facebook

Wednesday, December 26, 2018

एक नवीन पिंपळकट्टा


पिंपळाची मोठी झाडं, पारंब्या, पार आणि पारावर भेटून गाव गप्पा हाकणारी मंडळी, मी कधी अनुभवली नाहीयेत, पण ह्या पाराची वेगवेगळी रूपं मी निश्चित अनुभवली आहेत. Facebook हे असंच मला एक नवीन प्रकारचा पिंपळकट्टा वाटतं. हवं तेव्हा मोबाईल उघडून कुणाच्या शेतात किती उस पिकला बघावं, कुणी तळ्याकाठी खरडलेल्या चार ओळी वाचाव्या, थोडीशी सरपंचाच्या कामाविषयी कुरकुर, कुणाच्या आजारपणाची, दहाव्या बद्दलची दबक्या आवाजात खंत व्यक्त करावी,कुणाच्या बारशाचे पेढे खावे, कोण कुणाशी भांडलं त्याचे कागाळे ऐकावेत,कुणाचा नवीन बैल तर कुणाचा नवीन ट्रॅक्टर; सगळ्यावरून दिवसातून पाच दहा वेळा नजर फिरवावी आणि मोबाईल परत बंद करून ठेऊन द्यावा.
राहत कुठेही असलो, कितीही शिकलो, व्यस्त झालो, ग्रासलो तरी प्रत्येकाला गरज असते असा एक पिंपळकट्टा असण्याची. कट्यावर भेटणाऱ्या त्याच त्याच लोकांचा चेहरा बघण्याची, त्यांच्या गप्पा ऐकण्याची, कधी थोडा सल्ला, कधी बोलणी खाण्याची, त्यांच्याबरोबर दात काढून खिदळण्याची. Facebook वर फ्रेंडलिस्ट मध्ये कितीही लोकं असली तरी तिथेही आपला एक मोजक्या, ठराविक लोकांचा कट्टा असतोच की, म्हणजे मोठ्यापारावरचा छोटा सबकट्टा. फरक इतकाच आहे की Facebook वरचा कट्टा, सोबतीची, जिव्हाळ्याची, मैत्रीची, गरज पुरवत असला किंवा पुरवल्याचा भास निर्माण करतो तो आंतरजालावरून, म्हणजे अंतरावरून. त्या खर्याखुर्या पिंपळाच्या पारावर, स्वतः चालत जायला लागायचं, कुणाच्या अंगात कुठलं इरकली कापड आहे, का खादीचा लेंगा त्याचा पोत अनुभवता यायचा, पाठीवर थापटी मारताना, केस ओढताना खरा स्पर्श जाणवता यायचा, प्रत्येक व्यक्तीच्या आवाजाचा बाज, स्वरातले चढ उतार कानात घुमायचे, चेहऱ्यावरच्या आठ्या, हास्यरेषा, भुवया उंचावणं,चेहऱ्यावर वाचता यायचं; किती भाग्यवान होती ती मंडळी ज्यांना हे रोज करता येत होतं...
रोज असं सामोरासमोर भेटणं, खरा सहवास अनुभवणं, पार जमवणं, हे त्याच गावात राहणाऱ्या लोकांना सुद्धा आज शक्य नाही, तर मग वेस ओलांडून, नदीपार, समुद्रापार अगदी सातासमुद्रापार गेलेल्यांना कसं शक्य होईल? पण Facebook वर वेळ, स्थळाची काही बंधनं नसल्यामुळे, जर इंद्रियांचा थोडा त्याग केला तर, सोबतीची, मैत्रीची, जिव्हाळ्याची नाळ जोडून ठेवणं अगदी सहज शक्य झालंय.
मी अजिबातच Facebook ची खूप मोठी उपभोगता नाहीये. मी काहीवेळा महिनोंमहिने सन्यास घेते ह्या कट्ट्यावरून. पण परत येणं तितकंच सोपं असतं.गेल्या काही वर्षात मी न भेटलेल्या, न पाहिलेल्या, भेटून इतकी वर्ष झाली आहेत की भेटलो तर ओळखणार नाही, इतक्या लांबच्या माणसांनी, वेळोवेळी मला आपलसं केलं आहे; माझ्या चेहऱ्यावर मला अपेक्षित नसताना हसू आणलय, मला मैत्रीण करार देऊन खरडलंय, आपुलकीने, काळजीपोटी धमकावलय, प्रोत्साहन दिलंय. ह्या सगळ्या व्यक्तींना मी फक्त Facebook मुळेच आणि Facebook वरच भेटते. फार कमी लोकांना मी प्रत्येक्ष भेटले आहे. मला वाटतं माझ्यासारखंच आता बऱ्याच जणांचं विश्व हे त्रिमितीय झालं आहे, वास्तवातलं, जिथे सगळी इंद्रिये अनुभवता येतात, मनातलं, जिथे कसलीच बंधनं नसतात आणि अंतरजालावरच, जिथे Facebook सारखे अनेक पिंपळकट्टे जमू शकतात. ह्या तीनही विश्वांची सांगड घालून, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सांभाळून, मोक्षाच्या वाटेवर चालत राहणं ही खरी कसोटी आहे. पण कसोटी नसेल तर जगण्याचं स्फुरण येणार कुठून? त्यामुळे हिथं, तिथं, जिथेभी पिंपळकट्टा मांडून मनातल्या चार गुजगोष्टी करता येतायत अशा सगळ्या मंचांना, spacesना वंदन करायचं आणि व्यक्त होऊन जायचं.    





2 comments:

  1. Wa...amazing लिहिले आहे... Facebook,whatsapp ला नावे ठेवणारा एक गट अस्तित्वात आहे. त्यांना, त्यांच्या पिंपळ कट्ट्या ची नव्याने आठवण आणि नवे स्वरूप दाखविले.. ..त्यांच्याही आठवणी ताज्या आणि नव्या पिढीची तोच गंध नव्या पद्धतीने घेण्याची रीत या दोन्हीचा सुरेख संगम.....माणसांच्या संगतीत मन रमते.. ती हक्काची माणसे भेटण्याची ठिकाणे बदलली. असे बदल स्वीकारार्ह असावेत

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete