facebook

Saturday, December 30, 2017

Party

https://youtu.be/R-Sk7fQGIjE ( link to the shortfilm Juice directed byNeeraj Ghaywaan and starring Shefali Shah)
Juice हा लघु  चित्रपट पाहिला. खूप भावलंय त्यातलं काहीतरी. मी तुमच्या बरोबर त्याची लिंक share करतेच आहे . त्यात घडणारे प्रसंग थोड्या फार प्रमाणात आपण सगळ्यांनी पाहिलेले अनुभवलेले आहेत. उकाड्यात स्वैपाक करणाऱ्या बायका आणि पाय पसरून ,कूलर च्या हवेत वायफळ चर्चा करणारे पुरुष इतकं black and white चित्र प्रत्येक घरात नसेल कदाचित ..निदान नसावं असं वाटतं ..पण मग स्वतःच्या काही कल्पना, पूर्वग्रह  मी पुन्हा तपासते आणि वाटतं की हे स्त्री पुरुष conditioning कुठे तरी बदलायला हवं.  मी जे लहानपणापासून घरी ,नातेवाईक, मित्र मैत्रिणींकडे बघत ,अनुभवत आले त्यातून मी शिकले . थोड conditioning माझ्या आतलं, मला पण बदलायला हवं. नवीन वर्षात मी कांहीतरी बदल करणार आहे ! 
 मला अगदी लहानपणापासून स्वैपाक करायला आवडतो.लोकांना घरी जेवायला बोलवायला आवडतं. नीट विचार केल्यावर वाटतं की मला लोकांबरोबर, त्या एकत्र येण्याचा, गप्पांचा, मैफिलीचा आस्वाद घ्यायला आवडतो.
त्यामुळे सध्यापुरते केलेले दोन साधे सोपे बदल -
घरात पार्टी आयोजित करायची म्हणजे :
 1. स्वतःच सगळा स्वैपाक केला तरच खरी मज्जा, खरं अगत्य - हे पूर्णतः चुकीचं आहे ! आपणच बोलावलेल्या मित्र मैत्रिणी, नातलग , आपली- परकी, कुणीही माणसं ,आपल्याघरी आपल्याशी बोलायला, संवाद साधायला उत्सुक असतात हे पण लक्षात ठेवणं महत्वाचं !कित्येकदा, घरातली स्त्री फक्त स्वैपाक करून तो वाढण्यात आणि आवरण्यात घालवते. तिच्या मनातलं तिच्याकडेच राहून जातं.
दहा वर्षांनी, तिच्या हातची चव लोकांना आठवेल. "वा !काय पुरणपोळी होती!" म्हटल्यावर त्याची पाक कृती आठवेल.पण त्या दिवशी स्वैपाक करताना तिच्या मनात रंगलेला सिनेमा ती न बोलता, इतर कुणी सोडा, तिच्यातरी लक्षात राहील का ?

2. वर्षातून अगदी खास , एक दोन पार्ट्या पाककला कौशल्य सिद्ध करण्याकरता कराव्या ! ( खास मित्र, भावंडं) ह्यामध्ये आलेल्या स्त्री आणि पुरुषांनी स्वैपाकाच्या तयारी पासून मदत करावी. Wine आणि cheese किंवा चहा चिवडा ,भडंग, खारे दाणे, आवडीचे 30  खात , गप्पा मारत sous chefकडून तयारी करून घेऊन, स्वतः ,स्वतःच्या घरात Master chef बनावं. हे असलं pampering फार क्वचित आपल्याला अनुभवता येईल. पण अशा स्वैपाकात किती छान आठवणी बांधता येतील? शिवाय  इतरांकडे sous chef बनून  त्यांच्या ठेवणीतल्या पाक कृती शिकता येतील !

नवीन वर्षाच्या पार्ट्या काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत काही ठिकाणी तयारी चालू आहे - सगळ्यांनी भरपूर मजा करा! स्वतः आयोजित केलेल्या मैफिलीचा पुरेपूर आस्वाद घ्या ! आणि conditioning  बद्दल सुचलेले, केलेले बदल share करावेसे वाटले तर नक्की करा ! Juice नक्की पहा!

Friday, December 29, 2017

आज शब्द काही पुटपुटले....


आज शब्द काही कानात माझ्या पुटपुटले,   
हात थरथरले, बोटं थांबली.
डोक्यात चक्र घुमत राहिली.
राग,शब्द,सुर,स्वप्न , गंध, दृश्य 
तरल, ठळक, अस्पष्ट मृगजळं;
अतृप्त,अस्पृश्य, अदृश्य,  होऊन गेली..
शब्द कानात पुटपुटले..
कोल्हालात घंटा दुमदुमली.
थांब. स्वस्थ.
शोध वटवृक्ष.
अंबर, धरणी, सागर;
कोठेही..
छाया परी नाही उतरली अंतरी 
तर गिरवशील काय? 
थांब.स्वस्थ.
नीज थोडी.
निद्रेत आहे जाग येणं, 
शोधात आहे सापडणं,
मोहात आहे भुरळणं,
अंतरात आहे ब्रम्हांड.
तुझ्यातच नाही, सर्वत्र.
पण तुझ्याकडे तू आहेस.
थांब, स्वस्थ.
वटवृक्ष गवसला पण तू हरवलीस तर?
शब्द गुंफून नाचले, 
पण पान कोरेच राहिले.
मी थांबले. स्वस्थ.


Thursday, December 28, 2017

वाडा



    Photo credit : Sonalee Hardikar

कुठल्याही सिनेमात ,"पुश्तानी मकान /कोठी /हवेली.." वगैरेचे उल्लेख ऐकले की मला आणि निकीतला चुकल्या चुकल्या सारखं होतं. आम्ही दोघांनी हे ,पिढीजात  वास्तूत रहायचं , वावरायचं  'धन', आपआपल्या आजोळी अनुभवलं आहे आणि आमच्या डोळ्यासमोर ते लुप्त होऊन गेलेलं पण पाहिलं आहे.
आई , तिची तिन्ही भावंडं ज्या वाड्यात लहानाची मोठी झाली आता त्या वाड्यात त्यांच्यापैकी  कुणीच राहत नाही. ह्या भावंडांनी पानशेतचा १९६१ सालचा पूर अनुभवला आहे. त्या पुरात वाड्याचा  सोपा ,मागचे अंगण,  आणि काही भाग वाहून गेला. आई सगळ्यात मोठी आहे, ती तेव्हा फक्त १० वर्षाची होती. ह्या वाहून जाण्याआधीच्या वाड्याबद्दलच्या,  तिच्या काही आठवणी आहेत.भावंडानशी निगडीत, तिला "चिम्या' म्हणणाऱ्या तिच्या आजोबांविषयीच्या, पोपट-पेरूच्या बागा, पेरू  खाल्ल्याच्या, भजनी मंडळ, मारुतीला येणारी लोकं , वारकरी, गच्चीतून दिसणारा शनिवारवाडा. तिच्या आठवणीतून तिने तो ,तिच्यासामोरून वाहून गेलेला काळ, जपून ठेवलाय. कधीतरी दुसऱ्याच कशामुळे  तरी तिला आठवण होते आणि मग ती चार पाच वाक्य बोलून दाखवते. एवढंच काय ते मला त्या पुरापूर्वीच्या वाड्याबद्दल माहिती आहे.
माझा जन्म पण वाड्यातच झाला. पण आमचं घर म्हणजे, वाड्यात वसलेली एक चाळ , त्यातलं एक बिर्हाड. आई बाबा कधी कधी त्याला ट्रेन चा डब्बा म्हणत. एका भिंतीला डोकं लावलं की समोरच्या भिंतीला पाय पोचत. म्हणजे सहा फुटी माणसांचे नाहीत, साडे पाच, फार फार तर पाच फूट सात इंची माणसाचे पाय पोचतिल, एवढ्या अरुंद तीन खोल्या, आणि स्वैपाकघर त्याच्यापेक्षा थोडंसच मोठं. स्वैपाकघराला लागुनच मोरी होती, घराबाहेर दोन फरलांगावर toilets. आणि ह्या अरुंद खोल्यांमध्ये आम्ही तीन भावंडं, आई वडील, आजी आजोबा आणि आले -गेलेले नातेवाईक सुखाने नांदत होतो. मी ह्या घरात वयाच्या सहाव्या - सातव्या  वर्षापर्यंतच राहिले, नंतर दहा -बारा वर्षाची होईपर्यंत येऊन खेळत राहिले. पण मला त्या अरुंद वगैरे खोल्या आठवत नाहीत. मला हुंदडल्याच्या, गोट्या -भिंगर्यांसाठी भांडल्याच्या, अंधार होऊन दिसत नाही तोपर्यंत लगोरी, डबा ऐस पैस, लपाछपी खेळल्याच्या गोष्टी आठवतात. 
वाड्यातल्या प्रत्येक घरात स्वैपाक करणाऱ्या काकुचं एक वैशिष्ट्य होतं. आम्ही सगळी मुलं एकत्र खेळत असल्यामुळे ते प्रत्येकाला चाख्याला मिळत. कुणाच्या घरी जास्त किंवा कुणाच्या घरी कमी. लसणाची झमझमित फोडणी मला खूप आवडे. मी स्वतः कांदा लसूण मसाला वापरायला लागेपर्यंत मला माझ्या आठवणीतली ती फोडणी कशी करत असतील ह्याची फार उत्सुकता होती. कारण आमच्याघरी असा वास कधीच येत नसे.  आईच्या फोडण्या खमंग असत, लगेच जेवायला बसावसं वाटे, पण ते पानात न पडणाऱ्या , तरीही घमघमणारया वासाने,कधी कधी तोंडाला पाणी सुटे. ते वाड्यातले वेगवेगळ्या फोडण्यांंचे वास, आवाज, मला अजूनही आठवतात. तो वाडा आता नाही- तिथे आता एक building उभी आहे. बिल्डरचे काहीतरी वाद झाल्यामुळे त्याचं बांधकाम अनेक वर्ष अपूर्णच आहे. त्या घराचे छोटे छोटे कवडसे, जुन्या black and white फोटो मध्ये दिसतात, बाकी ते सगळं भावनाविश्व फक्त आठवणींमध्ये आणि वेळोवेळी व्यक्त होणाऱ्या शब्दांमध्ये. मधूनच आठवणाऱ्या विद्याधर, वीणा, आरती, राणी , अमित, संजा, ह्या नावांमध्ये आठवणी आहेत.
ह्या आमच्या चाळ वजा वाड्यातून आईच्या माहेरी , म्हणजे 'चारशे पंचाहत्तर' ला गेलं के तिथेही माझं उड्या मारणं -पळणं सुरु व्हायचं. अण्णांना , आईच्या बाबांना ते आवडत नसे, "दाण दाण पाय आपटलेस की खाली बिऱ्हाडांच्या डोक्यावर पडेल माती. वर आले तर काय सांगू ? कोण नाचतंय म्हणून ?" असं मला विचारायचे. माझ्या दादाला पोहायला शिकवणारे , बहिणीला चित्रकलेचा वारसा देणारे हे माझे आजोबा,  मला मात्र ,'wild child' म्हणत . मग ते असे ओरडले, की मी  गच्चीत जाऊन बसे. गच्चीत नेहमीच जुईच्या किंवा मोगर्याच्या फुलांचा दरवळ असे !गच्ची मधून 'top view'  बघायला मिळणं, माझ्यासाठीच नाही, सगळ्या भावंडांसाठी पर्वणीच असायची. समोर एक मोठं निवासी हॉटेल होतं , शेजारी उडपी हॉटेल होतं, मंदिराशेजारी बसलेला नारळ वाला , त्याच्याकडे विकत घ्यायला येणारी लोकं, सुट्ट्यापैश्यांसाठी चालणारी बाचाबाची , बस stop ला उतरणारी लोकं - आम्ही तासान तास लोक दर्शन करत बसायचो.
गच्चीला फक्त कडे नव्हते तर एका बाजूला बसायला,एक छान , दगडी पण नक्षीदार , प्लास्टर च coating असलेला बाक होता. बाकाला मागे टेकायला असलेली पाठ इतर कट्ट्यानपेक्षा मोठी होती.त्या  भिंती पलीकडचं बघायला बाकावर चढून बसायला लागे. कधी कधी मोठ्यांच्या नजर चुकवून गच्चीतून खाली रस्ता नक्की किती 'खोल' आहे हे बघायला आम्ही वरून छोटे खडे टाकून बघत असू. ह्या बाकाच्या भिंतीच्या टोकावर एक वातकुकुट( weather vane) लावलेलं होतं. ते काही मला वाचता यायचं नाही की कळायचं नाही , पण त्याच्याकडे बघत बसायला मला खूप आवडायचं. ते वातकुकुट अजून शाबूत आहे, पण गच्चीत जाणारी वाट खचली आहे, पूर्वीचा बाक अजून आहे, पण आता तिथपर्यंत पोचता येत नाही. ह्या वाड्याचे फोटो नाहीत, पण त्या आतल्या आमच्या साठी 'आजोळ ' असणाऱ्या मामा मामीच्या घराचे खूप फोटो आहेत. आईच्या बालपणात वाहून गेलेलं घर , माझ्या बालपणातलं जुईच्या फुलांचं  आता खचलेलं घर, ह्यापेक्षा वेगळं ,हसरं खेळतं घर, छान फोटोबद्ध आहे हे काय कमी आहे? 
निकीतच्या आजोळी, म्हणजे निप्पाणीला खूप मोठा वाडा होता. एका चौकात सुरु होऊन दुसऱ्या चौकात संपणारा ! चौकभर लांब. माझ्या, त्या वाड्याबद्दल काहीच आठवणी नाहीत - त्या संपतीत मी भागीदार नाही, कारण आम्ही भेटायच्या आधीच तो पडला होता. पण निकीतच्याच आठवणी इतक्या देखण्या आहेत की चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. निप्पाणीला , सगळीच नातवंडं त्यांच्या आजोबांना ,'Daddy'म्हणत आणि आज्जीला 'मोठी आई'. निप्पाणी भागात सगळी तंम्बाखुची शेती होती पण ती प्रथा मोडून द्राक्षाची शेती करणारे आणि गांधीवादी विचारसरणीचे म्हणून Daddyनचे नाव खूप अदबीने घेतले जात. म्हणजे एकूणच गावात फिरताना नातवंडांची collar ताठ आणि चंगळ असायची. दुकानातून काहीही जिन्नस घेऊन,"मेहतांचा नातू / नात " सांगितलं तर घेतलेल्या खाऊ मध्ये भर पडायची. केस खूप वाढलेले आहेत असं daddy ना वाटलं तर घरी न्हावी येई, सगळ्या मुलांना चौकात बसवून , एका मागोमाग केस कापून जाई.  कपडे, काजू मेव्याचे पण तेच असायचं . वाड्यावर येऊन काम करणारी ही मंडळी, वाड्यातल्या कुटुंबाचा भाग बनून नातवंडांचे अगत्य करत. सगळ्या नातवंडांना मोठी आई आणि daddy ह्यांच्या बेडरूमबद्दल खूप कौतुक होतं. ज्या काळी master bedroom वगैरे कल्पनाही फारशा प्रचलित नव्हत्या, तेव्हा स्वतः लक्ष घालून daddy नी तशी वाड्यात बांधून घेतली होती. त्याला एक छोटीशी बाल्कनी होती , ज्या मध्ये छान फुलझाडं फुललेली असत. ह्या वाड्याचे खूप फोटो नाहीत पण नऊ नातवंडांच्या मनात त्याची उरलेली वेग वेगळी रूपं , निश्चितच आहेत!

हा असा आमच्या मनातला 'वाडा' घेऊन आम्ही सगळे एकदा, एका 'पर्यटनासाठी' बांधलेल्या वाड्यात गेलो. प्रवेश दाराबाहेर बांधलेलं मंदिर पाहून आई नाराज झाली पण तिला मी ओढत आत घेऊन गेले.  मोकळा चौसोपी चौक पाहिल्यावर तिचा चेहरा खुलला ! ताई आणि कबीर सोडून तिचं सगळं कुटुंब तिच्या समोर , जणू तिच्या लहानपणच्या वाड्यात उभं होतं. फुगडी घालताना, नातवंडाच्यामागे उंच पायऱ्या चढताना -उतरताना तिचे गुडघे दुखले नाहीत. तिच्या कल्पनेत हरवलेलं एक जग जणू तिला तिच्या समोर अवतरलं! नव्वारी साडी, नथ, दागिने घालून तयार होऊन तिने आम्हाला सगळ्यांना तयार व्हायला लावलं ! सगळ्यात आधी फोटो काढून घेतले! आता डोळे बंद न करता, डोळसपणे ती ह्या स्वप्नवत क्षणांचे वारंवार अनुभव जगू शकते..
तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की जवळ जवळ सगळं बालपण, संसाराची पहिली १५ -१६ वर्ष , माझ्या बाबांची ज्या वाड्यात गेली , त्या वाड्याबद्दल मी त्यांच्याशी कधीच बोललेले नाही. म्हणजे व्यावहारिक संभाषण नाही , पण त्यांना त्या जागे विषयी काय वाटतं वगैरे. मी त्यांना विचारलेलं नाही आणि त्यांनी ते आई सारखं कुठल्या वेगळ्याच कारणाने बोलून दाखवलेलं नाही. त्यांचा वाडा -फक्त त्यांच्याच मनात आहे!
.माझ्या आठवणीतले आवाज , वास ह्या वाड्यात काहीच नव्हतं. हा वाडा खूप रेखीव आखीव होता. माझ्या आठवणीतल्या वाड्याला कायमच एक धारदार किनार होती, किंवा ती किनार मी त्याला दिली होती...आमच्या बालपणीच्या कथा पुढे वारसाने देताना, एकतर आम्ही पण शब्द फुलवून, आठवणी सक्षम ठेवल्या पाहिजेत नाहीतर शब्द गिरवून त्या आठवणी जिवंत ठेवल्या  पाहिजेत . कारण आम्ही निदान थोडं तरी 'वाडा' हे प्रकरण उपभोगलं आहे , आमच्या पिल्लांच्या ते दृष्टीस पडेल फक्त, museum मध्ये ठेवलेल्या वस्तूंसारखं. पण खूप प्रयत्न केले तरी शब्दातून वास आणि आवाज transcend होतील का ? 






Wednesday, December 27, 2017

पोचा



Marriage counselor समोर दोघंही, शाळेतल्या काचा फोडताना सापडलेल्या दोन मुलांसारखे बसले होते. मुलांचे पालक आले , भुर्दंड भरला,तरी फुटलेली  काच पुन्हा न तडकलेली,  न भंगलेली, पूर्वीची  अखंड काच कधीच होणार नव्हती. तिच्या जागी नवीनच काच बसवावी लागणार होती. फक्त, Counselor समोर बसलेल्या  त्या दोघांनी फोडलेली काच ; ती मात्र पुढे काहीही झालं, तरी मनावर तडकलेली चिन्ह राहणारच होती.
" अंजली  - Its your turn. Where did the dissent begin?"
" मला कळत नाहीये आपण ह्याच्यावर का वेळ घालवतोय? We just want a few pointers to improve our communication.." मंदार जरा चिडचिड्या स्वरातच उत्तरला.
" असं तुला वाटतंय मंदार. मला गरज वाटते आहे मुळापाशी पोचण्याची.."
मंदारच्या चेहऱ्यावर उमटलेली तुच्छता, अंजलीला डिवचून गेली. एकदम उसळत ती Dr.Namdeo ना म्हणाली, " बघितलत तुम्ही? त्याचा चेहरा कसा होतो ते.."
"तुझा चेहरा काय कोरा करकरीत असतो असं वाटतं का तुला ?"  मंदार ने प्रश्नाचं उत्तर आणखीन प्रश्न विचारून दिलं ."दहावीत आहोत का आपण अंजली? तू माझ्याकडे असं का पाहिलंस?तेव्हा का नाही पाहिलंस, म्हणून भांडत बसायला? हा सगळा पोरखेळ आहे.. छोट्या छोट्या कारणांवरून तू अशी उसळतेस, मुलं घाबरतात हल्ली.."
मंदारचे बोलणं ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी तरळलं. " म्हणजे सगळी चूक माझीच आहे. तू वागतोस ,बोलतोस त्यामुळे मी दुखावली जाते आणि अशी वागते, ही शक्यतासुद्धा तुझ्या मनात येत नाही."
मंदारने  काहीतरी पुटपुटत मान फिरवली.
ह्या अस्वस्थ शांततेत Dr. Namdeo घुम्यासारखे त्या दोघांकडे बघत बसले. त्यांच्या निर्विकार चेहऱ्याचा, मंदार ला अजून राग आला.
" तुम्ही सांगणार नाहीआत  का तिला ? How long are you just going to sit and observe? झाले आता तीन session.."
" मी कुणा एकाची बाजू घेणार नाहीये, कारण मला अजून पुरेसं काही कळलेलंच नाहीये. Anjali why don't you start?" Dr.Namdeo शांतपणे म्हणाले.
" चार वर्षांपूर्वी मी पुण्यातून माझ्या घरून चार स्टील ची भांडी आणली .."
" I cant believe we are paying him money to listen to this lame story.." मंदार लगेच उद्गारला.
" मला बोलायचंय आणि मी मला वाटतं ते त्यांना सांगणार आहे. ते Lame आहे का नाही हे मी, माझ्यासाठी, किंवा ते ऐकून ते ठरवतील; तू आला आहेस तर तुला ऐकावं लागेल. you will get your chance." आवाजात उसनी धार आणून अंजली मंदारला म्हणाली.
मंदार किंवा Dr. Namdeo ची प्रतिक्रियेची वाट न पाहता, अंजली बांध फुटल्यासारखी बोलायला लागली. "
मी पुण्याहून चार स्टीलची भांडी आणली. ती विशेष आकर्षक, जुन्या पद्धतीची, जाड स्टील, भावनिक गुंतवणूक असणारी, पिढीजात परंपरेने चालत आलेली वगैरे काहीही कारण नव्हतं. मला ,स्वैपाकाला स्टीलच्या भांड्यांची गरज होती, मला ती सहज उपलब्ध झाली आणि मी ती इथे आणली. ती Bag मधून काढून स्वैपाक घरात ठेवल्यापासून, मंदारला ती खुपत होती. का आणलीस? इथे ह्यापेक्षा सुरेख, चांगली कुठेही मिळू शकतात, आपण हे काढून टाकू असं एकदा बोलणं झालं. त्याच वेळेला त्याच्या मनात काही पूर्वगृह आहेत का? काही वाईट आठवणी आहेत का? मी सगळं विचारलं. मला भारताची आठवण येते असं मंदार म्हणाला. एरवी, अनेक आठवणी जिवंत रहाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करतो म्हणून मी ह्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. पण मग हे पाच सहा वेळेला झालं. मग एकदा तो म्हणाला मला ही स्वैपाकघरात पाहून त्रासच होतो, ती काढून टाकू आपण."

" They were extremely ugly, an eyesore. I hated them. But that was not important for you, was it?"

" ती भांडी काढून टाकू म्हणून भांडण झाल्यावर, मी त्याला म्हटलं , की तुला आवडत नाहीत हे तू नमूद केलं आहेस. एकदा नाही अनेक वेळेला. मला ती स्वैपाक घरात वापरायची आहेत, स्वैपाक मी करते. तू हे जे वारंवार Insist करतोस ते मला आवडत नाही. हे तू नेहमी करतोस. माझा एखादा कपडा आवडला नाही तर तू एकदा सांगून थांबत नाहीस, जोपर्यंत, तो मी वापरणं पूर्णतः बंद करत नाही तोपर्यंत, तू ,तो कपडा तुला आवडलेला नाही हे सांगतच राहतोस.

"  I have the right to express my opinion. I don't like it, I am going to say it a hundred times it is not going to change."

" म्हणजे मी बदलायचं असतं न मग ? ह्या प्रक्रियेला, म्हणजे तू तुझं मत नमूद करून , वारंवार ते सांगत राहणं ह्याला  scientific भाषेत किंवा rational भाषेत काय म्हणतात मला माहित नाही .पण मला ते claustrophobic वाटतं , असं सांगूनही मंदार त्याचं मत बदलत नाही."

" बरोबर आहे - पण मग तू भांडी , त्यात उकळणाऱ्या soup आणि इतर स्वैपाकासकट खोलीच्या दुसर्या कोपर्यात भिरकावून दिलीस ते? ते कुणामुळे? का त्यालाही माझाच insistence जबाबदार आहे?"

" Insist, insist करून डोकं फिरवून टाकलस , उद्वेग होता तो माझा.त्या भांड्यांना पोचा पडला म्हणून नाही दिली मी ती टाकून...तुझ्या insistence मुळेच दिली .."

" And we bought brand new ones ! Enamel coated, cobalt Blue to match the .."

" And I hated them...का माहिती आहे ? मला माझ्या स्वैपाकघरात काहीतरी सामान्य, ordinary हवं होतं. माझ्यासारखं ...सततचं ते रेखीव , देखणं aesthetically pleasing- म्हणजे परत स्वैपाकघर सगळं चकाचक, देखणं ठेवण्याचं pressure माझ्यावरच..cooking show मधली किचन आहे का आपलं ?"

" म्हणून तू enamel वर Scotchbrite वापरलस?..."

" मी नाही - पोरांनी खेळताना वापरलं .."

मंदार आणि अंजली नंतरही बरच बोलत राहिली..
Dr. Namdeo ऐकत राहिले. भांड्यांना पोचा पडला होता चार वर्षापूर्वी ,नात्याला तर तो आधीच पडला होता.पण हे त्या दोघांना स्वतःहून कधी उमगेल ?  उमगल्यावर, त्यांचं हे विध्वंसक वर्तुळ बंद पडेल, का
एकमेकांची इतकी वर्ष सवय झाली म्हणून, ते एकमेकांच्या passive-aggressive स्वभावाची गोडी चाखत अजून पोचे सोसत राहतील? त्यांच्या मुलांसाठी पोटात तुटलं पण Dr. Namdeo ऐकत राहिले... मंदार आणि अंजली त्या परतीची वाट नसलेल्या गुहेत हरवून गेले...







Sunday, December 24, 2017

बाबा बरोबरची भातुकली


कधीतरी ,सकाळी उठल्या उठल्या वाटतं न, की आज काही, काही करू नये, कुणीही बोलू नये, शांत चहा प्या ..तेवढ्यात आईच्या कानात ," fruit loops , fruit loops" असं म्हणून एक छोटं माणूस ओरड्तं. मग लक्षात येतं की त्या छोट्या माणसाच्या चूळबुळ करण्यामुळेच आपल्याला जाग आली आहे. ते छान, काहीही न करण्याचं स्वप्न विसरायलाच लागतं मग. वाटीत fruit loops देऊन चहा ठेवेपर्यंत, शेवयांचा उपमा खायची फ़र्माईश झालेली असते. तो पानात वाढल्यावर, नाक मुरडून , "दाणे ?" असं विचारण्यात येतं, अर्थातच घरातले दाणे संपलेले असतात.Play dough ची झाकणं उघडी राहिल्यामुळे तो वाळून गेलेला असतो, त्यामुळे रडू यायला लागतं..डोळे पुसायला तेव्हा बाबाच हवा असतो.त्याची झोप झालेली नसली तरी तो डोळे पुसायला उठतो. मग त्याने ," वा ! क्या बात है " म्हणत उपमा खालला कि," मला शेवया खूप आवडतात " असं लडिवाळपणे त्याला सांगत, स्वतः खायला सुरुवात होते..मग बाबा आवरून office ला जातो . पुढे सगळा दिवस कंटाळवाणा, किरकिर करत रेंगाळत राहतो. संध्याकाळी ६ वाजता बाबा दार उघडून घरी आला, की दोघीही त्याच्याकडे धावतात. छोटं माणूस जणू नुकतच तुरुंगातून सुटून आल्यासारखं , बाबाच्या अंगावर माकडासारखं चढून बसतं. बाबाकडे पाहून चेहऱ्यावर खास ठेवणीतलं हास्य असतं - फक्त बाबासाठी ओठांवर आणलेलं. आईला थोडा रागच येतो, ती  पर्स, किल्ली घेऊन एकटीच घरातून बाहेर पडते.  कुठे जायचं हे न ठरवता लांब लांब ढांगा टाकत चालायला लागते. 
दिवसभरातले , हे काय ? ते असं का ? हेच पाहिजे,  ५० वेळेला trash truck कुठे कुठे जातो? चेहरा आणि ओठावर stamp चे ठसे, सगळ्या बाथरूम भर सांडलेल्या पाण्यासाठी- घरभर केलेला toilet रोल, दिवसातून ह्या न त्या कारणाने बदललेले  चार कपड्यांचे जोड; घरातून बाहेर पडूनही ,सगळे तेच विचार तिच्या मनात घुमत असतात. जगात काय काय घडामोडी होऊन गेलेल्या असतात त्या आठ तासात - सध्याच्या काळात एखाद्या tweet मुळे कुठेतरी युद्ध पण चालू झालेलं असू शकतं ! पण ती, ह्या शुल्लक गोष्टी निस्तरत बसलेली असते. ' शुल्लक ' म्हणताच  तिला छोट्या माणसाने तिच्यासाठी बागेतलं काढलेलं फुल आठवतं,  दुपारी झोपताना कुशीत येऊन ,'माझी आहे ' म्हटलेलं आठवतं.. शुल्लक  म्हणणं बरोबर नाही..पण तिचा दिवस म्हणजे ,तेच- तेच कंटाळवाणं...
परत जाण्याची घाई नसताना,तिची पावलं आपसूक घराकडे वळतात. किल्लीने दार उघडून ती घरात येते तर, सकाळी तिला हवी होती तशी शांतता असते. ती दाराशीच उभी राहून घरातली शांतता दोन मिनिटं, आत भरून घेते. 
डोळे उघडून living रूममध्ये येते तर घरातले सगळे खेळ जमिनीवर पसरलेले दिसतात. परत डोळे मिटून, दीर्घ श्वास घेत ती kitchen मध्ये पाणी प्यायला म्हणून जाते..तर "surprise!" म्हणत  तिच्या अंगावर  झडप पडते. तिला surprise होण्यासारखं काहीच नसतं, उलट kitchenच्या फरशीवर  तीन वेगवेगळे भातुकलीचे set मांडलेले दिसतात. आईचा चेहरा छोट्या माणसाला कळतो, म्हणून " आई I am making tea , I am making tea .."  " for you .." असं म्हणून प्लास्टिकचा चहाचा कप अति उत्साहात ओठांना लावला जातो. आईला हसू येतं, ती मिटक्या मारत चहा प्यायलाचा अभिनय करते. खरा चहा मिळाला तर किती बरं होइल असा विचार मनात यायच्या आधी, खऱ्या चहाचा कप पण ओट्यावर दिसतो. चहा घेत आई भातुकलीतल्या सुरीने सफरचंद चिरायला लागते तर ते ओढून घेत, " नाही हे बाबाचं आहे .." असं म्हणून छोटं माणूस ती खेळणी काढून घेतं. बाबा, आंब्याच्या छान चौकोनी फोडी करून छोट्या माणसाला भरवत असतो, तो आईकडे बघून हसतो.
आई  उठून स्वैपाकाला लागते. बाबा आणि छोटं माणूस, त्यांचा भातुकलीतला स्वैपाक करत, खेळत राहतात. 
मात्र खरा स्वैपाक झाल्यावर , छोट्या माणसाला आईनेच भरवायला हवं असतं. तिच्या मांडीवर बसूनच खायचं असतं. booster chair वर बसवलं तरी आईने अगदी जवळ बसायचं असतं. मग बाबा नसला तरी चालतं. बाप लेकीचं चांगलं तंत्र आहे, आईने छोट्या माणसाला भरवायच म्हणजे बाबाला जेवता येईल - पण मग आईचं आस्वाद घेऊन जेवणं कधी होणार?
रात्री, छोटं माणूस आई बाबांच्या मध्ये झोपल्यावर , आई त्याचा मुका घेते आणि  उचलून त्याच्या गादीवर ठेवते. लहानपणी,तिचा बाबा तिच्याशी कधीच भातुकली वगैरे खेळला नव्हता. तो तर कधी स्वैपाक चालू असताना स्वैपाकघरात पण आला नव्हता. पण रात्री झोपताना तिचा बाबा तिला एका राक्षसाची गोष्ट सांगे, कडेवर घेऊन लांब मद्रासी मंडईपर्यंत चालत जाई , तेव्हा कुठे तिला झोप लागत असे. तिचा बाबा नेहमी तिच्यासाठी वेगवेगळ्या भाषेतल्या परीकथा घेऊन येई, तिच्या वक्तृत्व स्पर्धांची तयारी करून घेई. तिची आई आणि बाबा एकत्र स्वैपाकघरात स्वैपाक करत नसले, तरी तिला बाबाचं प्रेम आहे हे कळायचं. छोट्या माणसाच्या आईला वाटून गेलं, की आईचं प्रेम पोटात असल्यापासून कळतं, आणि तिच्या छातीवर ठेवल्यापासून आयुष्यात एक गृहीतच असतं - पण बाबाला मात्र ते वेळोवेळी दाखवायला लागतं, परीक्षा द्याव्या लागतात! छोट्या माणसाचा बाबा इतक्यातच परीक्षा देत, बदलला सुद्धा ! भातुकली, चित्रकला , दुकानात  मुद्दाम जाऊन खरेदी, एरवी कधीही न केलेल्या गोष्टी, छोट्या माणसाने तिच्या बाबाला करायला लावल्या. उगाच नाहीये, फक्त त्याच्यासाठी ते ठेवणीतलं हास्य- त्याने ते जिंकून मिळवलंय. दिवसभरातल्या कंटाळवाण्या,  किरकिरण्यानंतर आईला छान हलकं वाटतं. झोप लागल्यावर सुद्धा तिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य कायम राहतं..
दुसऱ्या दिवशी,उठून दिवसाचा काही विचार करायच्या आधीच, तिच्या कानावर कुसरपुसर पडते . डोळे उघडून बघते तर, छोटं माणूस -छोटा कप आणि मोठं माणूस- खरा कप घेऊन, तिला चहा द्यायला सज्ज झालेले असतात.




Saturday, December 23, 2017

प्रवास



दहावीच्या परीक्षेनंतर,माझी एक मैत्रीण तिच्या कुटुंबाबरोबर Europe trip ला गेली. मला खूपच हेवा वाटला होता तिचा.तेव्हा मी काय?माझ्या घरातलं कुणीही विमानात बसून भारतातल्या भारतात पण फिरलं नव्हतं . Europe म्हणजे नक्की कुठ- कुठले देश हे मी नकाशा शोधून त्यावरती बघितलं होतं. खरतर तोपर्यंत मी  फक्त महाराष्ट्रातल्या वेग वेगळ्या शहरात प्रवास केला होता . जिथे नातेवाईक आहेत, किंवा देवदर्शन होणे आहे, तिथे आमची Family प्रवास करायची. म्हणजे त्या वेगळ्या शहरात जाऊन हॉटेलात वगैरे न राहता आम्ही नातेवाइकांच्या घरीच रहायचो. प्रवास शक्यतो लाल गाडीच्या किंवा नीम आराम बस मधून घडायचा.  हे सगळे प्रवास मला खूप 'uncool' वाटायचे. एका ओळखीच्या ठिकाणाहून , दुसरया ठिकाणी ओळखीच्या लोकांना भेटायला जायचं, त्या त्या गावची speciality काय,हे त्या गावातले नातेवाईक सांगतील तेच मान्य करायचं, घरातलच साग्रसंगीत, रुचकर जेवण जेवायचं. मग बदल असा तो काय ? Adventure चा असा काही scopeच नाही. ह्या अशा प्रवासाला अपवाद अशा, तोपर्यंतच्या आयुष्यात दोनच आठवणी -किहीम ला निव्वळ मजा म्हणून गेल्याचं , आणि पौर्णिमेच्या रात्री रायगड चढण्याचा ट्रेक. ह्या दोन्ही वेळेला आम्ही Home stay मध्ये राहिलो होतो...घरी राहण्यापेक्षा वेगळं ,पण तरीही त्या मध्ये 'independance' नाही.
ट्रेकला गेल्यावर Independace असायचा. वाटेतल्या छोट्या गावांच्या मंदिरात किंवा ओसरीवर sleeping bags किंवा गोधड्या घालून झोपायचो. घरून शिधा नेलेली असायची, पण चुलीवर स्वैपाक करायला , त्यासाठी काटक्या, लाकडं गोळा करणं मला फार आवडायचं. कधीतरी हाताला चटका बसायचा, धूर घशात जायचा, खिचडी किंवा रास्स्यातले बटाटे अर्धे कच्चे राहायचे.  पण चांदण्या रात्री , अंधारात ,गप्पा -टप्पांमध्ये कुणीतरी वेगळ्याच एखाद्या ट्रेक बद्दल बोलायला लागायचं,कधीही नाव न ऐकलेल्या  गावातल्या सरपंचाची गोष्ट रंगून डोळ्यासमोर उभी रहायची,  एखादा गावकरी चौकशीला यायचा आणि मग गावाबद्दल , स्वतः बद्दल सांगात, शेकोटीला उब घेत, तंबाखू चोळत बसायचा. कधीतरी दोन -तीन  गावकरी केरोसीन lamp घेऊन यायचे  आणि साप , रान मांजरानबद्दल चेतावणी द्यायचे . थोडं असुरक्षित वाटायचं, पण पुण्यातल्या 'sheltered' जगण्यापेक्षा हे रम्य होतं आणि छान वेळ जायचा. भुताच्या गोष्टी सुरु झाल्या की मी कान बंद करून घेत, कधी झोपेचं सोंग आणत असे.  झोपताना आसपासच्या झाडांच्या पानांची सळसळ, साप बीप माझ्याच अंथरुणात शिरण्याची शक्यता , रात्री torch घेऊन अंधारात स्वतःपुरती नवीन 'बाथरूम' शोधणं- ह्यात वेग वेगळे अनुभव असायचे.  असंच 'वेगळं' आयुष्य जगण्याची हुरहूर वाटायची.
एकदा , चार दिवसाच्या ट्रेक मध्ये माझा पाय पहिल्याच दिवशी इतका सुजून आला, blistersआले , की दुसऱ्या दिवशी slipper घालून चालायला लागलं. एकदा गवताच्या ढेप्यांवर पांघरुण अंथरून आम्ही १५ जण झोपलो पण मला एकटीलाच त्याचा rash आला.  एकदा शेकोटी फुंकताना, माझे केस थोडे जळाले !;) असं काही झालं की मला मी 'वेगळी' आहे असं वाटायचं. आणि त्या वेगळेपणामुळे मला चेव चढायचा -अजून वेगळेपण सिद्ध करायचा. मग सगळे हसत खेळत असले के उगाच आकाशाकडे बघायचं, वही मध्ये काहीतरी खरडायचं. मग तू काय विचार करते आहेस असं विचारण्यापेक्षा, माझी चेष्टाच केली जायची.. मला माहित होतं की मी आव आणून वागते आहे पण अशी वेग वेगळी 'पात्र' एकत्र प्रवास करत नसतील तर मग नाट्य कुठून निर्माण होणार?
 तर Europe trip चं कळल्यावर हे सगळं माझ्या डोक्यातून गेलं. आपल्या देशापेक्षा  वेगळे लोक, वेगळी भाषा, वेगळी शहरं, वेग वेगळ्या 'हॉटेल्स' मध्ये वास्तव्य - माझी मैत्रीण एकदम केवढी समृद्ध होऊन येणार असं मला वाटलं. मी मात्र तिथेच good old पुण्यात, माझ्यामध्ये तीळमात्र ही बदल किंवा growth न होता , ती गेली तेव्हा होते, तशीच ती आल्यावरही असणार !
पण मग माझ्या बहिणीने मला दिल्लीला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात बोलवून घेतलं. एवढा प्रदीर्घ रेलवे प्रवास मी कधीच केला नव्हता. माझ्या बरोबर मला सोडायला बाबा दिल्लीला येणार होते,त्यांनी निझामुद्दीनची दोन टीकिट्स काढली. त्यावेळेला mobile , Ipad काहीच नव्हते. त्यामुळे entertainment म्हणजे पुस्तक वाचणे , गप्पा मारणे, खिडकी बाहेर बघत मनन करणे, गाणी गुण गुणणे, खाणे आणि झोपणे एवढेच मला माहित होतं. बाबा बरोबर असले की आपण वेगळं काही वाचायला घेतलं नाही तरी चालतं.त्यांच्याकडे कुठल्याही वायोगटातल्या  माणसांना वाचता येतील,अशी एक दोन तरी पुस्तकं असतात. ते सढळ हाताने, काहीही विकत घायला पैसे देतात.त्यामुळे मी जास्त लक्ष, ताईच्या मित्र मैत्रिणीनसमोर 'posh' दिसण्यासाठी काय कपडे घालता येतील,ह्याच्याकडे दिलं.  आईने दिलेला डब्बा 'घरीच विसरला' असं नाटक करण्याची मी तयारी केली होती , पण बाबांनी तो त्यांच्या bag मध्ये आधीच भरून ठेवला होता.
अशी तयारी करून , Europe नाही तर निदान भारतातला वेगळा प्रांत, देशाची राजधानी,पाहिला मी आणि बाबा निघालो.  ट्रेन मध्ये बसल्यावर बाबांनी मला १०० ची नोट हातात दिली आणि म्हणाले - "तुला हवं आहे ते घे, पण हिशेब लक्षात ठेव."  त्यानंतर एक पुस्तक उघडून पाच दहा मिनिटात त्यांच्याच विश्वात मग्न होऊन गेले.त्या प्रवासात मी पाणी प्यायले नाहीच बहुतेक. अतिशय टाकाऊ प्लास्टिकच्या ग्लास मध्ये दोन croutons आणि भरपूर मिरं घातलेलं टोमॅटो सूप मला इतकं आवडलं होतं,की बहुदा त्या फेरीवाल्याचा सगळा पिंप मीच संपवला असणार ! आणि चंबलच्या घाटा्वर पडलेल्या,संधीप्रकाशाच्या छटा  बघत  असताना,खाललेली, बटाटा आणि लाल हरबरा घातलेली भेळ, मी अजूनही विसरले नाहीये.. तो दिल्लीचा  प्रवास , माझ्यासाठी माझा
 खरा पहिला प्रवास होता.
दिल्लीला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात, लोकांशी बोललं की कळायचं ,देशातल्या किती वेगवेगळ्या प्रांतातून वेग वेगळी हिंदीभाषा ,प्रवास करून, विद्यालयात मुरली आहे ते . बहुतेक विद्यार्थी  , track pant आणि Tshirt मध्येच फिरत होते, त्यामुळे मी posh कपडे घालण्याची काही भानगडच नव्हती. मी दोन दिवस तेच कपडे घातले तरी कुणाचं बिघडत नव्हतं, दर रोज अंघोळ केली नाही तरी चालत होतं. दर रोज 'सुरेश' च्या चहाच्या टपरी बाहेर वेगवेगळ्या लोकांची ओळख होत होती. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेग वेगळ्या नाटकांच्या तालमी बघायला मिळत होत्या. १८८० मध्ये Henrik Ibsen ह्या नोर्वेगीअन नाटककाराने लिहिलेलं "Wild Duck" नाटकाची तालीम नुकतीच सुरु झाली होती.  जी मंडळी कधी भारतातून बाहेर गेली नाहीत,  नॉरवे हा देश कसा, भाषा कशी हे माहित नाही, ती आत्म चिंतन करून , पानावर लिहिलेल्या शब्दात तल्लीन होऊन, एक जग साकारण्याच्या मागे होती.  माणसं  असं कल्पनाविश्व साकारू शकतात हे अर्थातच वाचनात आलं होतं  पण ते प्रत्येक्ष पाहिल्यामुळे माझी समज वाढली... मला किती किती ठिकाणी फिरण्याच्या वाटा मोकळ्या झाल्या.कक्षा रुंदावल्या म्हणतात न तसच काहीसं ..वेगळे अनुभव घेण्याकरता मी 'वेगळं' असण्याची गरज नव्हती.
जसा तो दिल्लीचा प्रवास ताईने घडवला , तसा नुकताच तिने एका किटलीचा घडवला.. पुण्याच्या सोनल हाल ला विकत घेतलेली  ही किटली , plane cargo मध्ये बसून आमच्या घरी अमेरिकेत आली.
 किटलीतला चहा  पिण्यात एक वेगळीच नजाकत आहे जी चहाच्या भांड्यातून कपात ओतण्यात नाही. English tea ची तल्लफ, मी ह्या Mexican design च्या किटलीतून चहा पिऊन घालवते.  High tea enjoy करायला लागणारं शांत अवकाश आत्ता माझ्याकडे नाही, बरेचदा मी सकाळचा चहा microwave करत करत , १० वाजेपर्यंत पितच आसते. ह्या किटलीतून मी काहवा , अमृततुल्यातला चहा, गवतीचहा आलं घातलेला चहा, मित्र मैत्रिणींबरोबर घेतलेला चहा, चहाचं सगळं विश्वरूप ह्या किटलीत सामावतं .
 बाकी सब मन का तो खेल है ! माझ्या ह्या प्रवासाबद्दल लिहिता लिहिता मी जाऊन आलेल्या सगळ्या जागांना मी पुन्हा भेट देऊन आले , ती पूर्वी bore वाटणारी शहरं सुद्धा!


Friday, December 22, 2017

Sunayna Dumala: आश्रित ते वीरांगना

https://www.guernicamag.com/an-alternate-history/
 Internet वर काही वाचता वाचता, मीरा नायर ह्या भारतिय पटकथालेखिका आणि दिग्दर्शिकेने लिहिलेला एक छोटा लेख वाचला.  विषय होता ,नवरा त्याच्या मित्राबरोबर एका बार मध्ये न जाता , घरी बायकोबरोबर चहा प्यायला परतला असता तर....

तो लेख श्रीनिवास कुचीबोटला आणि त्याची बायको सुनैना दुमला, ह्यांच्या विषयी आहे.त्यांच्या बद्दल लिहिलेलं ,मी अनेक महिने वाचत आले आहे.२२ फेब्रुअरी २०१७ ला , कॅनसस शहरात , ओलेथा इथल्या एका बारमध्ये, श्रीनावास कुचीबोटला आणि त्याचा मित्र अलोक मदासनी ह्यांच्यावर , अॅडम प्युरीनटन नावाच्या एका सरफिर्या अमेरिकन देशभक्ताने," तुमच्या मायदेशी परत जा " असं म्हणत गोळ्या झाडल्या.   अॅडमला हे दोघे भारतीय इंजिनीअर , ईराणी वंशाचे वाटले. एका शाब्दिक चकमकीने ह्या हल्ल्याची सुरुवात झाली आणि अॅडम प्युरीनटन ने बंदूक काढून गोळ्या घालायला सुरुवात केल्यावर , ईअन ग्रीलोट , एक अमेरिकन युवक, गोळीबार थांबवायला मध्ये पडला, त्यालाही गोळ्या लागून तो जखमी झाला.  श्रीनिवास कुचीबोटलाला लागलेल्या गोळ्यांमुळे तो हॉस्पिटलमध्ये पोचायच्या  आधीच मृत्युमुखी गेला. अलोक आणि ईअन गोळ्या लागूनही बचावले.

सुनैना ने श्रीनिवासचे पार्थीव अमेरिकेतून त्याच्या गावी , भारतात आणेपर्यंत कस उसनं अवसान आणून , हे दुस्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहून पार पाडलं,  ह्या बाबतचे आलेख असलेल्या मुलाखती नेट वर सहज उपलब्ध आहेत.

 मग अनेक्कांना चमकून टाकणारी गोष्ट घडली. श्रीनिवासच्या अंतिम संस्कारांनंतर सुनैना परत अमेरिकेत आली. तिच्या नवर्याचा खुनी पोलिसांच्या अटकेत होता , म्हणजे न्याय मिळण्याच्या द्रुष्टीने पाहिलं पाउल पडलेलं होतं . अलोक मदासनी , ईअन ग्रीलोट हॉस्पिटल मधून discharge होऊन हिंडू - फिरू शकत होते. नव्हता तो तिचा श्रीनिवास, अमेरिकेतले तिचं वास्तव्य ज्याच्यामुळे, ज्याच्यासाठी, ज्याच्या भवती फिरायचं, त्याची 'विधवा' होऊन ती अमेरिकेत परतली. H4 'आश्रित' किंवा H4 dependant म्हणून वावरत आलेली बाई, तिला 'H1' Visa चं वलयी संरक्षण देणारा तिचा नवरा गेला, त्यामुळे भारतात परत deport होण्याची शक्यता पत्करून , कोणत्यातरी अफाट प्रेरणेने  झपाटून  अमेरिकेत परतली.
She may have left America as the survivor of a hate crime ,but  when she returned , she was a warrior. हा जो तिच्या मधला बदल आहे - तो प्रेरक आहे, बारंकाईने तिचे उर्जा स्तोत्र काय आहे ह्याचं निरीक्षण करायला भाग पाडणारा आहे.

पात्रता असूनही , जेव्हा वर्षानुवर्ष एखाद्या व्यक्तीला," आश्रित",  Dependent Status वर जगायला लागतं , त्यावेळेला त्या 'लबेल'चाच  तुमच्या आत्माविश्वसावार आघात होतो. हे, हजारो शिक्षित, उच्च शिक्षित भारतीय बायकांनी अमेरिकेत अनुभवलं आहे. हे बरोबर आहे ,की ह्या सगळ्या बायका उघड्या डोळ्यांनी, स्व खुशीने( ?) इथली समृद्धी, जीवनशैली उपभोगायला ह्या उदारमतवादी वाटणाऱ्या देशात , स्वतःचे नवीन बस्तान बसवायला,स्थलांतरित होतात . पण एखाद्या देशात जाऊन आपल्याला H4 विसा वर dependant status मिळवून राहायचंय,  हे स्वीकारून जोडीदार निवडणं ,आणि त्या जोडीदाराबरोबर ह्या देशात येऊन रहायला लागल्यावरचं वास्तव अनुभवणं ,ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. Dependant status वर तुम्हाला नोकरी करता येत नाही, कुठलेही पैसे मिळतील असे काम करण्याची मुभाच नाही. शिवाय , शिकायचे नसेल तर (उच्च शिक्षिताने किती शिकावं ?) सुरुवात इथून होते ,की दररोज बोलायला माणसं शोधायची कुठून ?  असं सगळं असूनही, वर्षानुवर्ष, उच्च शिक्षित, पात्रता , योग्यता असलेल्या  बायका - अमेरिकेत येऊन वास्तव्य करतात. नक्की त्यांना कसली भूल पडते हे सांगता येणार नाही .. पण ह्या सगळ्या प्रवासातून सुनयना गेलीली असणार ! ती तर अमेरिकेत येऊन शिकली होती - तिच्या कडे अमेरिकन विद्यापीठातली Masters degree असूनही ती H4 status वर अनेक वर्ष राहिली होती.ह्या प्रवासचक्रातून अमेरिकेत आलेली एखादी विवाहित बाई गेली नसेल तरच नवल !
उच्च शिक्षण , मासिक /वार्षिक आर्थिक उत्पन्न ह्या बाबतीत अमेरिकेतला भारतीय समुदाय  प्रभावशाली पठडीतला आहे . पण ह्या स्थलांतरित बायकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, भारतीय पुरुषांनी किंवा ह्या problem ने ग्रासलेल्या भारतीय बायकांनी देखील, रस्त्यावर येऊन आंदोलनं  किंवा धरणे धरलेले नाहीत, किंवा इतर कोणते राजकीय मार्ग अवलंबले नाहीत. ( थोड्या फार प्रमाणाने Lobbying मुळेच h4 EAD किंवा काम करण्याचे permit Obama प्रशासनाखाली मिळाले होते.)
मग तरीही सुनैना दुमला, तिच्याकडून तिची उमेदीची वर्ष हिरावून घेतलेल्या देशात का परतते ? Vigilante हिरो असतात न ; बंदुकीत गोळी एक, मारेकरी अनेक , तरी " If I am going to Die , then I am going to die with a bang ?", असं म्हणून तुटून पडणारे ; मला तशीच  काहीशी वाटली सुनैना.
तिची जीवनकहाणी tragic love story म्हणून consume करण्यासारखी आहे. जगातल्या हाजारो लोकांनी  march, April, may महिन्यापर्यंत, शोक व्यक्त केला असेल आणि आता  तिच्या बद्दल विसरूनही गेले असतील... पण ह्यापुढच्या माझ्या आयुष्यात माझ्यासाठी ती प्रेरणास्थानी राहील कायम.
Racial discrimination, Immigrant security, immigration rights असे कुठले कुठले मुद्दे उचलून ती लढायला सज्ज झाली आहे. तिच्या बाबतीत internet वर कित्येक जणांचे मत आहे की ," एवढंच प्रकर्षाने ह्या मुद्द्यांबद्दल तिला वाटत होतं तर तिने आधी का आवाज उठवला नाही ?",
" तिला मोदींचा पाठींबा आहे, त्यांना सांगेल का भारतातला वर्णद्वेष आणि जातीयवाद बंद करायला ?"
सांगेल. तेही सांगेल. तिच्या 'श्रींनी' ने स्वतःच्या हाताने बांधलेल्या देवघरात , त्यांच्या् अपूर्णू स्वप्नांची उदी जळते आहे आजून, तेवत ठेवलेला दिवा जेव्हा आपोआप विझेल न,तेव्हा दिसतील तिला किनाऱ्या पलीकडचे प्रश्न. घाटावर शेवटची अंघोळ करतांना , तिच्यासमोर एकच प्रश्न मांडला गेला होता,"विधवेचं आश्रित आयुष्य जगायचंय का सगळा जीव पणाला लाऊन वीरांगना होणार आहेस ?" तिला तिचं उत्तर कुणाला सांगायला नाही लागलं , ते तिने स्वतःच्या कृतीतून सगळ्या जगाला दाखवून दिलंय !



Why I Planted a Garden in Winter?




'Why I planted a garden in winter?' was written exactly one year ago! And I still stand by it!
Because there are two gifts that we should give our children- one is roots and the other is wings!
( found this quote on Pinterest)

The world as we know it came to an end with Trumps win. An Axe stands poised to eliminate climate and environmental policies implemented in the last 2 decades. With the Polar vortex this season - there isn't a dearth of smug skeptics taunting global warming. Purge lists for anyone and everyone who has worked or even attended climate change initiatives are underway. Scientists around the globe are scrambling to ' copy' existing research for fear that it will soon disappear. But through this political upheaval,me, a stay at home immigrant mom ,am left with a heartbreaking loss for not protecting my daughters future. Because let's be clear that the world we wanted for our children has been snatched from us . The cold , damp, rainy weather abets my helplessness. At the first opportunity- I gather my tools and start work in my garden. For a wounded soul there is nothing more healing than the magic combo of water, soil and seeds./seedlings. I huff and puff as I pull out the weeds - but my hands are cold , my face a little numb from the biting wind. As I am transplanting seedlings from my pre -election hopeful days , an old ,kindly neighbor asks me , " Isn't it a little late in the season my dear? " I smile at her, but continue pulling out the weeds. She is right and she means well. She smiles indulgently and walks away. I call after her,
"It's my garden of resilience.." She pauses and turns around. (Only in Berkeley can you have these kinds of conversations and neighbors who understand the socio- political context of what you mean. ) A dramatic stage beat passes - there are no questions , no explanations- she and I both digest what I said. She turns to walk away but quips, "Well, we definitely need more resilience gardens then."  Her understanding is gratifying and a balm for my restlessness.
In the coming years I am not sure if my family will live in this house , in Berkeley or even in this country. But I still wanted to plant the garden. It's a symbol of what immigrants have done in this country. It's a symbol of how angst and helplessness can be converted into a positive force. It's my path to teach my daughter to nurture life .
More than ever today we need to teach our children the power of nurturing, and the power of resilience in face of unwarranted biases, hatred and divisiveness.
And that's why I planted a garden in winter.
If you agree , plant something ,somewhere. The planet is going to need as much help as it can get. Plant your own resilience garden .

Thursday, December 21, 2017

Missing



मी कधीतरी आठरा -एकोणीस  वर्षाची असतांना Sydney Sheldon चे Tell Me Your dreams नावाचं पुस्तक वाचलं होतं.त्यावेळेला, ही  Multiple personality disorder बद्दल असणारी कादंबरी वाचून मी खूप भारावून गेले होते. त्यानंतर वर्ष दीड वर्षांनी माझ्या बहिणीकडे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाला जाऊन आल्यावर , तिथल्या त्या creative वातावरणाची झिंग चढल्यासारखं झालं. मला एकदम नाटक लिहावसं वाटायला लागलं. आमच्या घरात फक्त 'काहीतरी लिहायचं आहे .." असं सांगून चालत नसे . घरातल्या इतर चौघांनी उलट तपासणी घेण्याची तयारी ठेवावी लागे. त्यामुळे प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर आधी अभ्यास करायला हवा, म्हणजे " अभ्यासपूर्वक निर्णय " घेतला आहे असं सांगायला मोकळी. असं न केल्यास चार वेगवेगळ्या स्वभावाची अत्यंत हुशार माणसं , त्यांचे दृष्टीकोन, त्यांच्या सूचना  समोर मांडून मला confuse करू शकतात ह्याची कल्पना होती. पहिली एकांकिकाच Multiple Personality Disorder , ज्या बद्दल मला काही माहिती नाही , psychology चा काही अभ्यास नाही , तरीही त्याबद्दलच  लिहायची ठरवलेली असली, तरी अभ्यास होईपर्यंत त्याबद्दल काही बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं. अभ्यास करण्यासाठी मी बाबांचं ब्रिटीश काउन्सिल लायब्ररी चे कार्ड घेऊन पुस्तकं शोधायला गेले. clinical pshychology ची मोठी मोठी काही पुस्तकं आणून वाचायला लागले. सिनेमात कसे नायकाला आई असते किंवा बाबा नाही, किंवा कुणीतरी एक अपघातात गेलेलं असतं, कुणीतरी हरवलेलं असतं  किंवा आजारी असतं , तशी  काहीतरी दुखःमय  परिस्तिथी माझ्या नायिकेची असणं गरजेचं होतं. तिच्या लहानपणी काहीतरी इतकं धक्कादायक झालंय की त्यामुळे MPD झालंय असा माझा निष्कर्ष होता. म्हणून मी ठरवलं की नायिकेची आई कुणाबरोबर तरी पळून गेली आहे, आणि त्यामुळे सामाजिक मानहानी होऊन वडिलांनी आत्महत्या केली आहे - अशी नायिकेची Backstory रचायची. तिचे alters किंवा multiple personalities हे तिचे आई वडीलच आहेत आणि एकांकिकेमध्ये ती त्यांच्याशी संवाद साधते. आता १९ वर्षाच्या मुलीच्या लिखाणासाठी हे खूप dark होतं, ढोबळ वरवरचं असलं तरी. पात्रांची मानसिकता उभी करण्यासाठी केलेल्या 'अभ्यासात', माणसांच्या आत लपलेल्या dark, विकृत ,दुष्ट विचारचक्रांनी ग्रासून मी पण थोडी भ्रष्ट झाले ,असं वाटलं. भ्रष्ट अशा साठी की ह्या पूर्वी त्या मानेने बाळबोध असणाऱ्या माझ्या भावविश्वात, विचार चक्रात ही नवीन न पुसून टाकता येणारी माहिती कोरली गेली होती. विकृतमनोवृत्ती माणसं सर्रास आपल्याभावती फिरत असतात आणि जगातली सगळं लोकं 'चांगली ' अजीबात असत नाहीत- अशा ठाम निष्कर्षाला मी पहिल्यांदाच पोचले होते.
एकांकिकालेखनाचे विषय निवडताना, the world could have been my Oyster, but I chose this!
तेव्हा मला पहिल्यांदा ' आपण ह्यांना पाहिलत का ' अशा अगदी छोट्या फोटो सहित, दोन वाक्यात माहिती दिलेल्या जाहिराती पेपरात येतात ह्याची जाणीव झाली. नयिका अशी कात्रणं काढून एक scrapbook बनवत असते.. ती एकांकिका संपली तरीही लोकं हरवण्याची, गायब होण्याची , कधीही परत न येणारी लोकं, ही जी कल्पना आहे ती मला डोक्यातून कधी पूर्ण काढूनच टाकता आली नाही. त्यांच्या घरच्यांचे काय होत असेल, काय सांगून घरातली लोकं स्वतःची समजूत काढत असतील? किती वर्ष वाट बघत असतील? नवस, तायीत, जप , मंत्रपूजन, केल्याने लोकं परत येत असतील का ?  एखादा माणूस हरवला आणि त्याच्या कुटुंबाला राहतं घर सोडावं लागलं तर ? कायद्याचा  अभ्यास करत असतांना लग्न , जमीन- जुमला ह्या सगळ्या बाबतीत एखादा माणूस सात वर्ष बेपत्ता असेल तर काय करायचं ह्यासाठी कायदे आहेत - जणू लोकांचे असं बेपत्ता होणं हे गृहीतच धरलेलं आहे ! Its  an accepted eventuality...
 ह्या एकांकिकेनंतर २-३ वर्षांनीच माझा एक खूप जवळचा मित्र ,एका संध्याकाळी , 'मी अमृताकडे जाऊन येतो , मित्रांना भेटून येतो " असं घरी सांगून निघाला तो परतच गेला नाही. मला फोन आला तेव्हा शहरायला झालं. २०- २५ दिवस मनात काहूर माजून राहिलं . घरचे, मित्र मैत्रिणी, सगळ्यांबरोबर हसत खेळत राहणारा , निर्व्यसनी, हुशार मुलगा असा का गेला असेल? कशामुळे दुखावला गेला असेल का ? आम्ही सगळेच मित्र खूप घाबरून गेलो होतो , माझ्या  मनात नाटकाच्या वेळेला  लपवून ठेवलेली भीती दाटून आली.  एक २० -२५ दिवसांनी पोलिसांना तो सापडला आणि घरी आला पण आम्ही आज पर्यंत कधीही त्या दिवसांबद्दल बोललेलो नाही. कधीतरी मैत्रीत ही सल खुपते , पण त्यापेक्षा तो सही सलामत आहे हे खूप जास्त मौल्यवान आहे. पुस्तकात , वर्तमान पत्रात वाचलेल्या ऐकीव गोष्टी सत्यात अशा उतरतात त्यावेळेला त्याचा धक्का जास्त बसतो.
माझा भाचा आणि भाची माझ्या जवळ अमेरिकेत राहिला आल्यावर असाच एक प्रसंग घडला. एक दिवस nanny ला जमणार नाही आणि सरब ला meetings असल्यामुळे,  मी कबीरला शाळेतून आणायला गेले होते. तसं त्याच्या शाळेत आणि त्यालाही  सांगितलेलं होतं. मी वेळेत जाऊन शाळेच्या दाराबाहेर हजर झाले. त्याच्या शाळेत वर्गानुसार मुलं बाहेर curb वर येऊन उभी राहत आणि आई -वडील /nanny त्यांना कार मध्ये बसवत. Speakers मधून कुठला वर्ग चालू आहे , नंतरचा कुठला आहे , अशी सगळी माहिती देत होते. कबीर चा वर्ग पुकारून , मुलं येऊन निघून गेली.  पुढचा वर्ग पुकारायला सुरुवात झाल्यावर मी घाबरले. पळत त्यांच्या office मध्ये गेले. खूप शांतपणे receptionistने वर्गशिक्षिकेला फोन केला, त्या वर्गातून  निघाल्या होत्या म्हणून मग library मध्ये फोन केला. कबीरला रेंगाळण्याची सवय होती...पण तेव्हा मात्र कबीर कुठेच नव्हता. मला दरदरून घाम फुटला. शाळा घरा जवंळ असली तरी कबीर  एकटा शाळेतून घरी कधीच चालत जात नसे. School administrator, curb duty वर असलेले पालक , सगळेच काय करायचं ह्याची चर्चा करत होते. तेवढ्यात कुणालातरी आठवलं की पांढरी पगडी घातलेला एक मुलगा एका पांढऱ्या गाडीत बसून गेला होता. कुठली पांढरी गाडी? कुणाची गाडी? गाडी कोण चालवत होतं ? बाकी काहीही सांगता येत नव्हतं. शाळेतून सरबला फोन लावला गेला , मला घरी जाऊन थांबायला सांगितलं आणि दोन तासात काही पत्ता लागला नाही तर बघू असं शाळेतल्या Resource officer ( security officer) ने मला सांगितलं. पुढे नको त्या शक्यता डोक्यातून परतत लावत ,वाट बघत घालवलेला पाउण एक तास मी आयुष्यात कधीच  विसरू शकणार नाही.  रडवेला चेहरा खांद्यात लपवत कबीर त्याच्या nanny आणि मित्राबरोबर घरी परतल्यावर , त्याला मी फक्त घट्ट मिठी मारली. मित्राशी खेळायला तो गेला होता , sorry म्हणाला..But I felt sorry for him. त्याच्या आयुष्यात त्यापूर्वी  राक्षस, हिंसा,  लहान मुलांबरोबर होऊ शकणारे गैरप्रकार, हे फक्त खेळात , comics किंवा सिनेमामध्ये असतील  अशा शक्यता . पण ह्या  प्रसंगामुळे -त्याला इतक्या शक्यतांची जाणीव करून देण्यात आल्यामुळे , त्याच्या  सुरुक्षित विश्वाची उब थोडी कमी झाली असेल त्या दिवशी . I think he must have lost some of his innocence that day..
ह्या missing ह्या प्रकाराबाबत माझ्या संवेदना  तीक्ष्ण झाल्या आहेत, म्हणून असेल कदाचित ,पण मला आता आपल्या रोजच्या आयुष्यात पण तो एक Pattern असल्यासारखा जाणवू लागलाय... लहान मुल मोठं होतं, त्यावेळेला त्याचं बाळसं नाहीसं होतं, पौगंडावस्थेतील मुलं मुलींचं एकमेकांबरोबर खेळणं, मुळात मुलींचं खेळणं नाहीसं होतं, कॉलेजमध्ये पाहिलेली अवास्तव स्वप्न कामाला लागल्यावर हळू हळू रेंगाळत नाहीशी होतात,  लोकांना एकमेकांबद्दल वाटणारा आदर , प्रेम छोट्याश्या भांडणावरून नाहीसं होऊन जातं, काही वेळेला परत मिळतही ते , माझा मित्र नाही का आला परत ? तसच कधीतरी प्रेम आणि आदर परत मनात येतात , वाटायला लागतात. कदाचित," I miss you" म्हणत असतांना आपण समोरच्या व्यक्तीमधली हरवून गेलेली पण आपल्याला प्रिय असलेली त्याची सवय , कृती, स्पर्श आठवून त्याला ते 'I miss you' मधून सांगत असतो.  काही वेळेला शारीरिक क्षमता नाहीश्या होऊन जातात, अल्झायमर सारखा आजार झाल्यावर , माणूस तर समोर असतो, पण आपल्या ओळखीचा माणूस निरोप न घेताच नाहीसा झालेला असतो. मला वाटतं, की शेवटच्या पूर्ण गायब, नाहीसं होण्या आधी, ही आपली कुडी , आपलं व्यक्तिमत्व, थोडे थोडे आपल्यातलेच तुकडे  हरवत जात असतात, त्या जागी आपण नवीन तुकडे Fit करण्याच्या प्रयत्नात असतो -म्हणून आपल्याला हा सतत तुकडे हरवत जाण्यचा खेळ जाणवत नाही.

Annapurna's Pan ( English Translation of the original)

This is the English translation of the Marathi post. http://amrutahardikar.blogspot.com/2017/12/blog-post_20.html


Annapurna’s Pan
After enjoying a hearty meal if we complimented our Mom, she would tell us to, "Bless the cook and hope to get a bellyful tomorrow too.” In a more appreciative mood if we alluded to her as our Annapurna, she would deny the compliment, stressing, “No, I am not Annapurna; it was my mother who was a true Annapurna! She never had anything except a surplus of wheat flour, but everyone left her house well fed and sated.” My mom’s mom, Malati Ajji , passed away when I was too young to form definitive,distinct memories of her. I wasn’t blessed with her presence for long. But friends and acquaintances of my mom, aunts and uncle, even neighbors living in the by lanes of Ajji’s house near Dakshinmukhi Maruti Mandir, they all regaled us grand kids with anecdotes about her cooking. Most commonly we would hear ,” Your grandma could whip up a storm with her ball of wheat dough… she would keep them rolling and we would lose count of the polya we were eating..”  From what my Mom tells us , the hot polya off the pan were eaten with some  jaggery, or at times with a spicy dip of raw garlic, red chilli powder and oil. So the taste buds weren’t enchanted with the accompaniments, but Ajji’s soft polya were the real deal.
If there was a special occasion involving us grandkids, Ajji would make  savoury Ukad or sweet Sheera with jaggery. If Ajji had at her disposal a long gourmet  list of essentials, if she wasn’t dealing with the paucity in her circumstances, I am sure she could have whipped up a long list of special , delicious meals, much more than just the Polya that she offered her guests. But she didn’t let the economics of her family circumstances stop her from being the gracious host that she was meant to be. The people whom she fed may not remember the taste of her Polya anymore, but her graciousness stayed with them long after she was gone. My elder brother tries making the wheat Ukad many times, but he is never satisfied with the taste. He never is able to recreate the taste from his childhood, his craving for  Ajii’s Ukkad  remains unfulfilled.
These are some tall shoes to fill, but this ‘Annapurna’ legacy has been successfully carried on by my mom and aunts! My mom carries an essence of my grandmother’s spirit, so whether she agrees or not, she is our Annapurna!
Just recently my parents celebrated their 45th wedding anniversary. In my mom’s journey as a ‘home maker’ ( who was a fulltime working woman too) ,in her kitchen, she has had a steady companion in the form of this aluminum,round bottomed pan or Kadahi . I call it Annapurna’s Patra or Pan.


After her marriage, mom had joined a kitty with the other ladies in our Waada. She bought this round bottomed pan from the winnings of the kitty. Its older than I am and has been with my mom longer than I have been..Even after she had a disposable income at hand and had wanted or wished to buy non stick pans or grills of branded companies, my Mom chose  not to buy any . When she was buying a Futura pressure cooker we convinced her that she needed to buy a pan too, and she bought it to pacify us. But after a few months, she complained, " I can’t use the spatula as usual, a little pressure here and there and see? you see these scratches!” Soon,Mom relegated the Futura pan to the back of her kitchen cupboard.
 Long Before the ‘Wok ‘craze had hit India, my Mom was cooking up her own storm in this round bottomed Annapurna Pot.  Her 'Stir fry' type veggies made us love the whole concept of  taking ‘पोळी भाजी’tiffins to school. We loved eating Green beans, okra, cluster beans,ivy gourd, radish fruits/mungrey/; half cooked, crunchy,and roasted yet cooked just right with the  green colour of the veggies left intact. Cabbage stir fried with just sesame seeds, green chillies and cilantro was a special treat, which, even today, all three of us try to recreate in our own kitchens. We considered having to eat the spicy potato wedges with poli to be a crime, so we would just savor the wedges. Mom would then have to send peanut chutney rolls with the wedges.  Leafy greens tempered with roasted peanut powder, onions and garlic were also gobbled down with the same zest. But while Mom was indulging in this ‘stir fry’ cooking style, she was very particular about the proportion of oil used in the cooking. On the days that she miscalculated or went overboard, she would wipe the Annapurna pot clean with white rice. The resulting ‘fodnicha bhaat’ or ‘spicy rice’ was a delicacy to be savored and was always on the top of our wish list. But sadly, we were indulged only every 15-20 days.
I think that this round bottomed pan has never had a moment of rest in our household. Besides the everyday cooking, Chiwda, Ladoo, Masalebhaat and Pulav for special occasions, all the goodies for Diwali, Bhajani, experimental dishes while all three of us learnt cooking; This pan has seen it all. If the three of us were ever asked, “ What would you like from your Mom’s kitchen?”, I am sure all three of us would reach out for this pan. But even if we were to get the pan, how can you transition the taste that is simply Mom’s food? Laying claim to the pan is foolhardy.. Mom is the source of its abundance and it’s not a Annapurna patra if its separated from the Annapurna herself...
To make a healthy gratifying meal you don’t need equipment or fancy pots and pans. Ajji didn’t have the resources, my Mom had, still has the economic independence to buy these things, but her formula of cooking is simple, pretty basic. You don’t need 30 ingredients to make a tasty meal; a hearty, nutritious meal can sate the belly and enrich the soul. We were lucky that we spent our childhoods in this well-nourished enchantment. But as we grew up our taste buds were corrupted with the tantalizing tastes of Punjabi , Chinese, Pizza, Italian, continental cuisines in hotels and restaurants. Once your taste buds are exposed to these sizzling tastes you can’t turn back the clock....
We grew up in a very ‘organic’ food culture (It was honest to its roots). But our kids are exposed to  Mexican, Ethiopian, Thai, Burmese, Italian, American food cultures and tastes, much before they have had the chance to form an organic food culture of their own. It’s difficult trying to recreate the well-nourished enchantment of our own childhoods for the sake of our kids. But when my daughter, living in Berkeley, licks clean her fingers while consuming kulthacha pithla and toop bhat, or when she insists on a  steam puffed poli right off the pan, or when she asks for a second serving of stir fried , crunchy, Kale tempered with coconut and sesame seeds, I feel a tiny bit fulfilled. I feel like the essence of my Annapurna’s spirit has rooted within me, I just need to find my own Patra/ Pan and try my best in creating a legacy of my own…



Wednesday, December 20, 2017

अन्नपूर्णेचं पात्र

आईच्या स्वैपाकाचा आस्वाद घेऊन, तिचं कधी कौतुक केलं की ती नेहमी सांगते," अन्नदाता सुखी भवो ! आजच्या सारखच उद्या मिळो!" असं म्हणा.  कधी कुणी तिला कौतुकाने 'अन्नपूर्णा' वगैरे म्हणालं तर ती लगेच गंभीरपणे सांगते," छे ! अन्नपूर्णा होती ती आमची आई. बिचारीकडे कणकेशिवाय काही नसायचं ,पण घरात आलेला कुणी तृप्त न होता गेला नाही." आईची आई , मालती आजी , मी खूपच लहान असतांना, म्हणजे तिच्याबद्दलच्या मनात ठळक आठवणी तयार होतील ,त्याच्या आधीच गेली. मला तिचा सहवास फार लाभला नाही. पण आई , दोन्ही मावश्या , मामा ह्यांचे शाळेतले, कॉलेजमधले मित्र, दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिराजवळचे 'आळीकर', आम्हा नातवंडांना  भेटल्यावर नेहमी सांगत, " तुमची आजी न ... किती गरम पोळ्या खाल्ल्या आहेत त्यांच्या हातच्या ! आम्ही खातच सुटायचो." आई सांगते त्यानुसार त्या गरम पोळीला तोंडी लावायला गुळ, कधी कच्च्या लसणीचे तेलामधले तिखट, एवढेच असत. चव होती ती आजीच्या हातच्या घडीच्या पोळ्यांची. कधी काही खास प्रसंग असेल तर आजी, नातवंडांसाठी, त्या कणकेची उकड नाहीतर गुळ घालून शिरा करायची.  घरात सुबत्ता असती, मुबलक सामुग्री तिच्या हाताशी असती तर तिने ह्या पोळ्यांपेक्षा खूप काही करून खाऊ घातलं असतं. पण चणचण आहे म्हणून तिने आगत्य सोडलं नाही.तिच्या हातची  गरम पोळी,त्याचा घेतलेला आस्वाद, जिभेवर त्याची चव राहिली नसेल, पण तिच्या नंतरही अनेकांच्या मनात तिची ही आठवण तरळत राहिली. माझा दादा अनेकदा कणकेची उकड करायचा प्रयत्न करतो, पण त्याला कधीच समाधान होत नाही;त्या उकडीला कधीच आजीच्या हातची चव येत नाही.

हा अन्नपूर्णेचा वारसा माझ्या आईने, दोन्ही मावश्यांनी, मामीने छान जपलाय! आईला पटो न पटो, पण आजीचा अंश तिच्याआत आल्याने , आमची तर तीच अन्नपूर्णा आहे!
नुकतीच,आई बाबांच्या लग्नाला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली. 'गृहिणी' म्हणून तिच्या ह्या प्रवासात, तिच्या स्वैपाकघरातला एक अविभाज्य भाग आहे तो म्हणजे  ही मोठी Aluminium ची कढई ,त्याला मी अन्नपूर्णेचं पात्र म्हणते.
 लग्नानंतर, आईने वाड्यातल्या बायकांबरोबर,एका भिशीत भाग घेतला होता.  ती भिशी जिंकल्यावर त्या पैश्यातून विकत घेतलेली ही कढई, माझ्यापेक्षाही जुनी आहे, माझ्यापेक्षा जास्त आईच्या सहवासात आहे ! तिला वाटलं तर Non stickच्या branded कढया, pans, ग्रील्स काहीही विकत घेऊ शकेल अशी तिची आर्थिक परिस्थिती झाल्यावरही, आईने कधीच त्यातलं काही विकत घेतलं नाही. Futura चा कुकर घेताना , तिला आम्हीच भरीला घातलं म्हणून एक कढई घेतली पण काही महिन्यांनी, " खसा खसा परतलं की चरे जातात ..मग काय उपयोग ?" असं म्हणून ती कपाटात मागे टाकून दिली.
Wok बिक ची भानगड भारतात यायच्या आधी कित्येक वर्ष , आई ह्या कढईत स्वैपाक करत होती.  तिच्या 'Stir fry' type भाज्यांमुळे ,पोळी भाजीचा डब्बा न्यायला आम्हाला खूप आवडायचा. घेवडा, गवार, भेंडी, डिंगरी, तोंडली; अर्ध्या कच्चा, कुरकुरीत  परतलेल्या आणि तरीही त्यांचा हिरवा रंग राखलेल्या  भाज्या खायला  आम्ही आतुर असायचो. कोबीची, फक्त तीळ, हिरवीमिरची आणि कोथिंबीर घातलेली डब्यातली भाजी आम्ही तिघंही , आजही आठवून , आपआपल्या घरी करायचा प्रयत्न करतो. बटाट्याच्या काचर्या पोळी बरोबर खायला लावणं गुन्हा आहे, असं म्हणून त्या नुसत्याच खाऊन टाकायचो; त्यामुळे आई काचर्यानबरोबर , दाण्याच्या चटणीचा रोल द्यायची. दाण्याचे कुट, कांदा-लसूण घालून परतलेल्या पालेभाज्या पण  तितक्याच आवडीने खायचो .पण ह्या एवढ्या परतलेल्या भाज्या करत असताना, आईचे तेल वापरण्याचं, एक ठरलेलं गणित होतं. कधी तेल जास्त झालं तर त्यात भात कालवून फोडणीचा भात खायला मिळायचा. असा भात रोज खायला मिळावा असं आम्हाला वाटे , पण तो १५ -२० दिवसातून एकदाच मिळे.
बहुतेक, आणल्यापासून ह्या कढईला आमच्या घरी उसंत अशी मिळालेलीच नाही . दररोजचा स्वैपाक , चिवडे, लाडू , सणासमारंभाचे पुलाव आणि मसालेभात, दिवाळीतला फराळ , भाजणी, आम्ही मुलांनी पाक कला शिकताना केलेले प्रयोग, सगळंच ह्या एका पात्रात बनवलं गेलंय. कधी आम्हाला तिघांना विचारलं," आईच्या स्वैपाकघरातलं काय हवंय ?" तर आम्ही निर्विवादपणे  ह्या कढईकडेच बोट दाखवू. पण कढई मिळाल्याने , आईच्या हाताची चव कुठे येणार आहे? कढई बरोबर आई येणार असेल तरच ती घेण्यात अर्थ आहे - नाहीतरी  अन्नपूर्णेचं पात्र तिच्यामुळेच विपुल आहे...
उत्तम, सुग्रास जेवण बनवायला नाना प्रकारची, उपकरणं आणि भांडी लागतातच असं नाही...आजीकडे नव्हतं , पण आईच्या हाती सुबत्ता, आर्थिक स्वातंत्र्य होतं, आहे, तरीही तिचा ही स्वैपाकाचा कानमंत्र सोपा आहे. चविष्ठ जेवण बनवायला ३० जिन्नस लागत नाहीत; साधं पोष्टिक पण रुचकर जेवण , पोटोबा आणि आत्म्याला तृप्त करू शकतो.  आम्ही तृप्तच होते , पण मग आमच्या , जिभेचे चोचले पुरवायला, हॉटेल मधले पंजाबी,chinese, pizza, Italian, continental इत्यादीची चव लागायला लागली. जिभेला एकदा का ह्या चवी कळल्या की मग परत फिरणं अवघड होतं...
अशा ह्या खाद्यसंस्कृतीत वाढलेली आम्ही  तिघं  मुलं, आमची मुलं  तर खूप लहानपणापासूनच Mexican, ethiopian, Thai, Burmese, Italian, American खाद्य संस्कृतींचा आस्वाद घेतायत. त्यांच्यासाठी आमच्या बालपणातली तृप्तता शोधताना बरीच घालमेल होते. Berkeley मध्ये, इरा  कधी हात ओरपून कुळथाचं पिठलं आणि तूप भात खाते , तव्यावरच्या फुगलेल्या पोळीचा हट्ट करते किंवा Kale ची तीळ, खोबरं घातलेली,'परतलेली ' भाजी  पुन्हा मागून खाते , तेव्हा वाटतं आमच्या आन्नपुर्णेचा अंश माझ्यातही थोडा थोडा झिरप्तोय ...तिच्यासारखंच एखादं पात्र सापडवून आपला वारसा तयार करता आला पाहिजे...


Tuesday, December 19, 2017

एकटी


एकटा , एकटी किंवा एकटं  असणं ...अशा असण्यात खूप सामर्थ्य दडलंय. एकट्याला दुकटं असल्याशिवाय आयुष्य समृद्ध होऊ शकत नाही असा समज पूर्णतः चुकीचा आहे. आयुषातले अनेक महत्वाचे निर्णय किंवा जाणीवा आपल्यात मुरतात त्या आपण एकटे असतांना. स्वतःच एकटेपण नीट उपभोगता आलं पाहिजे;ते जमलं  नाही  तर एकटेपणा बोचतो..

माझ्या पिढीतल्या अनेक जणांना double income families चे  तोटे आणि फायदे अनुभवायला मिळाले. शाळेतून घरी आल्यावर, शेजारून किल्ली घेऊन घर उघडायची जवाबदारी  काहींना सांभाळावी लागली.
मला  तसं ते किल्लीने दार उघडून घरात येणं खूप आवडायचं. आमच्या घरात एवढी शांतता एरवी कधीच अनुभवायला मिळायची नाही. एरवी आमच्या सगळ्यांचं असणारं घर , तेव्हा फक्त माझं असायचं.घरात शिरल्यावर सगळ्या खोल्यांमध्ये फिरून, बाबांची आदल्या दिवशीची कात्रणं,  स्वैपाक घरातले सगळे डबे उघडून बघणं, ताई दादांचे कप्पे पडताळून पाहणं, त्यांच्या वाचनातली पण माझ्या आवाक्याबाहेरची पुस्तकं चाळून बघणं , मला फार आवडायचं. डब्यातला शेवटचा उरलेला चिवडा , खारीचं  बिस्कीट, ताई -दादांबरोबर Share न करता खाऊन टाकायला आवडायचं. तो घरातला एकटेपणा खूप रम्य होता , त्या मध्ये कधीच भीती नव्हती. त्या रम्यपणातूनच खूप नंतर कधीतरी माझ्या "निळाई आणि पसारा' ह्या एकांकीकेतल्या नायिकेचा जन्म झाला.  स्वतःची ओळख करून देताना ती म्हणते ," कधीतरी लहानपणी  मी मला वाटणाऱ्या गोष्टी आकाशाला सांगायला लागले. मी शाळेतून घरी यायचे , कुलूप उघडायचे, चहा करायचे आणि गच्चीत जायचे.आणि कशी कुणास ठाऊक ? मला  सवयच लागली आकाशाशी मनसोक्त गप्पा मारण्याची.नंतरही माझ्या स्वप्नात घोड्यावरचा राजपुत्र आला नाही असं नाही . पण मला कायमच आकर्षण होतं ते माझ्या वरच्या मला गिळून टाकणाऱ्या निळाईचं ." असा तो रम्य एकटेपणा, उसंत, स्वस्थता देणारा. तो अनुभवल्यामुळेच ज्यावेळेला त्याचं बोचरंरूप समोर आलं तेव्हा ते जास्त बोचलं....

दहावी नंतरच्या उन्हाळ्यात अचानक माझे आजोबा, वडिलांचे वडील, heart attack ने गेले. ते सत्त्यांशी वर्षांचे होते पण चिरतरुण म्हणतात तसे. Massage therapist असणारे नाना , वयाच्या सत्त्यांशी वर्षी सुद्धा दिवसाला २-३ Patient ना मसाज करत, १०० जोर मारून दाखवत.. गेले त्याच्या आधी तास दीड तास त्यांनी तसाच मसाज केला होता.  ते जायच्या आधी आठवडा -दीड आठवडा मी rock climbing करताना पडले , म्हणून त्यांनी रोज रास्तापेठेतून कोथरूडला येऊन मला मसाज केला होता. मी बरी झाले आणि पुन्हा हिंडा-फिरायला लागले, आणि नाना भेटायला बोलवत असूनसुद्धा , त्यांना न भेटता अलिबागला गेले. परतीच्या प्रवासात कळलं ...नाना गेले.  नंतरचा महिना, आई बाबांच्या नोकरी- कामांमुळे, ताई -दादा दिल्ली, मुंबईत असल्यामुळे ,त्या रास्तापेठेतल्या घरात मी बरेचदा एकटी असायचे. मनात , स्वतःचा स्वार्थीपणा आणि त्यांना न भेटल्याची खंत सतत खात असल्यामुळे -हा एकटेपणा मनाला बोचणारा होता. तेव्हा पहिल्यांदा वाटलं की , ज्या प्रश्नांची उत्तरं आपण एरवी टाळतो ते प्रश्न  एकटं असल्यावर भेडसावतात-त्यांच्यापासून लपता येत नाहीत.  १५ -१६ वर्षाचे असताना सगळं जग स्वार करण्याचा फसवा आत्मविश्वास असतो . आयुष्यचक्र, मृत्यू ह्याचा विचार केलेला नसतो .. नानांची कधी माफी मागता आली नाही - पण ते गेल्यानंतरच्या एकटेपणात मी मोठी झाले.

अमेरिकेत दुकटी होऊन आले पण माझ्या दिनचर्येत एकटेपणाच  मांडलेला होता. दुपारच्या जेवणाला घरची  प्रकर्षाने आठवण यायची. आई रात्र महाविद्यालात शिकवत असल्यामुळे आमच्याकडे दुपारचं जेवण साग्रसंगीत,एकत्र , गप्पा मारत जेवायची पद्धत होती. नव्वद टक्के वेळेला आई माझ्या आवडत्या, परतलेल्या, गरम  गरम,भाज्या पानात वाढे. कॉलेज मध्ये जेवणाच्या वेळी अड्डा जमे, नंतरही कधी एकटं जेवणं मी फारसं अनुभवलेलं नव्हतं.अमेरिकेत घरात घड्याळाची टिक टिक मंदिराच्या घंटे सारखी कानात घुमत राही . लोकांची वर्दळ नाही , सतत बेल नाही, घरात फोनची ट्रिंग ट्रिंग नाही , निकित  शिवाय मला कुणाचा फोन यायचा नाही; चिडीचूप शांताता असायची.निकीत धपा धप त्याचे Phd चे units संपवण्याच्या मागे होता,sandwich वगैरे खाऊन त्याचं जेवण व्हायचं .पण मी stanford ला आल्यावर त्याला जमेल तेव्हा आम्ही एकत्र जेवायला भेटायचो. काही दिवस मी अगदी स्वतःला stereotypical immigrant brideच्या भूमिकेत बसवलं होतं.  घरापासून लांब, उठून कुठे office, university मध्ये जायचं नाही , भेटी गाठी घायायला ओळखीचे लोक नाहीत, कशाचच routine नसल्यामुळे ह्या एकटेपणात बुडून, निकीतकडे रडगाणं गाण्याची तयारी पण मी केली होती. पण मग डोक्यातल्या  चक्रात एक खडा अडकला.
हायदराबाद जवळच्या खेड्यातून लग्न करून आलेली एक मुलगी, सुमित्रा, माझी मैत्रीण झाली. लग्नाआधी ती दोनदा तिच्या नवऱ्याला भेटली होती, कधी घराबाहेर राहिली नव्हती. स्वैपाक फारसा येत नव्हता, म्हणून तिच्या आईबाबांनी Roti Maker पाठवला होता, पण त्यातल्या पोळ्या नवऱ्याला आवडत नव्हत्या. मला भेटल्यादिवशी ती मला त्यांच्या स्टुडीओ apartment मध्ये घेऊन गेली. "आटा बना के दिखाओ" म्हणाली म्हणून कणिक भिजवून दिली.तिला विचारलं," तुम्हे  फ्रेश रोटी खिलाऊ क्या?" तर तिच्या डोळ्यात पाणी तरंगलं. अमेरिकेत पहिल्यांदाच मी दुपारी  पोटभर जेवले असेन.

सुमित्राशी ओळख झाल्यावर  जाणवलं रिकामटेकडापण माझ्या एकटेपणाला बोचत होता. एक जग सोडून दुसरया जगत पदार्पण केलेल्या कुणालाच, रिकामटेकडपणाचे सोंग घेऊन चालत नाही.. मग नवीन जगाची ओळख कशी होणार? आणि मुख्य म्हणजे त्या जगात स्वतःची ओळख कशी प्रस्थापित करणार?  मी अनुभवलेला थोडासा रितेपणा, immigrant म्हणून आलेला एकटेपणा - हेच माझं qualification होतं. मला International Spouse Center मधला पहिला Job म्हणूनच मिळाला. Community Associate म्हणून काम करताना मी इतरांशी ओळख असो , नसो, संवाद साधू शकले. इतर अंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटताना, प्रत्येकाच्या मनात दडलेला मायदेश, आणि ह्या  नवीन जगातलं स्थान शोधत असताना, वाट्याला आलेला एकटेपणा हाच आमच्यातला दूआ होता.  नवीन भेटणाऱ्या ह्या लोकांमध्ये काही सगळेच वाहणाऱ्या मायेचे झरे नव्हते. कामापुरतेच बोलणारे, सांस्कृतिक आणि भाषेच्या सीमेपलीकडे न पाहू शकणारे, माझ्या भारतीय इंग्रजीला न समजू शकणारे किंवा प्रयत्न सुद्धा न करणारे अंतरर्ष्ट्रीय विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंबीय पण भेटले. अशा वेळेला उगाच आपणच चुकतोय, कमी पडतोय असं वाटायचं -पण इतकं प्रकर्षाने ही नाही की स्वतःला बदलून टाकावस वाटेल.  ज्यांच्याशी ओळखी झाल्या त्यांच्याशी नेहमीच wavelength जुळेल असं नाही झालं. काहीकाही वेळेला भाषिक, सांस्कृतिक context translate नाही करता येत. त्यामुळे ह्या नवीन नात्यांमध्ये एकमेकांबद्दल न कळलेले vacuum pockets आड आले . घट्ट मित्र मिळेपर्यत वाटलेला एकटेपणा स्वतःला तपासण्यात गेला..

आता मागे वळून पाहताना वाटतं - तो एकटेपणा नव्हताच - नवीन अवकाशात उडी घेताना, मनाला , बुद्धीला, नवीन दृष्टिकोनासाठी सक्षम करायला , तो मिळालेला मोकळा अवकाश होता. ह्या देशात राहत असताना एकटेपणाची एक लकेर सतत साथ राहणार ह्याची जाणीव करून देणारा काळ होता.

कामासाठी बरेचदा प्रवास करायला लागतो , निकीत जातो, तेव्हाचा एकटेपणा - वाट बघण्यात जातो. त्याला एक start आणि end date असते, तो मनात फारसा झिरपत नाही. पण हव्या हव्याश्या भौगोलिक गोष्टींपासून लांब असल्यामुळे वाटणारा एकटेपणा जाणवतो.  अशावेळेला दोन्ही आया, पुण्यातली घरं, मित्र  मैत्रिणी, रुपालीतली medium strong ग्लासातली कॉफ्फी आणखीनच हवी हवीशी वाटते.

आई झाल्यावर कळलेला एकटेपणा खूपच वेगळा आहे. ह्या एकटेपणात  आळस आहे, शांत पाय वर करून झोपावं असं असताना - कॉफ्फी shop मध्ये बसून large strong coffee पिणं आहे, 'आई' म्हणून व्यापून टाकणारी स्वतःची ओळख  थोडा वेळ बाजूला सारून, बायको , मैत्रीण, बहिण, मुलगी,  आणि 'स्व'' चा पुनर्विचार आहे..ह्या एकटेपणात खूप आत्मनिरीक्षण आहे.



Sunday, December 17, 2017

MilkyWay

मला मांजरं फारशी आवडत नाहीत, पण श्वान समुदाय मला फारच प्रिय आहे. म्हणजे, “The more I see of people, the more I like my dog.”, “ Never met a dog that hasn't liked me..” अशा काहीश्या गटात मोडणारी. लहानपणी मावशीकडे खूप मांजरं असायची- त्यांच्याशी खेळायला मला कधी कधी आवडायचं. शिट्ट्या-बिट्ट्या मारून ती जवळ येत नाहीत, त्यांना दिलेल्या नावांनी ती फक्त मालकाने बोलावल्यावारच जवळ येतात, ते सुद्धा त्यांचा मूड असेल तर; शेपूट तावातावाने हलवून राग दर्शवतात, तरीही मला मांजरं थोडी का होईना, पण आवडायची. मांडीवर येऊन बसली की त्यांच्या तुकतुकीत, मऊ केसांना कुरवाळण्यात अप्रूप वाटायचं. पण मग अनेकदा ओचकारणे, चावणे, फिस्स करून शेपूट दाखवून निघून जाणें असे प्रत्ययाला आल्यावर मी मांजरींना ‘माजोरड्या’ करार देऊन त्यांच्या कडून ‘स्नेहाची अपेक्षा करणं सोडून दिलं.
श्वान समुदायाशी मला कधीच प्रयत्नपूर्वक मैत्री करायला लागली नाही. आजोळच्या वाड्यात – आईच्या आई बाबांनी “ Rocky” पाळला होता. आम्ही सगळी नातवंडे त्याला भू भू ,यु यु, रॉक्या, काहीही म्हणत; त्याचे कान ओढ, शेपटीची रुंदी –लांबी मोज, पंज्यात किंवा कानामागे गोचीड्या आहेत का बघ, खाताना तो कसा आधाश्यासारखा खातो हे बघ..असे काहीही करायचो.रॉकी अल्सेशीअन आणि गावठी कुत्रा असं Mixed Breed होता- काळा, छातीला पांढरट केस आणि काळ्या केसाचीच अगदी किंचित आयाळ असल्यासारखा.पण ह्या काळ्या केसांमध्ये लपलेले त्याचे डोळे ,विरघळलेल्या चोकॉलेटच्या रंगाचे होते, प्रेमळ, inviting.आमच्या उंचपुऱ्या अण्णा आजोबांना, “आज रॉक्याने मला फिरवून आणलं” असं,धापा टाकत म्हणायला भाग पाडणारा, आडदांड शक्ती असणारा रॉकी. माझ्या दादाने अनेकदा त्याच्या तोंडात वगैरे हात घातला असेल, पण तो कधीच त्याला किंवा आमच्यापैकी कुणाला चावला नाही. आम्हा नातवंडांवर त्याने आजी- अण्णांइतकेच प्रेम केलं, माया लावली. मी ह्या अश्या मायाळू रॉक्याला पाहत मोठी झाले. इतर भेटलेली श्वानमंडळी, पाळीव किंवा रस्त्यावरची गावठी-ह्यांच्याशी मैत्रीच होते. त्यांना ओळखता येतात त्यांची खास माणसं..
मग मध्ये दोन दशकं हे ‘माजोरड्या’ आणि ‘मैत्र’ असं समीकरण बदलावं असं काहीच झालं नाही. मग इराचा जन्म झाला.


इराच्या पहिल्या वाढदिवसाला एका मैत्रिणीने, “ Kitten’s First Full Moon” हे Kevin Henkes ह्या लेखकाचं पुस्तक भेट दिलं. छोट्या मांजराच्या पिल्लाला , पौर्णिमेचा चंद्र म्हणजे दुधाची वाटी वाटते आणि मग ती मिळवण्यासाठी ते काय काय करतं अशी ही गोष्ट आम्हाला फार काही आवडली नाही. आणि मग ‘Prince’ भेटला.. इरा दीड वर्षाची असताना, आज्जा तिला Stroller मधून फिरवायला गेला असता, त्यांना Prince भेटला. दिसायला अतिशय देखणा; करडा, पांढरा, काळा, निळसरहिरवे डोळे असणारा हा बोका, इरा आणि आज्जाला पाहून त्यांच्याकडे स्वतःहून आला(?). इराच्या strollerवर उडी मारून बसला, वास घेऊन काहीतरी खात्री करून खाली उतरला. इराने हात फिरवला आणि तो परत घरासमोरच्या सोप्यात जाऊन बसला. जणू त्याने परवानगी दिली असल्यासारखी, आमच्या आसपासच्या गल्ल्यांमध्ये कुठे कुठे मांजरं आहेत, ती मांजरं आणि त्यांची घरं माहित झाली. दररोज संध्याकाळी ही मांजरं बघायला जायची वरात निघायला लागली. थोड्या दिवसांनी, एखादा शेपटीचा फटका बसला की सुधारेल, असा विचार करून मी ह्या मार्जार प्रेमाकडे दुर्लक्ष केलं. पण घरात सुद्धा Kittens first full moon वरचं प्रेम वाढायला लागलं. दुपारी झोपताना, रात्री झोपायच्या आधी, जमलंच तर आधे मध्ये कधी –ह्या पुस्तकाची उजळणी व्हायला लागली. एक दोन महिन्यांनी “ I am a Kitten..” असं म्हणणं सुरु झालं...

मग मी पण मुद्दामच, आमच्या शेजारच्या दोन श्वान मित्रांशी मैत्री वाढवली. बागेत येता जाता, मालकाबरोबर फिरायला, पळायला जाणाऱ्या सगळ्या कुत्र्यांना आम्ही थांबून, “ Can I pet the doggie” असं म्हणून थांबवायला लागलो. संध्याकाळचा वेळ छान जायला लागला. कधी कधी “I am a Puppy”असा खेळ सुरु झाला. मला खूपच आनंद झाला. मग इराने “ म्याव ,म्याव “ च्या भाषेत बोलणं सुरु केलं. मुळात माणूस सोडून इतर कुठल्याच प्राण्याची फार आवड नसलेल्या निकीतला, हे फारच विनोदी वाटत होतं. इरा आणि तिच्या मावशीला ही भाषा एकमेकींशी बोलायला खूप मज्जा वाटत होती. “एक म्याव म्हणजे..” असं ताई मला समजवायला लागल्यावर, मी म्हटलं, “तुमची Secret language असू देत ती..”
आमच्या ‘कुत्र का मांजर?” या चढाओढीत एकेदिवशी संध्याकाळी, निकीत आणि इराच्या मागे मागे एक मांजर घराच्या दारापर्यंत आलं. जवळच्या २ घरात मांजरी पाळलेल्या आहेत , पण हे मांजर वेगळच होतं. इराला लगेच त्याला घरात घेऊन तिची खेळणी दाखवायची होती. “aww” असं वगैरे म्हणून त्याच्या अवतीभवती फिरणं चालू होतं. आमच्या सोप्याच्या कठड्यावर Halloweenसाठीच्या सजावटीतले लाल भोपळे ठेवले होते, त्या कठड्यावर बसून ते माझ्याकडे बघून खूप केविलवाणे ‘म्याव’ म्हणालं...मी फक्त भुवया उंचावून त्याच्याकडे बघितलं. निकीतला म्हटलं, “ हरवलंय बहुतेक. फोटो काढून Nextdoor वर टाकूया..” मी सांगायच्या आधीच त्याने फोटो post पण केले होते. आम्ही घरात गेलो. दार बंद करून घेताना, घरातल्या उजेडाची तिरीप त्या मांजराच्या चेहऱ्यावर पडली होती. अत्यंत केविलवाण्या स्वरात, माझ्याकडे बघत ते “म्याव” म्हणालं. पण मी दार बंद करून घेतलं.
हात पाय धुवून आम्ही जेवायला बसलो. इराला ‘फुग्गी’,म्हणजे फुगलेला फुलका वाढत असतांना तिने विचारलं, “मांजरं खातात का फुग्गी?” मी आणि निकीत एकदम म्हणालो, “ नाही. मांजरं फक्तं cat food खातात..” ह्या देशात हे असं का आहे ते मला न उलगडलेलं कोडं आहे.म्हणजे आपल्याकडे कसं दूधभात, दूधपोळी , घरात जे शिजेल ते खातात आणि उत्तम आयुष्य जगतात की कुत्री-मांजरी..पण इथे मांजरांना catfood च देतात. घराबाहेर अधून मधून ‘म्याव’ ऐकू येत होतं ,पण इराचं आवडीचे जेवण असल्यामुळे पुढे फार चर्चा न होता जेवण आटोपलं.
अर्धा पाउण तास झाला तरी Nextdoor वरच्या post ला मांजराच्या मालकाचा, किंवा कुणाचा ओळखीचा काहीही मेसेज आला नव्हता.मीच थोडी अस्वस्थ झाले होते. गेलं वर्षभर Nextdoor वर ,’ Coyotes sighted..” “ Coyotes eating Cats..” अशा बऱ्याच post वाचल्या होत्या. इथली पाळीव मांजरं उंदराची शिकार बिकार सोडा,बरेचदा घराबाहेर म्हणजे घराच्या आसपास असलेल्या अंगणात, फार फार तर शेजार-पाजारच्या एक दोन घरात एवढीच फिरलेली असतात. आपल्याकडे कसं मांजरं कुठेही भटकून, भूक लागली तर उंदीर खून, आळशी असेल तर कुणाकडेही दूध पिऊन, त्यांना वाटेल तेव्हा घरी येतात, तसं इथे बहुदा नाहीये..म्हणजे हे विधान मी ओळखीच्या दोन तीन उधारणांवरून, इंटरनेट वर हरवलेल्या मांजरीच्या पोस्ट्स वाचून करते आहे. त्यामुळे, ह्या मांजरीच्या मानेला धरून उचलून टाकून दिलं तर this cat will land on its feet ह्याची खात्री नव्हती.
जेवणानंतर इरा खिडकीला नाक लाऊन, सोप्यात ते मांजर दिसतं आहे का बघायला गेली.Coyotes च्या बातम्या, बाहेर पडलेली थंडी, अंधार, घरासमोरच्या रस्त्यावरची रहदारी, ह्या सगळ्यामुळे मला पण अस्वस्थच वाटत होतं. मी जाऊन घराचं दार उघडलं, तर मांजर अजून तिथेच कठड्यावर बसलेलं.. मी दार उघडताच, टुणकन उडी मारून माझ्यापुढे येऊन उभं राहिलं.  मी उमब्रयावर उभी होते तर मान हलवत माझ्या पायामागे दिसणाऱ्या उबदार घरात कसं शिरता येईल ते बघायला लागलं. मी दार लाऊन घेतलं. जुन्या बॉक्स मध्ये दोन स्टोल्स अंथरले आणि बॉक्स दाराबाहेर ठेवायला गेले...इरा माझ्या पायात घुटमळत हे सगळं बघत होती. दार उघडताच  इरा खाली बसून मांजराला स्वतःकडे बोलवत होती. तिच्या हाताचा मांजराने वास घेतला मग चक्क येऊन माझ्या पायाला अंग घासायला लागलं. बॉक्समध्ये न बसता माझ्या मांडीत हनवटी ठेऊन, माझ्याकडे बघत होतं. मी पण सगळे पूर्वगृह विसरून त्याच्या अंगावरून हात फिरवून पुढचा मागचा विचार न करता मांजराला घरात घेतलं.
आत येताच,मांजरोबांनी लगेच उडी मारुन घराची टेहाळणी सुरु केली. इराला भयानक आनंद झाल्याने ती नाचत ,लेगो, आणि भातुकली काढून मांजराला दाखवायला लागली. अडीच वर्षाचं पोर जेव्हा अति उत्साहाने, जुन्या घरातल्या wooden floor वर नाचायला लागतं त्यावेळेला त्याचा प्रचंडirritating आवाज होतो.( निदान मला तरी irritate होतं). मांजर घाबरून सोफ्याखाली जाऊन बसलं. त्याला “प्सप्स’ करून, हाताचा वास घ्यायला हात सोफ्याखाली घातला तर मलाच फटका मारण्यात आला. निकीत हा प्रकार पाहून म्हणाला, “ what’s प्लान B?”. मी iphone वरून Next Door वरच्या फोटो खाली लिहिलं, “ We are not cat people. But I was scared of the coyote attacks –so I have taken the cat inside my house. Please advise what to do next.” ३ सेकंदात उत्तर आलं, “ Go to the 24 hour open  animal hospital. They will scan him for a chip.” पुढे काय करायचं ह्याचा मार्ग कळला पण त्याकरता मांजराला सोफ्याखालून त्याने मला न चावता आणि ओरखाडता ,बाहेर कसं काढायचं?
रेशमी कापडांच्या उरलेल्या चिंध्यांमधून, इरासाठी एका आजींनी एक विदुषक बनवला होता; त्याला मागे चांगली मोठी रेशमी सुतळी होती. floor वर झोपून, मांजरापुढे तो विदुषक टाकला आणि सुतळीने तो पुढे मागे करण्याचा खेळ सुरु झाला. इराला नाच करायला अजून स्फूर्ती मिळाली. थोडसं सोफ्याबाहेर आलेलं मांजर परत सोफ्याच्या आतल्या कोपऱ्यात जाऊन लपून बसलं. निकीत Next door वरती updates बघत होता. त्याला म्हटलं, “बाबा आणि इरा तुम्ही Cat food आणायला गाडीत जाऊन बसा..मग आपण hospital मध्ये जाऊ..” नाच बीच लगेच थांबला. दोन मिनिटात ती दोघं घराबाहेर आणि आम्ही दोघं दिवाणखान्यातल्या सोफ्यासमोर,“ To like or to dislike..” ह्या विषयावरचा निर्णय लावण्यात जुंपलो. विदुषक आणि सुतळीचा खेळ, आणि त्याच्याशी मी खेळत होते म्हणून मी , त्या मांजराला Finally पसंत पडले. विदुषकाला सावरत, मांजरला एका बखोटीला घालून, कसं बसं दाराला कुलूप लावलं आणि पळत गाडीत जाऊन बसले.
सीट बेल्ट लावतांना ते चक्क शांतपणे मांडीवर बसून राहिलं, कळल्यासारख –की त्याला त्याच्या घरी पोचो वतोय. कारचा प्रवास सुरु झाल्यावर मात्र ते घाबरून, शाहारायला लागलं. तसं मी त्याच्याशी, “ It will be Allright baby,dont worry..” म्हणत गप्पा मारत राहिले. इरा अजूनही ह्या प्रसंगाची गोष्टं वारंवार सांगते म्हणून मला हे माहितीये. कारण असं काही केल्याचं मला आठवत नाही. Finally, हॉस्पिटलमध्ये पोचलो. पण चीप-बीप स्कॅन करायलाच लागली नाही. हॉस्पिटलच्या भकास पांढऱ्या प्रकाशात, त्याच्या गळ्यातल्या पट्ट्यावर एक छोटासा स्टील tag होता, तो लख्ख चमकला. त्यावर “Milkyway” अशा नावाखाली दोन सेलफोन नंबर कोरलेले होते. निकीतने फोन लावला तर आमच्या शेजारच्या गल्लीतच होतं Milkywayचं घर; घरातले तो सापडल्याचं ऐकून सुखावले. बरक्ली पासून ४०-५० मैलावर सान्टा रोसा गावात आणि आसपासच्या परिसरात वणव्याने पेटलेली आग 
खूप दिवस क्षमली नव्हती. ४०-५० मैल लांब आसूनही बरक्लीमध्ये हवेत धुरकट,जळका वास भरून राहिला होता. त्यामुळे Milkyway घरचा रस्ता चुकला असेल असं हाॅस्पिटलमधल्या चर्चेत आम्ही निश्चित केलं.
हॉस्पिटलहून त्याच्या घरी जाताना, milkyway च्या तुकतुकीत कांतीची, त्याच्या पोटातून येणाऱ्या गुरगुर आवाजाची जाणीव झाली. लहानपणची माऊशीच्या घरची मांजरं आठवली. आमच्याच घराबाहेर का येऊन बसला असेल हा Milkyway बोका? इरा त्यांच्या गटातली ‘खास’ व्यक्ती आहे म्हणून? का माझं काही देणं राहिलं होतं? I declared a temporary truce.
Milkyway ला भेटायला त्याचे ‘आई बाबा’ घराबाहेर येऊन उभे होते. रात्री साडे दहा वाजता, आम्ही इराला घेऊन एका मांजरासाठी हा सगळा उपद्व्याप करतो आहे, ह्याचं त्यांना खूप आश्चर्य वाटलं. Milkyway च्या ‘आईने’ खूप वेळा कृतज्ञता व्यक्त केली, म्हणून न राहवून मी म्हटलं, “ Dont worry, I had a dog for 17years.I understand what a pet means to you..” कुत्रा  Vs मांजर , दोन्ही गटांचं नेत्रापल्ल्वीतून संभाषण झालं, संपलं. इराने पुरेसे “ aww” , “cute” उच्चारण केलं असल्यामुळे, Milkyway आणि त्याच्या भावाला कधीही भेटायला यायचं निमंत्रण मिळवून आम्ही तिथून निघालो.
“ चिऊ ताईच्या पिल्ला, खरं सांग मला,आकाशातले रस्ते कसे सापडतात रे तुला ? चुकून कधी रस्ता चुकलाच तर, नाव, गाव, पत्ता सांगून, पोलीस मामा सोडतात का?” 
कवितेसारखीच हरवलेली पिल्लं वाट शोधत घरी परततात, त्यांना मदत करणारी लोकं भेटतात, आई बाबा पण हरवलेल्या पिल्लांना खूप शोधतात आणि सापडल्यावर आनंदी होतात..सगळच एका संध्याकाळी आमच्या चिमुकलीच्या भावविश्वात उलगडलं.

आनंदाची गोष्ट म्हणजे Milky way च्या भेटी नंतर आम्ही एकदा शेतावर गेलो होतो. तिथे गाईला आणि बकऱ्यांना खायला घालून झाल्यावर , इराला, “ I am cow” आणि “I am a goat” असं ही वाटायला लागलं. Zoo मध्ये python पाहिल्यावर तिने जमिनीवर लोळून “I am a snake” असं पण म्हणून झालं...श्वान मित्र का मार्जार मित्र ...का दोन्ही? अजून ठरायला खूप वेळ आहे. तोपर्यत निवांत !