, ओढ्याकाठी बसवलं तरीही त्यांची व्यथा ऐकावीशी, पहावीशी वाटेल अशी आहे. Its a lyrical tragic lovestory. काहीही कारण न सांगता ,शाम ,राधिकाशी,त्याच्या बालमैत्रिणीशी, नातं तोडून टाकतो. देवदास सारखा, तिच्यावर झुरत, आयुष्य बाटलीत वाया घालवत नाही, तर खूप शिकतो, कविता करतच राहतो, पुन्हा प्रेमात पडतो, रुचीराशी लग्न करतो, Neurosurgeon म्हणून अफाट यश मिळवतो. पण त्याच्या मनाला सतत एक बोच असते, अपराधीपणा असतो.पंधरा वर्षांनी अचानक राधिकाचं पत्र येतं. त्याच्यासाठी नव्हे तर रुचीरासाठी; रुचीराला भेटण्याकरता.अमिता वैद्य आणि समृद्धी घैसास ह्या दोघींच्या वाचिक अभिनयामुळे – बायको आणि प्रेयसी एकमेकींना भेटतात, तो प्रसंग खूप रंगला; एकांकिका एका टिपेला घेऊन गेला. अमोल लेलेचा वाचिक अभिनय त्या दोघींना पूरक आहे , पण तो अवघडलेल्या देहबोलीने रंगमंचावर वावरत राहिला. संहितेचे सामर्थ्य असं आहे की रुचीराची परवानगी घेऊन जेव्हा राधिका-शाम भेटतात तेव्हा नव्याने त्यांच्यात काही घडणार आहे अशी शक्यताही मनात उद्भवत नाही...पूर्वी नातं जिथे विरलं, पण निरोप घ्यायचा राहून गेला, त्या नाजूक क्षणाभवती शाम आणि राधिकाचा प्रसंग घुमत राहतो; गळ्यात आवंढा येतो आणि मनात येऊन जातं “पटकन आटपा हा निरोप आणि नवनिर्मित कोशात परत फिरा..” राधिका शामची जुनी कवितांची Diary त्याला सुपूर्त करते, तो अनेकदा तिची माफी मागतो. पण diary परत करून त्यातल्या कविता राधिका स्वतःच्या मनातून पुसून टाकू शकणार नसते आणि माफी मागूनही शामच्या मनातली सल जाणार नसते...अपूर्ण स्वप्न, अपूर्ण आणा भाका, ”गेले द्यायचे राहून..” राहूनच जातं. राधिकाचं पात्र अपूर्ण वाटतं आणि संहिता नीट डोळसपणे Edit केली तर नाट्यप्रयोग जास्त परिणामकारक ठरेल असं वाटतं.
'प्रथमपुरुषी' मध्ये अवधूत भांबारे आणि अनुपमा चंद्रात्रेय
चंद्रशेखर फणसळकरांची “ प्रथमपुरुषी” ही एकांकिका २००२ साली पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत खूप गाजली होती आणि त्यात काम करणारे अनिरुद्ध दिंडोरकर आणि अश्विनी परांजपे यांना अभिनयाची बक्षिसं मिळाली होती. अवधूत भांबारेने दिग्दर्शित केलीली ही एकांकिका रंगमंचावर साकारणं खूप अवघड आहे. एक मध्यमवर्गीय पुरुष ,स्वतःची काही महिन्यांची जमवलेली पुंजी एका कॉल गर्ल बरोबर रात्र घालवण्याकरता पणाला लावतो. भीड न बाळगता शरीरसुख त्याला उपभोगायचे आहे असं तो अनेकदा बोलून दाखवतो पण तिला हात लावतो, ते सुद्धा घाबरतच.अर्थातच नाटकाच्या संवादात, शृंगारिक आणि लैंगिक आलेख खूप आहेत. पण घडतं ते सगळं शब्दातून - कसले ही वेडेवाकडे चाळे नाहीत . अनैतिक स्पर्शाला आसुसलेला,पण भीड न चेपलेला, एक मध्यमवर्गीय पुरुष, अवधूत भांबारे ने देहबोली आणि त्याच्या टाईमिंग मुळे छान साकारला. त्याला प्रयोगादरम्यान किंवा नंतरसुद्धा प्रेक्षकांची खूप दाद मिळाली. अनुपमा चंद्रात्रेयानि साकारलेली ‘call girl’ची भूमिका अवघड आहे; वाक्य तोटकी,विनोद निर्मितीची शक्यता नाही, आणि पूर्णवेळ रंगमंचावर वावर आहे तो शृंगारिक प्रतीक म्हणून. त्यांनी त्यांची भूमिका चोख साकारली ,म्हणूनच, पस्तिशीला आलेल्या त्या मध्यमवयीन पुरुषाची किळस वाटली नाही , तर तो वाट चुकल्याची खंत वाटते. एकांकिकेच् पूर्ण काळं नेपथ्य, नायकाचा काळा पोशाख ,फक्त नायिकेची साडी लाल पांढरी ,काही लाल accents हे समीकरण देखणं दिसत असलं, तरी त्यामागचं प्रयोजन नीटस कळलं नाही. ही संहिता काळ्या पांढऱ्या रंगसंगतीत बसवणं त्या विषयाची रुंदी संकुचित करण्यासारखं आहे. मूळ संहितेतच पुरुष पात्र विनोदी आहे का ? आणि तसं ते पात्र विनोदी नसतं तर Erectile dysfunction सारख्या नाजूक विषयावरची ही एकांकिका प्रेक्षकांना हसवून न जाता , त्यांना sensitively एका दुखऱ्या विषयावर विचार करण्यास भाग पाडू शकते का ?
"प्रेमच म्हणू हवं तर.." मध्ये समृद्धी घैसास आणि मंदार खोजे "
प्रेमच म्हणू हवं तर " ही, चं. प्र.देशपांड्यांची एकांकिका ,आनंद घाणेकरांनी दिग्दर्शित केली होती. दोन वेगळ्या विचारसरणीची लोकं, एका तत्ववादी आणि एक पांढरपेशा, अत्यंत मूलभूत प्रश्नावर, म्हणजे ‘मूल होऊ द्यायचं नाही' ह्या बद्दल compromise करून प्रेमात पडतात. ते compromise त्यांच्या नात्याचं स्वरूपच बदलून टाकतं. घरातली वेग वेगळी उपकरणं एका मागोमाग बिघडत राहतात . ती दुरुस्त करून आणण्याचा, किंवा प्लंबर, सुतार , ईलेक्त्रीशिअन सारखे कुशल हातमजूर शोधणं आणि त्यांच्या करवी योग्य काम करून घेणं, हा ह्या जोडप्यातला संघर्षाचा मूळ मुद्दा वाटतो. पण तो संघर्ष फक्त प्रतीकात्मक आहे. आपल्याला पहिल्या दहा मिनिटात कळतं की स्वतःच विरत जाणारं नातं जोडून ठेवण्याचा फोल प्रयत्न करतायत अनुराग आणि अंतरा. चं.प्रच्या ह्या अंतरा आणि अनुराग बद्दल आपल्याला आपुलकी , खंत , राग वाटत नाही, पण ते आणि त्यांच्या वादाचा मुद्दा, त्यांच्या छोट्या चकामकी, ओळखीच्या वाटतात. त्या दोघांच्या dysfunctional नात्यात फक्त आपण 'बघ्याच्या' भूमिकेत आहोत, का ते दोघंसुद्धा शेवटचा आघात होण्याची वाटच बघतायत, असा प्रश्न पडतो. पोस्ट मॉडर्न फरनिचरचा सेट एकांकिकेतलं तिसरं पात्रच होतं जणू. एका प्रसंगात अंतरा आणि अनुराग घराची पुनर्रचना करत, “ Be with what is” असं ,जे. कृष्ण्मुर्तींचे वाक्य म्हणत पुन्हा त्यांच्या नात्याचं toxic वर्तुळ चालूच ठेवतात. समृद्धी घैसास, मंदार खोजे ह्यांनी साकारलेली अंतरा आणि अनुराग आणि आनंद घाणेकरांचे दिग्दर्शन एक अविस्मरणीय नाट्यअनुभव देऊन गेला.
एकांकिकांचे नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगमंच व्यवस्था, इंग्रजी Super titles,Publicity, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी एक खूप मोठी २५-३० जणांची यंत्रणा होती. २००२ पासून कार्यरत असणाऱ्या जुन्या CaLAAकारांबरोबर खूप नवीन, प्रतिभावान आणि संवेदनशील मंडळी जोडली गेली आहेत. नवीन प्रयोग करत राहणं, दर्जेदार कलाकृती सादार करण्याचा प्रयत्न करत राहणं, आणि नाट्य अविश्काराबरोबरच, नाट्यपरिवार पण वृद्धिंगत करत राहण्याचा CaLAA चा वारसा, असाच चालत राहो !
No comments:
Post a Comment