facebook

Monday, December 31, 2018

अत्तर



सप्टेंबर २०१८ ला पुण्याहून बेर्कलीला परत येत असताना, इथल्या मित्रमैत्रिणींसाठी काय घेऊन यावं ह्या विचारात होते. सामानात प्रचंड भर न घालता देशातलं काहीतरी आणायचं होतं. "देशात चाललो आहे " हे पण इथून -भारतात जाताना म्हणायला  आवडणारे, ठेवणीतले शब्द. अमेरिकेतली आमची ओळख भारतीय वंशाचे अशीच आहे, इथे मी पुण्याची का नागपूरची का आळंदीची ह्या तपशीलाशी इतर भारतीयांना फरक पडतो, कुठल्याही अमेरिकन व्यक्तीने तो प्रश्न विचारला, नकाशावर त्याची भौतिक जागा त्याच्या लक्षात आली तरी त्याच्या लेखी ह्या मुद्द्याला फार महत्व नसतं.  ज्या भारतीय वंशाचे म्हणून आपण ओळखले जातो त्या " देशात जातोय" म्हटलं की फक्त पुण्या-मुंबईत जाणार असलो तरी Indian Ocean च्या " देस मेरा रंगरेजी बाबू, घाट घाट यहां घटता जादू.." ची भव्यता, भारताच्या  प्रचंड मोठ्या ethosची उब मनाला, शरीराला वेढते...त्यामुळे अशा भारतातून परत अमेरिकेत येत असताना,स्वतःच्या बॅॅगेत काय भरू आणि काय ठेऊन जाऊ? असं होत असताना गिफ्ट्स काय नेऊ ह्याबद्दल मी नेहमीच खूप विचार करते.
मी पुण्यात पोचायच्या आधी काही महिने बाबा त्यांच्या कामासाठी लखनऊला गेले होते. त्यांनी माझ्यासाठी खुद्द चिकनवर्क करणाऱ्या कारागीरांच्या गल्लीत जाऊन लखनवी कापडं आणली होती आणि अत्तर.... इत्तर.... ती दीड इंचाची बाटली हातात पडल्यावर अर्थातच थोडी कानामागे, थोडी नाडीवर त्या अत्तराची जादू फिरली. नाकात तो सुगंध भरल्यावर मला उगाच वाटलं ठोके थोडे स्थिरावले, आईच्या मिठीत, जुन्या दुलईत, आपल्याच मुलांच्या दुपट्यात जो एक ओळखीचा वास असतो, तसाच मला ओळखीचा वाटला तो अत्तारात्ला सुगंध. भेट द्यायला अत्तर घेऊन जायचं म्हणूनच मी ठरवलं.
बाजीरावरोडवरच्या सुगंधीवाल्यांकडे गेले. केवडा, मोगरा, रातराणी, चाफा, बकुळ, अनामिका( नवीनच होतं ते अत्तर ), चक्क मिट्टी नावाचं अत्तर मिळालं! अडीच तीन हजाराची खरेदी झाल्यावर त्यांनी मला विचारलं," तुम्ही बाहेर असता न ? कुठे नेणार आमची अत्तरं?".
 " तुम्ही कसं ओळखलत?"
" अत्तरं फक्त पूजेसाठी न्यायला येतात लोकं. नाहीतर आता सगळ्यांनाच बाटलीतला perfume हवा असतो.. एवढी अत्तरं वगैरे बाहेरचेच घेऊन जातात." ( मी आता बाहेरची झाले होते हे ओळखण इतकं सोपं झालं होतं तर !)
मी हसून पैसे दिले पण मनात इतके सुवास आणि आठवणी तरळल्या. देव्हार्यातलं  किंवा अत्तरदाणीतल्या अत्तरापेक्षा, माझ्या अत्ताराबद्दलच्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. \
बाबांचे वडील, त्यांना आम्ही नाना म्हण्यचो. माझ्या लहानपणी मला घेऊन नाना सुगंधीवाल्याकडे घेऊन गेल्याचं आठवतंय. वेगवेगळी अत्तरं हाताच्या मागे लाऊन त्याचा सुवास तपासल्याचंं आठवतंय. दोन सुवासांमध्ये फरक नीट करता यावा म्हणून तिथे कॉफ्फी बीन्स किंवा तत्सम गोष्टी नसत. हातावर कितीही वेगवेगळी अत्तरं लावली असली तरी नाना त्यात फरक करत आणि एखाद दुसरी छोटी बाटली घेऊन आम्ही घरी परतत. नानांच्या खजिन्यात सहा काचेच्या, अत्यंत नाजूक कोरलेल्या, लांबूळक्या बाटल्या होत्या, पर्शीअन का कुठल्या वेगळ्याच देशातून आलेल्या . त्या बाटल्यांना अत्तरदाण्या पण म्हणता येयील खरंतर....त्या हिरव्या रंगाच्या मखमली कापडात गुंडाळून, एका लाकडी पेटीत ठेवलेल्या असत. त्या अत्तरदाण्या फक्त शोभेसाठी होत्या, असं मला वाटत. नानांनी कधी त्यामध्ये अत्तर भरलेलं मला आठवत नाही, आणि आम्हाला त्या कधीतरीच शोभेच्या वस्तूंसारख्या बघायला मिळत, हात बीत लावता येणं तर खूप लांबची गोष्ट होती. अर्थातच त्या बद्दल प्रचंड आकर्षण होतं. नाना गेल्यावर त्यांच्या अनेक गोष्टींमध्ये ती लाकडी पेटी आणि त्या अत्तरदाण्या सापडल्या; त्या प्रत्येकात एक सुवास दरवळत होता, अनोळखी, खूप पूर्वी कधीतरी त्यात अत्तरं नांदली असणार....
इथल्या  मित्रमैत्रिणींसाठी ती अत्तरं आणल्यावर त्यांना ती essential oils इतकी प्रखर वासाची वाटली; ती dilute करणं सोपं आहे हे पण कळलं, थोडं distilled water आणि alcohol घातलं की म्हणे छान करता येतात त्याची perfumes. ती अत्तरं मी दिली म्हणून ती स्वीकारून ती कपाटात कुठेतरी धूळ खात पडली नाहीत. त्यांना ह्या देशातलं त्यांचं एक सोम्य रूप धारण केलं.
वेगवेगळ्या माणसांमध्ये, अनुभवात, आठवणीत , शब्दात अशी अनेक अत्तरं दरवळत असतात. ती अत्तरं प्रत्येकाच्या कुपीतून थोडी थोडी बाहेर शिंंपडली गेली तर त्याचा सुवास खूप दरवळतो. त्या अत्तराचं नांदणंं, अनेकांच्या स्मृतीत राहतं, फक्त त्या अत्तरदाणीच्या नाही ! पंधरवड्यात माझ्या  मित्रमैत्रिणींचे व्यक्त होणं हे असंच अत्तर दरवळण्यासारखं आहे असं मला वाटतं... ह्यापेक्षा सुवासिक वर्षाचा शेवट आणखीन काय असू शकतो? Goodbye 2018! आणि सुवासिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा !


No comments:

Post a Comment