facebook

Wednesday, February 7, 2018

अंधाराची गुप्तता

गालावर तिच्या पापण्यांच्या सावल्या पाहत
मी अनेक तास घालवले आहेत,
झोपेत तिच्या ओठांवर खेळणारं निरागस स्मित
माझ्या मनाला शांत करून गेलंय....
छातीशी घेऊन थोपटत झोपवायचे,
तास लागला तरी वाटायचं
तिने इवलसं, लहानच राहावं कायम
पण आता ती कुशीत तरी कुठे मावते ?
लहानमुलांना दुस्वप्न कधी पडायला लागतात?
त्यांच्या बालपणातच कपाळावर काळजीच्या आठ्या उमटतात?
अज्ञाताची चाहूल लागून ती झोपेतही  
आईची मुठ घट्ट पकडून ठेवतात ?
माझ्या मनातले अनेक अक्राळ विक्राळ विचार
अंधाऱ्या भिंतीवर नाचत –मला जागं ठेवतात...
त्यांचाच नाद उद्या पोचेल का तिच्यापर्यंत?
भेदून टाकेल तिच्या सुरुक्षित विश्वाचे भास?
तिच्यासाठी प्रयत्न केला तरी
माझ्या डोक्यातली चक्र रूळ बदलणार नाहीत..
दिवसभर गोड गोड कितीही गाणी गायली तिच्याबरोबर
तरी अंधाराची भीती सरणार नाही....
उद्या थोडी समज आल्यावर तिला उमगेल
फक्त सूर्यप्रकाशातच लख्ख नाही दिसत गोष्टी,
काही अंधारात उमगतात.
मनाच्या भुयारी पाउलवाटांना उजेड दाखवायला ,सुयाप्रकाश नाही,
स्वतः मशाली पेटवायला लागतात.... !
मला सूत्र कळूनही धडपडतच राहिले आहे खूप काळ.
अनुभवांचा वारसा तिचाच आहे,
ती उपभोगेल सूर्याची उब, भेदेल अंधाराची गुप्तता  
पण तोपर्यंत , तिला हे उमगेपर्यंत....
तिच्या कपाळावर पहिली ती आठी उमटेपर्यंत,
मला ,गालावर तिच्या पापण्यांच्या सावल्या पाहत
अनेक तास घालवायचे आहेत.
झोपेत तिच्या ओठांवर खेळणारं निरागस स्मित
माझ्या मशाली पेटवायला सामर्थ्य देणार आहे...!




No comments:

Post a Comment